Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati : शंकराचार्य आले अन् भाजप, शिंदे गटाची झोप उडवून गेले!

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde, BJP : उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले, हे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने तयार केलेले नॅरेटिव्ह शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या एका वक्तव्याने मोडित निघाले आहे.
Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
Shankaracharya Avimukteshwaranand SaraswatiSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. गेल्या पाच वर्षांपासून भाजप आणि त्यानंतर दोन-अडीच वर्षांपासून शिंदे गटाकडून तयार करण्यात आलेल्या नॅरेटिव्हला मोठा तडा गेला आहे.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे सोमवारी 'मातोश्री'वर गेले होते. तेथे त्यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात झाला असून, ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय हे दुःख दूर होणार नाही. जो विश्वासघात करतो, तो हिंदुत्ववादी नसतो, असे विधान केले.

आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकराचार्य यांनी केलेले हे विधान भाजप आणि शिंदे गटाची झोप उडवणारे ठरणार असल्याची चर्चा आहे.

शिवसेना-भाजपची 2019 मध्ये युती तुटली. प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद असा शब्द देऊन भाजपने नंतर त्याचा इन्कार केला, असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे होते. यावर ते अद्यापही ठाम आहेत. बाळासाहेबांच्या खोलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह Amit Shah यांनी असा शब्द दिला होता. तसेच निवडणुकीत भाजपने अनेक ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही ठाकरेंनी केला.

त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, अशी टीका भाजपकडून सुरू झाली. या सरकारमध्ये अडीच वर्षे मंत्री राहिलेले एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले, त्यांनीही हीच कारणे दिली. आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या विधानामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या नॅरेटिव्हला मोठा तडा गेला आहे.

उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी हिंदुत्व सोडले, बाळासाहेबांचे विचार सोडले, असा प्रचार भाजप आणि शिंदे गटाकडून सातत्याने करण्यात आला. मात्र त्याचा म्हणावा तितका परिणाम झाला नाही, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसून आले.

भाजप आणि शिंदे गटाचे लक्ष्य मुंबई महापालिका आहे. लोकसभेत उद्धव ठाकरेंच्या विरोधात नॅरेटिव्ह सेट करूनही महायुतीला मुंबईतील सहापैकी फक्त दोनच जागा जिंकता आल्या. उद्धव ठाकरे यांनी हिदुत्व सोडले, याची प्रचीती एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अडीच वर्षांनंतर कशी आली, असाही प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झाला.

महाविकास आघाडीच्या आधीच्या युती सरकारमध्येही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. त्यावेळी एकदा ते भर कार्यक्रमात भाजपसोबत काम करू शकत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला होता, हेही लोकांच्या स्मरणात आहे.

Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
Pooja Khedkar : IAS अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा दणका! जिल्हा प्रशिक्षण तत्काळ थांबवलं

भाजप आणि शिंदे गटाने तयार केलेल्या नॅरेटिव्हच्या विरोधात शंकाराचार्यच बोलले आहेत. त्यामुळे भाजप, शिंदे गटाची मोठी अडचण झाली आहे. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही. विश्वासघात सहन करणारा हिंदू असतो, असे ते म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला असून महाराष्ट्राची संपूर्ण जनता त्यामुळे दुःखी आहे. निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला आहे, त्यामुळे ठाकरे यांच्यासोबत विश्वासाघात झाल्याचे महाराष्ट्रातील जनतेलाही पटले आहे, असेही शंकराचार्य म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या गटाचा एखादा नेता असे बोलला असता तर भाजप, शिंदे गट त्यावर तुटून पडले असते. मात्र इथे शंकराचार्य असल्यामुळे त्यांची अडचण झाली. तरीही आशिष शेलार बोलले, मात्र त्यांनी शंकराचार्य यांच्यावर बोलणे टाळले. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले, याचा पुनरुच्चार शेलार यांनी केला.

Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
MIM In Ahmednagar : असदुद्दीन ओवैसींचा आदेशच घेऊन जिल्हाध्यक्ष परतले; 'एमआयएम' आता धडकी भरवणार

शिंदे गटाचे नेते संजय निरुपम Sanjay Nirupam यांनी शंकराचार्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विश्वासघाताचा धर्माशी संबंध काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री कोण होणार, हे जनता ठरवेल, असेही ते म्हणाले आहेत. शंकराचार्य हे श्रद्धेचे पद आहे, त्यांनी राजकीय भाष्य केले, त्यावर आमचा आक्षेप आहे, असा सांगायलाही निरुपम विसरले नाहीत.

शंकराचार्य आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर महंत नारायणगिरी यांनी आक्षेप घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला धोका दिला, अन्यथा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते, असे महंत नारायणगिरी म्हणाले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. त्यावेळी फडणवीस यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी होती, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले, अशी वक्तव्ये भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून सातत्याने केली जात आहेत. आणीबाणीच्या मुद्द्यावरून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी बाळासाहेब ठाकरे यांचे सौर्हादाचे संबंध होते.

1977 मध्ये झालेल्या मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी मुरली देवरा यांना पाठिंबा दिला होता. या बाबी जगजाहीर आहेत. मग काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्याने हिंदुत्व सोडले, असे कसे म्हणता येईल? लोकांना हे कळले आहे. आता शंकराचार्यही बोलल्यामुळे भाजप आणि शिंदे गटाची झोप उडणे साहजिक आहे.

Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati : कोण आहेत अविमुक्तेश्वरानंद सरस्वती? ठाकरेंच्या भेटीनंतर वादाची ठिणगी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com