amit shah sharad pawar sarkarnama
विश्लेषण

Sharad Pawar Vs Amit Shah : अमित शहांनी बोट दाखवले, शरद पवारांनी इतिहास काढत घायाळ केले

अय्यूब कादरी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेली टीका भाजपच्या अंगलट आली होती. शरद पवार यांचे नाव घेता मोदी यांनी त्यांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा केला होता.

पुण्यात 21 जुलै रोजी भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांना 'भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार' म्हटले होते. त्याला आता शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी उत्तर दिले आहे. उत्तरदाराखल पवार यांनी अमित शाह यांच्यावर केलेली टीका भाजपला मुंग्या आणणारी आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सपाटून मार खाल्ल्यानंतर पुण्यात भाजपचे अधिवेशन झाले. त्यात शरद पवार, उद्धव ठाकरे हे भाजपच्या टीकेचे लक्ष्य होते. त्यामुळे आपले काय चुकले, यावर भाजपने चिंतन केले असेल का, असा प्रश्न आहे. शरद पवार सर्वात मोठे भ्रष्टाचारी आहेत, ते भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत, अशी टीका अमित शाह यांनी केली होती. त्या टीकेला उत्तर देताना शरद पवार यांनी अमित शाह यांची दुखरी नस दाबली आहे. मला भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हणणाऱ्यांना गुजरातमधून तडीपार का करण्यात आले होते, असा प्रहार पवार यांनी केला आहे.

मी शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आलो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा म्हणाले होते. शरद पवार यांचे सर्वच राजकीय पक्षांतील देशभरांतील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. असे असले तरी विरोधी पक्षांतील नेते एकमेकांवर टीका करत असतात. अमित शाह यांनी पवारांवर टीका करताना भान राखले नाही. शरद पवार हे देशातील सर्वात मोठे भ्रष्टाचारी आहेत, ही राजकीय टीका झाली. एखाद्या न्यायालयात ती सिद्ध झालेली नाही. राजकारणाचा, निवडणुकीचा भाग म्हणून, विरोधी पक्षांचे खच्चीकरण आणि आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी अशी टीका केली जाते. अमित शाह यांची राजकीय पार्श्वभूमी वादग्रस्त आहे. त्यांना एका प्रकरणात न्यायालयाने तडीपार केले होते.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह ( Amit Shah ) हे 2014 पासून देशातील सर्वात शक्तिशाली नेते बनले आहेत. गेल्या 10 वर्षांत विरोधी पक्षांतील नेत्यांना सरकारच्या विविध तपासयंत्रणांनी कसे छळले, हे वेगळे सांगायची गरज नाही. अशा परिस्थितीत विरोधकांमध्ये भीतीचे, दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यातून काही पक्ष फुटून भाजपमध्ये सामील झाले किंवा भाजपसोबत गेले. अन्य पक्षांतील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील आवाज क्षीण झाला होता. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासारखे काही नेते वगळता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कुणी फारसे बोलत नव्हते. तिसऱ्या टर्ममध्येही केंद्रात भाजपची सत्ता आली. पण, त्यांना बहुमत मिळाले नाही. त्यामुळे विरोधकांचा आवाज वाढला. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या आवाजाला धार चढली.

गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरण देशभरात गाजले होते. सोहराबुद्दीन हा लष्करे तैय्यबाचा अतिरेकी आहे, असे गुजरात 'एटीएस'चे म्हणणे होते. पोलिसांनी केलेले त्याचे एन्काऊंटर त्यावेळी गुजरातचे गृहराज्यमंत्री असलेल्या अमित शाह यांना भोवले होते. त्यांना 'सीबीआय'ने अटक केली होती. तीन महिने कारागृहात राहिल्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन दिला, मात्र दोन वर्षांसाठी गुजरातमधून तडीपार केले होते. यादरम्यान ते मुंबई, दिल्लीत राहिले. न्यायालयाच्या परवानगीने त्यांनी 2012 मध्ये गुजरात विधानसभेची निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणातील सर्व आरोपींची सुटका झाली होती.

हा सर्व इतिहास पाठिशी असणाऱ्या अमित शाह यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी 'ईडी'ने शिखर बँक प्रकरणात शरद पवार यांचा उल्लेख केला होता. त्यावेळी पवारांनी तो डाव उलटवून लावला होता. चौकशीसाठी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यामळे प्रशासनाची तारांबाळ उडाली होती. कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पवारांनी 'ईडी'च्या कार्यालयात जाऊ नये, असे आवाहन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन केले होते. ते मान्य करत ते 'ईडी'च्या कार्यालयात गेले नव्हते. मात्र, आपण मोदी, शाह आणि त्यांच्या तपासयंत्रणांना घाबरत नाही, असा संदेश त्यांनी दिला होता. संबंध नसतानाही शिखर बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार यांचे नाव आले होते. त्यावरून हे प्रकरण तापले होते.

त्या प्रकरणाचा शरद पवार यांना फायदाचा झाला होता. या वयातही आपला नेता लढू शकतो, असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला होता. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा परिणाम दिसून आला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शरद पवारांवर मर्यादा सोडून केलेली टीका भाजपच्या अंगलट आली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही भाजपने त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पवारांनीही त्याला तोडीसतोड उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अमित शाह यांना न्यायालयाने तडीपार केले होते. आपल्यावरीवल टीकेला उत्तर देताना शरद पवार यांनी त्याचा उल्लेख करत खरपूस समाचार घेतल्यामुळे अमित शाह यांच्या ती जिव्हारी लागली असणार. शरद पवार यांची ही टीका भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करणारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देणारी ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT