महापालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांच्या पुढाकाराने काँग्रेसने दीक्षाभूमी ते सेवाग्राम अशी संविधान सत्याग्रह यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे नेतेही सहभागी झाले होते. यावर वर्धा आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी काँग्रेसला निवडणूक येते तेव्हाच संविधान आठवते, संविधान धोक्यात असल्याचे जाणवते असा टोला लगावला.
काँग्रेस सर्वाधिक काळ सत्तेत होती. त्यावेळी त्यांना संविधान आठवले नाही. त्यांची वागणूकही घटनेनुसार नव्हती. त्यामुळे जनतेनी त्यांना खाली खेचले. यापूर्वीच लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी संविधान धोक्यात असल्याचे नॅरेटिव्ह निर्माण करून जनतेची दिशाभूल केली होती. यात त्यांना एकदा यश मिळाले. आता मात्र त्यांचा अजेंडा जनतेला ठवूक झाला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला त्यांची जागा दाखवून दिली आहे. असे असतानाही पुन्हा तेच तेच मुद्दे घेऊन काँग्रेस येत आहे. सेवाग्रामच्या नावने यापूर्वीसुद्धा काँग्रेसने अनेक यात्रा काढल्या आहेत. मात्र सेवा ग्रामचा खरा विकास कोणी केले हे वर्धा जिल्ह्यातील सर्व जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे आता कितीही यात्रा काढल्या तरी त्याचा काही परिणाम होणार नासल्याचा दावाही पकंज भोयर यांनी केला. आय लव्ह मोहम्मद असे फलक सध्या सर्वच शहरात झळकत आहेत. यावर पोलिसांचे लक्ष आहे.
महाराष्ट्रात शांतता बिघडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकामार्फत केला जात आहे. अहिल्यानगरमध्ये चुकीच्या पद्धतीने रांगोळी काढण्यात आली त्यावरून वाद निर्माण झाला होता. एका व्यक्तीला अटक करण्यात आली. जनतेच्या रोषामुळे वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू न, शांतता राखावी असे आवाहन पंकज भोयर यांनी नागरिकांना केले आहे. विशेष म्हणजे तुषार गांधी यांच्या संविधान सत्याग्रह यात्रेत व्होटचोरीचा मुद्दा घेण्यात येणार आहे. दोन ऑक्टोबरला सेवाग्राम येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. समारोपाला शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले आहे.