सोनिया व राहूल गांधींनी पुन्हा रजनी पाटलांवरच विश्वास दाखवला

‘यु आर माय लॉयल सोल्जर’ असे म्हणत (congress President Soniya Gandhi) सोनिया गांधी यांनी रजनी पाटील (Rajani Patil) यांच्या डोक्यावर आणि पाठीवर हात फिरवला होता.
Rajani Patil With Soniya, Rahul Gandhi
Rajani Patil With Soniya, Rahul Gandhisarkarnama

बीड : सोनिया गांधींनी राजकारणात पाऊल टाकल्याच्या दिवसापासून त्यांच्या साथीदार असलेल्या व सोनियांसह राहूल गांधी यांच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या जम्मू काश्मिर काँग्रेस प्रभारी माजी खासदार रजनी पाटील यांना काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. गांधी व पाटील यांच्यात राजकारणाच्या पलिकडे असलेल्या अपुलकीच्या नात्यांचा प्रत्यय अनेक वेळा आलेला आहे.

तीन वर्षांपूर्वी एका प्रसंगात ‘भविष्यातही तुमची काळजी घेऊ’असे आपुलकीने सोनिया गांधींनी डोक्यावर व पाठीवर हात ठेवून रजनी पाटलांना सांगीतले होते. अखेर त्यांची काळजी या निमित्ताने गांधींनी घेतली आहे. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी रजनी पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकूल वासनिक यांनी तसे पत्र प्रसिद्ध केले असून त्यात ‘सोनिया गांधी यांच्या मान्यतेने उमेदवारी’असा स्पष्ट उल्लेख आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या यादीत रजनी पाटील यांचे नाव आहे. मात्र, तांत्रिक मुद्द्याने लांबलेल्या या नियुक्त्यांमुळे सोनिया गांधी यांनी संधी उपलब्ध होताच ती रजनी पाटील यांना दिली आहे.

गांधी घराण्यातील माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा थोडासा सहवास लाभलेल्या रजनी पाटील यांना दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींच्या काळात देखली एनएसयुआय मध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी एकदा राजीव गांधींचा केज दौराही घडविला होता. त्यावेळीच प्रथम त्यांची सोनिया गांधींशी भेट आणि ओळख झाली.

सोनिया गांधी यांनी राजकारणात पाऊल ठेवण्याच्या पहिल्या दिवशीपासून सोनिया गांधींच्या खास साथीदारांमध्ये गणल्या गेलेल्या रजनी पाटील राहूल गांधी पक्षाध्यक्ष झाल्यानंतरच्या कार्यक्रमांत त्यांच्या रांगेतही आढळल्या. तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी 'बीडकी बेटी अबकी बार केवल सांसदही नही, बल्की मंत्री बनेगी', असे जाहिर केलेले असतानाही त्यांनी सोनिया गांधींची साथ दिली आणि त्या सोनिया गांधींच्या गुडबुकमध्ये पोचल्या.

‘एनएसयुआय' च्या राज्य आणि राष्ट्रीय सचिव, पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्या, कॉंग्रेसच्या महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा, महिला प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षा, खादी ग्रामोद्योग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या आणि देशभर राबता असलेल्या केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळालेला आहे. ही सर्वच पदे त्यांना राजीव गांधी आणि सोनिया गांधीमुळेच मिळालेली आहेत.

Rajani Patil With Soniya, Rahul Gandhi
मला सगळं माहीत आहे; उमेदवारीसाठी मुंबईला कुणी येऊ नका : अजितदादांची तंबी

गांधींमुळे पदे मिळाली असली तरी सोनिया गांधींचा त्यांच्यावर असलेला जिव्हाळा अनेक प्रसंगांतून समोर आलेला आहे. मागच्या राज्यसभा टर्ममध्ये लोकसभेच्या सेंट्रल हॉलमधून सोनिया गांधी त्यांना न्याहळत असल्याचे लक्षात आल्याने त्या लगबगीने सोनिया गांधींकडे गेल्या. मात्र, घाईत त्यांची पर्स आणि मोबाईल कुमारी शैलजा यांच्याजवळच राहीला. राज्यसभेत कामाची संधी दिल्याबद्दल धन्यवाद म्हणत असताना ‘चला गाडीत बोलू’म्हणत सोनियांनी त्यांना आपल्या वाहनातून थेट दहा जनपथ या घरी नेले.

राज्यसभेतील कामात काही चुक झाली का, या प्रश्नावर ‘तुमचे काम उत्तम आहे, मी, राहूल आणि पक्षाकडे त्याची नोंद असून भविष्यातही आम्ही तुमची काळजी घेऊ असे म्हणू ‘यु आर माय लॉयल सोल्जर’अशी शाबासकी देत त्यांच्या डोक्यावरुन आणि पाठीवरुन आपुलकीचा हात सोनियांनी फिरवला होता. एवढेच नाही तर पर्स विसरलेली असल्याने सोनियांनी त्यांना चक्क आपल्या चालकाकडून घेऊन टॅक्सीला पैसे दिले.

युनोमध्ये प्रतिनिधीत्व केले..

विशेष म्हणजे सोनिया गांधी त्यांना आपुलकीने अरे तुरे बोलतात आणि रजनी अशीच हाक देतात. तसे मागच्या वेळी सोनिया गांधी यांनी रजनी पाटील यांना काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारीणीवर कायम निमंत्रीत सदस्यपदासह हिमाचल प्रदेश काँग्रेस व आता जम्मू काश्मिर काँग्रेस प्रभारीपदाची जबाबदारी सोपविलेली आहे.

यापूर्वी लोकसभेच्या आखाड्यातही त्यांनी दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांच्यावर विजय मिळविलेला असून राज्यसभेवरही कामाचा त्यांना अनुभव आहे. विशेष म्हणजे युनोमध्येही त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. रजनी पाटील यांच्या पुढाकाराने आठवडाभरापूर्वीच राहूल गांधी यांचा जम्मू काश्मिर दौरा झाला. हा दौरा आणि रजनी पाटील यांचे भाषण चर्चेत असतानाच आता राहूल व सोनिया गांधी यांनी त्यांना राज्यसभेवर पुन्हा संधी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com