
कायदेतज्ज्ञ, भाजपचे मुरब्बी राजकीय नेते अरुण जेटली यांचं निधन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग चार ट्वीट करून त्यांना आदरांजली वाहिली, आपल्या भावना व्यक्त केल्या. मी माझा मित्र गमावला, असे मोदी म्हणाले होते. जेटली हे पंतप्रधान मोदी यांच्यासाठी, त्यांच्या पक्षासाठी किती महत्वाचे होते, हे यावरून लक्षात यायला हवं. विद्यार्थी चळवळीतून अरुण जेटली यांचं नेतृत्व बहरलं. वकिली व्यवसायासह त्यांनी राजकारणातही चांगलाच जम बसवला होता. देशाच्या राजकारणातील प्रभावी राजकीय व्यक्तिमत्व, अशी अरुण जेटली यांची ओळख आहे.
महाराज किशन जेटली आणि रत्नप्रभा जेटली यांच्या पोटी 28 डिसेंबर 1952 रोजी अरुण जेटली यांचा जन्म झाला. त्यांचे वडील वकील होते. नवी दिल्लीतील सेंट झेवियर्स स्कूलमधून त्यांचं शालेय शिक्षण झालं. दिल्लीतील प्रसिद्ध अशा श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून 1977 मध्ये त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. अभ्यासासह अन्य उपक्रमांतही त्यांनी चमक दाखवली होती. 1974 मध्ये ते दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बनले. त्यांचा विवाह 24 मे 1982 रोजी संगीता डोग्रा यांच्याशी झाला. रोहन आणि सोनाली अशी त्यांची दोन अपत्ये आहेत.
अरुण जेटली हे लहानपणापासूनच हुशार, चाणाक्ष होते. महाविद्यालयीन जीवनात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे एबीव्हीपीचे नेते होते. दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंनतर वडिलांप्रमाणे त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला. या क्षेत्रात त्यांचा नावलौकिक झाला होता. पेप्सिको - कोका कोला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात त्यांनी पेप्सिकोची बाजू मांडली होती. 2009 मध्ये त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस बंद केली होती. त्यापूर्वी 2000 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती.
आणीबाणीच्या विरोधात झालेल्या आंदलोनानं देशाला अनेक नेते दिले. अरुण जेटली यांचाही त्यात समावेश होतो. जयप्रकाश नारायण यांनी पुकारलेल्या आंदोलनात अरुण जेटली यांचा सक्रिय सहभाग होता. आणीबाणीत त्यांना 19 महिने कारागृहात राहावं लागलं होतं. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांनी जे ट्वीट केले होते, त्यात याचा उल्लेख होता. त्यांच्या विद्यार्थी चळवळीतील सहभागाचाही मोदी यांनी उल्लेख केला होता. 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यावेळी अरुण जेटली हे दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते.
आणीबाणी जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी अरुण जेटली यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली होती. त्यावेळी 200 विद्यार्थी जमले होते. या विद्यार्थ्यांसमोर त्यांनी घणाघाती भाषण केलं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना तिहार कारागृहात ठेवण्यात आलं. या कारागृहात त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, के. आर. मलकानी यांच्यासह एकूण 11 नेत्यांना ठेवण्यात आलं होतं. या नेत्यांचा सहवास त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला.
अरुण जेटली यांना अटक झाली त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 25 जून 1975 रोजी पोलिस त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. त्यावेळी ते अंगणात झोपेलेले होते. बाहेर कसला तरी आवाज येत असल्यानं ते जागी झाले. घराच्या बाहेर त्यांचे वडिल आणि काही पोलिस कर्मचाऱ्यांमध्यै वाद सुरू असल्याचं त्यांना दिसलं. त्यामुळं मागच्या दरावाजानं ते बाहेर पडले. त्याच गल्लीतील मित्राच्या घरी ते रात्रभर राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता एबीव्हीपीच्या 200 विद्यार्थ्यांना त्यांनी कुलगुरुंच्या कार्यालयाबाहेर जमा केलं होतं.
अरुण जेटली हे तिहार तुरुंगातून 11 महिन्यांनंतर बाहेर पडले. तुरुंगात ते दिग्गज नेत्यांच्या सहवासात राहिले होते, त्यांच्याशी चर्चा केली होती. बाहेर आल्यानंतर त्यांनाही राजकीय क्षेत्राचा ओढा लागला. आपली पुढील कारकीर्द राजकीय क्षेत्रातच करण्याचा निर्णय त्यांनी त्यावेळी घेतला. आणीबाणी उठवल्यानंतर लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. जनता पार्टीच्या प्रचारासाठी लोकतांत्रिक मोर्चाची स्थापना करण्यात आली होती. अरुण जेटली यांना या मोर्चाच्या संयोजकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
भारतीय जनता पक्षाची स्थापना 1980 मध्ये झाली. त्यानंतर अरुण जेटली हे भाजपमध्ये गेले. 1980 च्या दशकातच जेटली यांनी वकिली व्यवसाय सुरू केला होता. ट्रायल कोर्ट, दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही त्यांनी प्रॅक्टिस केली, ते वरिष्ठ अधिवक्ता बनले. वयाच्या 37 व्या वर्षी ते अॅडिशनल सॉलिसिटर जनरल बनले होते. याच काळात त्यांचा संगीता डोग्रा यांच्याशी विवाह झाला. जम्मू-काश्मिरमधील काँग्रेसचे नेते गिरधारीलाल डोग्रा यांच्या त्या कन्या.
लग्न झाल्याच्या पुढच्याच वर्षी जेटली हे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल बनले. त्यावेळी विश्वनाथ प्रताप सिंह हे पंतप्रधान होते. त्या काळात बोफोर्स प्रकरण गाजत होते. जेटली अॅडिशनल सॉलिसिटर जनरल असतानाच हा खटला सुरू झाला होता. त्यानंतरच्या काही वर्षांत जेटली यांच्या राजकीय कारकीर्दीला वेग मिळायला सुरुवात झाली होती. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 1991 मध्ये त्यांचा प्रवेश झाला. 1998 मध्ये भारतीय शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्रात पाठवण्यात आलं होतं. त्यात अरुण जेटली यांचा समावेश होता. अंमली पदार्थ आणि मनी लॉँड्रिंगशी संबंधित कायद्यांना त्याच अधिवेशनात मंजुरी मिळाली होती.
वकिली, राजकारणाप्रमाणेच अरुण जेटली यांना क्रिकेटमध्येही रस होता. ते 1999 मध्ये दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनले. 2009 मध्ये ते बीसीसीआयचे उपाध्यक्ष बनले. 1999 मध्ये केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार बनलं होतं. त्या सरकारमध्ये जेटली यांना संधी मिळाली. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार त्यांना मिळाला. नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या निर्गुंतवणूक खात्याचंही राज्यमंत्रिपद त्यांना देण्यात आलं होतं.
वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात प्रख्यात वकील राम जेठमलानी यांचा समावेश होता. जेठमलानी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विधी व न्याय मंत्रालयाची जबाबदारी जेटली यांना सोपवण्यात आली होती. 2009 ते 2014 या कालवधीत जेटली हे राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांची कामगिरी चांगली राहिली होती. हजरजबाबीपणा आणि खिळवून ठेवणारी वक्तृत्वशैली, अभ्यासू मांडणी ही त्यांची वैशिष्ट्यं होती.
केंद्रात 2014 मध्ये भाजपची सत्ता आली आणि नरेंद्र मोदी पतप्रधान बनले. मोदी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांना स्थान मिळणे निश्चित होते. त्यानुसार जेटली यांना माहिती व प्रसारण मंत्री बनवण्यात आलं. नंतर त्यांना अर्थ मंत्रालय आणि त्यानंतर काही कालावधीसाठी संरक्षण मंत्रालयाचीही जबाबदारीही सोपवण्यात आली होती. यादरम्यान त्यांनी अमृतसर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. 2000 ते 2018 पर्यंत ते गुजरातमधून राज्यसभेवर गेले. त्यानंतर ते उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर गेले होते.
मोदी सरकारचे संकटमोचक, अशी प्रतिमा अरुण जेटली यांची होती. सरकारवर एखादे संकट आले किंवा विरोधकांकडून आरोप झाले तर बचावासाठी हमखास अरुण जेटली हेच समोर यायचे. सरकारवरचे आरोप फेटाळूव लावताना त्यांची मांडणी अभ्यासू असायची. 2014 ते 2019 दरम्यान ते केंद्रीय अर्थमंत्री होते. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यांच्या निर्णयावर विरोधकांकडून चौफेर टीका करण्यात आली होती. त्यावेळी अर्थमंत्री असलेल्या जेटली या निर्णयाची अंमलबजावणी पार पाडत मोर्चा सांभाळला होता. ते अर्थमंत्री असतानाच जीएसटी विधेयक मांडण्यात आलं होतं.
