Shivsena News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षात नवीन 'उदय' होणार, असे म्हटले होते. त्यापाठोपाठ काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील उदय सामंत हे शिवसेनेतून बाहेर पडून उपमुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला होता. हे सगळे दावे स्वतः उदय सामंत यांनी खोडून काढले. आपण एकनाथ शिंदेंमुळेच मंत्री आहोत, याची जाणीव आपल्याला असल्याचे सामंत यांनी म्हटले.
सामंत यांनी आपण एकनाथ शिंदेंशी एकनिष्ठ असल्याचे म्हटले असले तरी भविष्यात शिंदेंना त्यांच्या पक्षातून आव्हान मिळेल का? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण शिवसेनेत बंड करून पूर्ण शिवसेनाच एकनाथ शिंदे यांनी सोबत घेतली त्यामुळे त्यांच्या सोबत असे होणारच नाही, हे नाकारून चालणार नाही.
कारण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांचे वाढलेले प्रस्थ हे भविष्यात अनेकांची डोकेदुखी ठरेल त्यामुळे शिंदेंना रोखण्यासाठी त्यांच्याच पक्षातील नेत्यांना ताकद दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरील दावा लगेच सोडला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असल्याचे ते म्हणाले होते. दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन आल्यानंतर मुख्यमंत्रिपद मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच ते आपल्या साताऱ्यातील गावी रवाना झाले. त्यामुळे शिंदे हे मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा बाळगून आहेत.
लोकांमध्ये उतरून काम करणारे ते नेते आहेत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता कायम आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाने शिवसेना कोणाची हा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना उद्धव ठाकरे हे आव्हान वाटत नाहीत. मात्र, त्यांच्या मार्गात भाजप विशेषतः देवेंद्र फडणवीस हेच अडसर ठरण्याची शक्यता अधिक आहे.
देवेंद्र फडणवीसांना देखील हे माहीत असणार की आपले भविष्यातील प्रतिस्पर्धी हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे असू शकतील. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची ताकद मर्यादीत राहिल याची काळजी घेण्यात येणार हे नक्की. म्हणूनच रणनीतीचा भाग म्हणून एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना ताकद देऊन त्यांची स्वतंत्र प्रतिमा तयार केली जाऊ शकते. म्हणजे भविष्यात शिंदे डोईजड होणार नाहीत.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते ग्रामीण नेते जास्त आहेत. शहरी चेहरा असलेला मोठा चेहरा शिंदेंकडे नाही. हीच कमतरता उदय सामंत भरून काढतात. सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ते शिवसेना असा प्रवास केला आहे. ते कुठल्याही पक्षात असले तरी त्यांचे वरिष्ठांशी त्यांचे संबंध चांगले असतात. एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे उत्तम संबंध होतेच पण बंडानंतर ठाकरेंची साथ सोडणार नाही म्हणणाऱ्या सामंतांनी देवेंद्र फडणवीसांशी बोलूनच एकनाथ शिंदेंना साथ दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे सामंत यांचे फडणवीसांशीही उत्तम संबंध आहेत.
उदय सामंत यांचे नाव विरोधी पक्षांकडून घेत त्यांच्यातील आणि फडणवीसांमधील जवळीक शिंदेंसाठी भविष्यात डोकेदुखी ठरू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, जातीच्या राजकारणात उदय सामंत हे एकनाथ शिंदेंच्या बरेच मागे आहेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात 'मराठा मॅन' म्हणून प्रस्थापित होत आहेत. सामंत हे गौड ब्राम्हण समाजातून येतात. त्यामुळे त्यांना शिंदेंसारखा मोठ्या जात समुहाचा पाठींबा नाही. शिवाय हाडाचे, कट्टर शिवसैनिक अशी ओळख देखील उदय सामंत यांची नाही. त्यांचा प्रवास राष्ट्रवादीतून शिवसेना असा झाला आहे.
राजकीय तज्ज्ञांच्या मते भाजप एकनाथ शिंदेंचा पक्ष फोडणार नाही. कारण हिंदुत्वाचे राजकारण करत असताना त्यांना नवीन स्पर्धेक नकोच आहे. मात्र, एकनाथ शिंदेची शिवसेना न फोडता त्यांच्यातील दिग्गज नेत्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजपची ताकद वाढणार आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदेंच्या पक्षातील नेत्यांचा अंतिम थांबा भाजप असल्याचे चर्चा आहे. कारण भाजप मित्र पक्षांना संपवतो आणि मोठा होता, असे आरोप त्यांच्यावर होतच असतात. आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत बोलताना अमित शाह यांनी 2024 मित्रपक्षांच्या साथीने तर 2029 स्वबळावर, अशी घोषणा आधीच देऊन ठेवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.