मराठ्यांना जाहीर आवाहन आहे, आपलं साखळी उपोषण, आमरण उपोषण शांततेत सुरू ठेवा. कोणचा अधिकारी अडवीत नाही, काय नाही काय नाही. अधिकाऱ्यांचं राज्य नाही आपलं राज्य आहे. त्याला एकदा गोडीत सांगा नसता मीबी दाकिवतो त्याला कोण आहे त्याला. आपले साखळी उपोषण, आमरण उपोषण सुरू ठेवा आणि आपल्या गावात नेत्यांना नाही येऊन द्यायचं म्हणजे नाही, या दोन भूमिकांवर उद्या ठाम राहा. उद्या संध्याकाळपासून. आत्महत्या एकानंही करायची नाही, तुम्हाला स्पष्ट मराठीत सांगतो आता मराठ्यांना. आत्महत्या करायची नाही आता आपल्याला यांना खेटायचं आहे. भेताडासारखं मरायचं नाही, लढून मरायचं आहे. हे भेताडासारखं करायचं नाही, तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगत आहे, एकानेही उद्यापासून आत्महत्या करायची नाही. उद्या संध्याकाळपासून माझं पाणी सुटलं तर या तीन गोष्टींवर ठाम राहायचं, उद्रेक, जाळपोळ करायची नाही आणि आत्महत्या करायची नाही. हे कसं आरक्षण देत नाहीत आणि कोणाकोणाला आपल्या विरोधात उतरिवतेत ते बघू आपुणबी आता....
गेल्या चार वर्षांपासून थंडावलेल्या, मात्र आता वेग घेतलेल्या मराठा आरक्षण आंदोलन लढ्यात लोकांना आवाहन करणारी ही भाषा आहे. ती प्रमाणभाषा नसेल, मात्र थेट काळजाला भिडणारी आहे, स्फुल्लिंग चेतवणारी आहे. विश्वासाने आपल्या मागं उभं राहिलेल्या लाखो लोकांना शांततेत, अहिंसक आंदोलन करण्याची प्रेरणा देणारी आहे. अशी प्रेरणा देणारा हा कुणी तत्त्ववेत्ता नाही, प्राध्यापक नाही की राजकीय नेताही नाही. हा एक प्रामाणिक, निस्पृह, बारावीपर्यंत शिकलेला साधा माणूस आहे. त्यांचं नाव मनोज जरांगे पाटील. त्यांच्या एका हाकेवर राज्यातील अवघा मराठा समाज त्यांच्या पाठीमागं उभा राहिला आहे.
प्रामाणिकपणा, अहिंसा आणि शांततेत किती ताकद असते हे कफल्लक असलेल्या जरांगे पाटील यांनी गेल्या दोन-तीन महिन्यांत अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा ते चेहरा बनले आहेत. प्रचंड शक्तीशाली असणाऱ्या सरकार नावाच्या यंत्रणेला शिडशिडीत बांध्याच्या जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सळो की पळे करून सोडलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय घराचा उंबरा शिवणार नाही, अशी प्रतिज्ञा घेऊन तीन ते चार महिन्यांपूर्वी ते घरातून बाहेर पडले आहेत. त्यांनी अद्याप घराचा उंबरा शिवलेला नाही. दिवाळीसाऱख्या महत्त्वाच्या सणालाही ते घरी गेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या घरी दिवे पेटले नाहीत, अर्थात दिवाळी साजरी झाली नाही.
दोन टप्प्यांत बेमुदत उपोषण, जनजागृतीसाठी राज्यभरात दौरे आणि लाखोंच्या उपस्थितीत सभा घेतल्यानंतर आता ते पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्यायला मराठा समाजातील काही नेत्यांसह ओबीसी समाजातील काही नेत्यांकडून होणाऱ्या विरोधाला संयतपणे, प्रसंगी आक्रमक होत ते प्रत्युत्तर देत आहेत. मध्यंतरी आंदोलनाला हिसंक वळण लागले. त्यावेळी अनेक नेत्यांनी जरांगे पाटील यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला न जुमानता जरांगे पाटील यांनी ते हल्ले यशस्वीपणे परतवून लावले, वस्तुस्थिती काय हे दाखवून दिले. हल्ले करणाऱ्यांची नावे बीडच्या पोलिस अधीक्षकांना दिली. दिवाळी झाली आणि त्यांचा आवाज आता पुन्हा घुमू लागला आहे.