अरुण जेटली यांच्या पत्नी संगीत डोग्रा यांचे वडिल गिरधारीलाल डोग्रा हे काँग्रेसचे नेते होते. जम्मूमधून ते दोनवेळा लोकसभेत गेले होते. जम्मू काश्मीरचे ते मंत्रीही होते. त्यांच्या लग्नाला इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी उपस्थित राहिले होते. अरुण जेटली त्यावेळी प्रख्यात वकील होते. त्यांना उंची घड्याळांची आवड होती. कपडे, गॉगल, बूटच्या बाबतीतही ते असेच चोखंदळ होते. अनेक उंची वस्तूंचा त्यांच्याकडे संग्रह होता. खाण्याचेही ते शौकीन होते. जुन्या दिल्लीतील जिलेबी, कचोरी, रबडी, फालूदा हे त्यांचे काही आवडते खाद्यपदार्थ.
व्ही. पी. सिंह यांचे सरकार असताना 1989 मध्ये वयाच्या 37 व्या वर्षी अॅडिशनल सॉलिसिटर जनरल बनलेल्या जेटली यांनी बोफोर्स प्रकरणाच्या तपासात महत्वाची भूमिका बजावली. ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत तपासासाठी ते स्वीत्झर्लंड आणि स्वीडनला अनेकवेळा जाऊन आले होते. मात्र त्यांच्या हाती ठोस असे पुरावे लागले नव्हते. 1991 च्या लोकसभा निवडणुकीत ते दिल्ली मतदारसंघात लालकृष्ण अडवानी यांचे एजंट होते. 90 च्या दशकात दूरचित्रवाहिन्यांचा बोलबाला वाढत होता. त्यामुळे राजकारणाचं स्वरूप बदलत होतं. त्या परिस्थितीत जेटली यांचं महत्व वाढू लागलं होतं.
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याच्या आधीपासूनच त्यांची अरुण जेटली यांच्याशी मैत्री होती. गुजरातेत 1995 मध्ये भाजपची सत्ता आली. त्यानंतर मोदी यांना दिल्लीत पाठवण्यात आलं होतं. त्याचवेळी दोघांची मैत्री झाली होती. चांगले खाणं, चांगले कपडे परिधान करणं याकडं जेटली यांचं बारकाईनं लक्ष राहायचं. तुम्ही कसे बोलता, कोणते कपडे परिधान करता, कुठे राहता, कोणती गाडी वापरता, हे फार महत्वाचे आणि अर्थपूर्ण असते, असे जेटली यांना वाटत असे. यामुळे त्यांच्यावर उच्चभ्रू असा शिक्का बसला आणि ते भाजपचे अध्यक्ष बनू शकले नाहीत, असं सांगितलं जातं.
2011 मध्ये विकीलिक्स गाजत होते. त्यावर्षी द हिंदू या इंग्रजी दैनिकात विकीलिक्सचा एका भाग प्रसिद्ध झाला होता. दिल्लीस्थित एका अमेरिका राजनयिकाने दावा केला होता, की हिंदू राष्ट्रवाद हा भाजपसाठी केवळ राजकारणाचा, निवडणूक जिंकण्याचा मुद्दा आहे, असे जेटली म्हणाले होते. त्यामुळे गोंधळ उडाला होता. विकीलिक्सच्या काही भागांमुळं भाजपनं काँग्रेसला घेरलं होतं. जेटली यांच्या कथित वक्तव्यामुळं भाजपची कोंडी झाली होती. नंतर जेटली यांनी आपण तसं बोललोच नव्हतो, असं स्पष्टीकरण दिलं होतं.
अरुण जेटली हे लोकनेते बनू शकले नाहीत. उत्कृष्ट असं वक्तृत्वकौशल्य असूनही त्यांना मोठा जनाधार मिळाला नाही. त्यामुळं त्यांना नेहमी राज्यसभेवर जावं लागलं. राजकारणात त्यांना अपेक्षेप्रमाणं यश मिळू शकलं नाही. असं असलं तरी ते प्रभावी राजकीय व्यक्तिमत्व होते, हे त्यांनी अनेकवेळा सिद्ध केलं. भाजपच्या अंतर्गत गोटात त्यांचा उल्लेख भावी पंतप्रधान असा केला जायचा. अडवानी यांनी भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जेटली यांनी संधी मिळेल, असं वाटलं होतं, मात्र त्यांची ती संधी हुकली, ती कायमचीच. त्यातच 2005 मध्ये अरुण जेटली गंभीर आजारी पडले. त्यांच्यावर ट्रिपल बायपास सर्जरी करावी लागली.
पुढे 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले. त्या वर्षी झालेल्या निवडणुकीत अरुण जेटली यांचा पराभव झाला होता. तरीही मोदी यांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि संरक्षण, अर्थ अशा महत्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. पुढे ते मोदी सरकारचे संकटमोचक बनले. सध्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे जसे संबंध आहेत, तसेच संबंध त्याकाळी मोदी आणि जेटली यांचे होते. अरुण जेटली हे भाजपच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणातील प्रभावी नेते होते. 24 आगस्ट 2019 रोजी त्यांच निधन झालं. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.