आमदार म्हणून नव्हे, सालदार म्हणून मतदारसंघाची सेवा केली :  नारायण कुचे

..
kuche-narayan-7
kuche-narayan-7

बदनापूर : गेल्या निवडणुकीत मी नवखा होतो, मतदारसंघात कामही नव्हते तरी तुम्ही मला निवडूण दिले. मागील पाच वर्षात मला पदोपदी याची जाणीव राहीली. आमदार म्हणून नाही, तर सालदार म्हणून मतदारसंघाची इमाने-इतबारे सेवा केली आहे. आता जुन्याच सालदाराला पुन्हा साल वाढवून देत विकासकामांच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन नारायण कुचे यांनी केले.

भाजप- शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा आमदार नारायण कुचे यांनी रविवारी (ता. 13) बाजार गेवराई गटातील ढासला, पिरवाडी, मालेवाडी, सोमठाणा, रामखेडा, अकोला, निकळक, उज्जैनपुरी, हिवरा, नजिकपांगरी, भराडखेडा या गावात प्रचार फेरी काढली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने ढोल-ताशे आणि महिलांना औक्षण करून त्यांचे स्वागत केले.

यावेळी बोलतांना कुचे म्हणाले, मी आमदार नव्हे तर सालदार म्हणून मागील पाच वर्षे आपली इमाने - इतबारे सेवा केली. मी भेट देत असलेल्या प्रत्येक गावात काही ना काही विकास योजना दिलेल्या आहेत. आपल्याकडून होत असलेले स्वागत त्याचेच द्योतक आहे.

ग्रामिण भागातील माझ्या माता- भगिनींच्या आर्थिक संपन्नतेसाठी गृह व लघु उद्योगाच्या योजना आणणार आहे. मतदार संघातील प्रत्येक तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगाच्या योजना कार्यान्वित करणार आहे. मागील 35 वर्षांत झाला नाही एव्हढा विकास मागील पाच वर्षांत केला. यासाठी विरोधक सांगतील त्या व्यासपीठावर बसून छातीठोकपणे सांगण्यास तयार असल्याचे कुचे यांनी ठामपणे सांगितले.

विरोधक दोनदा पराभूत झाल्याने भावनिक भांडवल करीत आहेत. मात्र मतदार संघातील जनतेला रडणारा नव्हे तर लढणारा आमदार हवा आहे. यापुढे आपण मला पुन्हा संधी दिल्यास तुमचा सालदार म्हणून पुन्हा विकासाचे नवे पर्व सुरू केल्याशिवाय राहणार नाही,असा विश्‍वास देखील कुचे यांनी व्यक्त केला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com