आंबेठाण (जि. पुणे) : एखादा नेता आमदार झाल्यावर त्यांच्या गाड्यांवर ‘विधानसभा सदस्य’ असे स्टिकर लावले जाते. साधारणपणे एका तालुक्यात एक विधानसभा सदस्य असतो; परंतु त्याला पुणे (Pune) जिल्हा अपवाद आहे की काय? अशी चर्चा रंगली आहे. कारण खेड, चाकण, मावळ, भोसरी, चिंचवड, पिंपरी परिसरात विधानसभा सदस्य स्टिकर लावलेल्या गाड्यांची संख्या मोठीआहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यात डमी आमदारांचे पेव फुटल्याचे दिसून येत आहे. खरे आमदार या डमी आमदारांपुढे फिके पडताना दिसत आहेत. इतका रुबाब त्यांचा असतो. (Dummy MLAs Increase in Pune district : 'Member of Legislative Assembly' stickers on many cars)
काही वर्षांपूर्वी खेड, चाकण, भोसरी, पिंपरी चिंचवड भागात अशा डमी आमदारांचे मोठे पिक आले होते. आताही त्यांची संख्या वाढली असून पुणे शहरासह पिंपरी चिंचवड, मावळ, शिरूर, खेड, आळंदी या भागात असे शेकडो डमी आमदार वावरताना दिसत आहेत. सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या शहरी भागात हे प्रमाण मोठे आहे. ग्रामीण भागात मात्र एकेका तालुक्यात कमीत कमी दोन-दोन डझन डमी आमदार झाले आहेत.
आमदार किंवा त्यांची पत्नी असेल तर गोष्ट वेगळी आहे. परंतु सध्या सर्वत्र आमदारांचा भाचा, मेहुणा, भाऊ, पुतण्या,जवळचा कार्यकर्ता असे नाते सांगत हे डमी आमदार फिरत असतात. अनेकजण त्यांच्या चारचाकी गाड्यांवर'विधानसभा सदस्य' असे छापील असलेले हिरव्या रंगाचे गोल स्टिकर गाडीला चिटकावून मोकाट हिंडतात. यात अगदी अल्टो, वॅगनआरपासून लाखो रुपयांच्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
अनेक जण तर स्वतःच आमदार असल्याच्या अविर्भावात वावरत असतात. त्यांच्या डोक्यात वेगळी हवा गेल्याने काही जण वाहतुकीचे नियमही पायदळी तुडविताना दिसून येत आहेत. काहींना वाहतूक पोलिसांनी हटकले तर एखाद्या मर्जीतल्या आमदाराला किंवा अन्य नेत्याला फोन लावून स्वतःची सुटका करून घेतात.
सध्या मार्चअखेर असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिस कारवाई करताना दिसत आहेत. मग गाडीच्या काचा काळ्या असतील किंवा नंबर प्लेट फॅन्सी असेल अथवा काही कागदपत्रे कमी असतील तर कारवाई केली जाते. पण मग गाडीला असे स्टिकर लावून फिरणाऱ्या या डमी आमदारांवर पोलिस कारवाई का करीत नाही? असा सवाल उपसिथत होतो आहे.
अनेक वेळा महागडी गाडी दिसते, काचा काळ्या आहेत आणि गाडीला आमदार असे स्टिकर दिसले की सर्वसाधारण किंवा मध्यमवर्गीय नागरिक आदर ठेऊन त्या गाडीला मार्ग देतात. पण त्याचा फायदा अनेक वेळा असे डमी आमदार घेताना दिसत आहेत.
कायद्याची पायमल्ली करू नका : शेळके
याबाबत मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले की, कुठल्याही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे स्टिकर लावून सरकारची किंवा कायद्याची पायमल्ली होईल किंवा स्वतःची कायदेशीर अडचण होईल असे वागू नये. संसदेने किंवा घटनेने दिलेला मान राखावा. लोकप्रतिनिधींचा अपमान होईल किंवा आपली कायदेशीर अडचण होऊन गुन्हे दाखल होईल, असे कृत्य करू नये.
स्टिकर लाव म्हणून आम्ही कोणाला सांगत नाही : मोहिते
आम्हाला कोण विचारतच नाही. बाजारातून असे स्टिकर छापून घेतले जात आहेत. मतदार किंवा कार्यकर्ते असल्याने बोलता येत नाही. आता तर काही गुंडदेखील असे स्टिकर लावत आहेत. सरकारने बंधने आणली तरी लोक कायदा हातात घेऊन फिरतात, हे अत्यंत चुकीचे आहे. स्टिकर लाव म्हणून आम्ही कोणाला सांगत नाही किंवा परवानगी देत नाही. माझ्या कुटुंबात मी आणि बायको वापरत असलेली गाडी सोडून कोणत्याही गाडीला स्टिकर नाही, असे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.