Maharashtra Politics : 'ऑपरेशन लोटस' हा शब्द तसा बदनाम झालेला आहे. बदनाम यासाठी की, बहुमत नसले तरी सत्ता प्राप्त करण्यासाठी भाजप (BJP) कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे त्यामुळे रूढ झाले. कर्नाटकात केलेल्या 'ऑपरेशन लोटस'मुळे भाजपला नंतर सत्ता गमवावी लागली होती. आता कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यानंतरही भाजपकडून 'ऑपरेशन लोटस' होणार, म्हणजे खासदार, आमदारांची फोडाफोडी होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
अगदी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएला फटका बसला. भाजपला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. त्यामुळे नितीश कुमार आणि एन. चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षांच्या कुबड्या भाजपला घ्याव्या लागल्या.
भाजपला स्बवळावर स्पष्ट बहुमत मिळाले नाही, त्यासाठी कारणीभूत ठरली उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये. महाराष्ट्रात भाजपची मोठी पीछेहाट झाली. भाजपचे केवळ 9 आणि महायुतीचे एकूण 17 खासदार विजयी झाले. महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 31 जागा मिळाल्या.
महाविकास आघाडीच्या या 31 खासदारांवर आणि आमदारांवरही 'ऑपरेशन लोटस' केले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे काही खासदार, आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, याला महायुतीच्या नेत्यांनाही त्याला दुजोरा दिला आहे. प्रश्न 'ऑपरेशन लोटस'चा नाही, महाविकास आघाडीतील पक्षांनी त्यांचे खासदार सांभाळले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका जबाबदार नेत्याने व्यक्त केली आहे. अनेक खासदार आणि आमदारही आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेनेच्याही नेत्यांनी माध्यमांसमोर केला आहे.
सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी केलेल्या महायुतीने विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 230 जागा जिंकल्या. सहा महिन्यांत राज्यकाराभारात असा काय फरक पडला, हा वेगळा विषय आहे. मात्र लोकसभेला मतदारांनी महायुतीला का नाकारले होते, याचा विचार केल्यास गेल्या पाच वर्षांतील राजकीय घडामोडींकडे पाहावे लागेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रबळ प्रादेशिक पक्ष फोडून भाजपने महत्वाच्या नेत्यांना सोबत घेतले होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते.
हे प्रकार मतदारांना आवडले नव्हते. त्याची शिक्षा मतदारांनी महायुतीला लोकसभेच्या निवडणुकीत दिली. मतदार चुकीची शिक्षा एकदाच देतात, हे विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे, असे म्हणता येईल. इतिहासातही असे दाखले मिळतील.
इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र मतदारांनी पुन्हा इंदिरा गांधी यांना पसंती दिली होती. चुकीची शिक्षा एकदाच मिळते, याची खात्री पटल्यामुळे भाजपने पुन्हा 'ऑपरेशन लोटस'चा विचार सुरू केलेला असावा.
महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांचा आवाज क्षीण झाला आहे. लोकसभेत मात्र विरोधकांचा आवाज वाढला आहे. लोकसभेतही विरोधकांचा आवाज क्षीण व्हावा, असे भाजपला वाटत असावे. भाजपला विरोधकच नको आहेत, असा आरोप महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून केला जातो.
'ऑपरेशन लोटस'च्या चर्चेमुळे या आरोपांना बळ मिळू लागले आहे. महाविकास आघाडीचे काही आमदारही संपर्कात असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला आहे. विधानसभेत विरोधकच ठेवायचे नाहीत, असा चंग महायुतीने बांधला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महायुतीला मोठे बहुमत मिळाले आहे, असे असतानाही त्यांना विरोधकांचे आमदार सोबत घेण्याची गरज का भासत आहे? मतदारांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या झोळीतच भरभरून दान टाकले आहे. त्यामुळे फोडाफोडीला मतदारांचा पाठिंबा आहे, असा समज महायुतीच्या नेत्यांनी करून घेतला असावा.
मतदार पुढच्या निवडणुकीत याचे उत्तर देऊ शकतात. मात्र, राजकारण आणि सत्ताकारणात राजकीय पक्षांकडून आता पुढचा विचार फारसा केला जात नाही. विरोधक कमकुवत झालेच आहेत. त्यांना नामशेष करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. भाजपला लोकशाही मान्य नाही, भाजपला विरोधक नको आहेत, असा आरोप महाविकास आघाडीकडून केला जातो. 'ऑपरेशन लोटस' झाल्यास भाजप महाविकास आघाडीचा हा आरोप खरा करून दाखवणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.