मला सगळं माहीत आहे; उमेदवारीसाठी मुंबईला कुणी येऊ नका : अजितदादांची तंबी

आपण अजितदादांसोबत आहोत
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : वयस्कर लोकं म्हणतात शेवटची निवडणूक आहे संधी द्या. मध्यमवयीन म्हणतात पाचव्यांदा, सहाव्यांदा मुलाखत देतोय संधी द्या, तर युवक म्हणतात युवा चेहरे द्या. पण आम्हाला ४७६ मधून २१ संचालक निवडायचे आहेत. कुणीही उमेदवारी मागायला मुंबईला येऊ नका, मला सगळं माहीत आहे. मी 1991 पासून हेच करतोय. नव्या व जुन्यांचा मेळ घालत सर्व समाजघटकांना योग्य प्रतिनिधित्व देऊ. मात्र उरलेल्यांनी नाराज होऊ नका. काहींना इतर संस्थांवरही संधी मिळू शकते. माझ्यावर, संजय जगताप, मकरंद पाटील यांच्यावर विश्वास ठेवा आणि एकोप्याने पवारसाहेबांच्या विचारांचे पॅनेल निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. (Ajit Pawar warns No one come to Mumbai to seek candidature)

दरम्यान, माळेगाव कारखान्यात स्वतःच्या ताकदीवर आलेल्यांनी साखर गटारात वाहायला लावली पण विचारणार कोण? याउलट माझ्या नेतृत्वाखालील पदाधिकारी चुकले तर मी जाब विचारतो, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

Ajit Pawar
‘मालिकेत काम देतो,’ असे सांगून मनोहर भोसलेने केला बलात्कार

सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर पॅलेसमध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सभासद व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या प्रसंगी माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, तालुक्याच्या सभापती नीता फरांदे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, दिगंबर दुर्गाडे, माणिकराव झेंडे, आर. एन. शिंदे, नंदकुमार जगताप उपस्थित होते.

पवारांना सहकार मोडीत काढायचा आहे, हे धांदात खोटे

पवार म्हणाले, सहकार चळवळ पवारांना मोडीत काढायची आहे हे धादांत खोटे आहे. उलट सातत्याने सहकार टिकावा यासाठी सहवीजनिर्मिती, डिस्टिलरीला प्रोत्साहन देत आहे. डिस्टिलरी उभारायला काही भागभांडवल व हमी राज्य सरकारच्या वतीने देत आहोत. मंत्रिपरिषदेत सहकाराच्या हिताचे निर्णय घेतो. आमचे चुकले तर पवारसाहेब जाब विचारतात. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दर दोन महिन्यांना पवारसाहेबांना कामाची माहिती द्यावी लागते. त्यामुळे कुणी काहीही बोलेल त्यावर विश्वास ठेवू नका. प्रचारासाठी मी स्वतः काही दिवस देणार आहे, असे सांगून निवडणुकीचेच संकेत पवार यांनी दिले. रामराजे निंबाळकर, संजय जगताप, मकरंद पाटील यांनाही विचारात घेऊन पॅनेल करणार आहोत त्यावर विश्वास ठेवा.

विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखालील सरकारने सहकारी कारखाने द्यायचे नाहीत, असा निर्णय घेतला. त्यानंतरच्या सर्व सरकारांनी तो कायम ठेवला. राज्य सरकारच्या भागभांडवलाशिवाय ते उभे राहू शकत नव्हते. आता शेतकरी एकत्र येऊन खासगी कारखाने सुरू करतात. पण अनेक लोक आमच्यावरच सहकार चळवळ मोडीत काढतात, अशी साफ धादांत खोटी टिका करतात. उलट सहकारमंत्र्यांसह अनेकांना घेऊन सहकारी कारखानदारीला प्रोत्साहन देतो. मंत्रिपरिषदेत सहकाराला कशी मदत करता येईल, अडचणीतून कसा मार्ग काढता येईल, याचा प्रयत्न करतो. आता इथेनॉल प्रकल्प उभारणीला हमी देण्याचा, भागभांडवल उभारायला मदत करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

Ajit Pawar
अजित पवारांची मोठी घोषणा : ‘माळेगाव’चा पुढचा अध्यक्ष तावरे आडनाव सोडून असेल!

पंधरा दिवसांत उसाच्या बिलाची मागणी असते. पण, त्यापासूनच्या साखरेचे पैसे मिळायला वर्ष जाते. रोज शंभर किलोच्या पोत्यावर एक रूपया व्याज जातं. काही वेळा वर्षात ३६५ रूपये व्याज जातं. शेवटी ते शेतकऱ्यांच्या भावातूनच वजा होते. गुजरातमध्ये ऊस गेल्यावर पहिले पेमेंट घेते, दुसरे पेमेंट कारखाना बंद झाल्यावर आणि दिवाळीला तिसरे पेमेंट घेतात. आपल्याकडे मात्र कारखाना हंगाम सुरू होण्याआधीच तोडणी-वाहतुकीला कर्जाची उचल करतात. काही महाभाग मोलासेस, साखरेवर उचल घेतात. असे शंभर कारखाने आहेत. सभासदांनी हे विचारात घ्यावे, अशा शब्दांत अजित पवार यांनी गुजरात पॅटर्नचे कौतुक करत एफआरपी तीन टप्प्यांत देण्याच्या मुद्द्यावर अप्रत्यक्षपणे आपले मतच व्यक्त केले.

दरम्यान आमदार संजय जगताप यांनी, सोमेश्वरच्या निवडणुकीत आपण अजितदादांसोबत आहोत, अशी ग्वाही दिली. तसेच, पुरंदर तालुक्याला सभासद संख्येच्या तुलनेत चांगल्या संख्येने प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणीही केली.

‘माळेगाव’ कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी, माळेगाव चुकीच्या हातात गेल्यामुळे आज माळेगाव भावात कमी पडला आहे. आता आमची सत्ता आल्यावर सुधारणा करत आहोत. दुसरीकडे सोमेश्वर कारखान्यावर अजितदादांचे नेतृत्व असल्याने कारखाना भावात आमच्या पुढे गेला असे कौतुक केले. ‘सोमेश्वर’चे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी, पवारसाहेब व अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर कारखाना कर्जमुक्त झाला आणि राज्यात अग्रेसर बनला आहे असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com