सरकारने दोन महिन्यांची मुदत मागितल्यानंतर त्यांनी दुसऱ्या टप्प्यातील उपोषण स्थगित केले. त्यानंतर त्यांच्यावर शाब्दिक हल्ले वाढले आहेत. त्यांचा बोलविता धनी कुणीतरी दुसराच आहे, असा आरोप भाजपमधील काही नेत्यांनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही केला आहे. राज ठाकरे यांना जरांगे पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या मोतारी गावाचे. गेवराईत त्यांचे शिक्षण झाले. त्यांना चार एकर शेती होती. त्यापैकी दोन एकर शेती त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या लढ्यासाठी विकली. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी ते १७ वर्षांपूर्वी अंकुशनगर (जि. जालना) येथे स्थायिक झाले. पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडील असं त्यांचं कुटुंब. वडील, पत्नी आणि दोन मुलांसह ते अंकुशनगर येथे राहतात. त्यांनी हॉटेलमध्ये काम सुरू केलं. हे करताना त्यांना मराठा आंरक्षण आंदोलनाची कास सोडली नाही. आंदोलनासाठी त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावाची निवड केली. आंदोलन करणे हा त्यांचा स्थायीभाव राहिला आहे. सुरुवातीला काही काळ त्यांनी काँग्रेस पक्षात काम केलं होतं. काही काळानंतर ते काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली. अत्यंत आक्रमकतेने त्यांनी काम सुरू केलं होतं. मराठा आरक्षणाच्या चळवळीला बळ देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या मालकीची दोन एकर शेतीही विकली. मराठा आरक्षणासाठी यापूर्वीही अनेक आंदोलने झाली. मात्र, मराठा समाजाचा सर्वाधिक विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी कमावला आहे. प्रामाणिकपणाच्या बळावर हे शक्य झाले आहे. मराठा आरक्षण आंदोलनात ते पूर्णवेळ काम करतात. मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू आहे. असे असले तरी सरकारने पुढाकार घेऊन मराठा समाजाची परिस्थिती समजून घ्यावी, या समाजातील तरुणांना न्याय द्यावा, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेवराई, अंबड आणि घनसावंगी तालुक्यांत जरांगे यांचे पाठीराखे मोठ्या संख्येने आहेत. जेथून गोदावरी नदी वाहते, त्या भागाला 'गंगथडी' असे म्हणतात. जरांगे पाटील यांनी हीच संकल्पना राबवून आंदोलनाची व्यूहरचना आखली होती. त्यांनी तब्बल दोन महिने गंगथडीच्या विविध गावांमध्ये सभा घेत मराठा आरक्षणाबाबत जनजागृती केली. त्यांना तब्बल १२३ गावांनी पाठिंबा दिला. त्यानंतर शहागडला 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या वेळेस राज्यातील कोणत्याही तीन मंत्र्यांनी तेथे येऊन निवेदन स्वीकारावं, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती. मात्र, एकही मंत्री आंदोलनस्थळी आले नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे बेमुदत उपोषण सुरू केलं. त्यांच्या या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अंतरवाली सराटी हे छोटंसं गाव या आंदोलनाचं केंद्र बनलं. त्याची धग राज्यभरात वाढत गेली.
अंतरवाली सराटी येथे शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. आंदोलनासाठी तो टर्निंग पॉईंट ठरला. मराठा बांधव पेटून उठले. जरांगे पाटील यांना पाठिंबा वाढू लागला. जालना येथे त्या वेळी शासन आपल्या दरबारी हा कार्यक्रम होता. त्यापूर्वी जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागं घ्यावं, अशी सरकारची इच्छा होती, मात्र त्यांनी उपोषण मागं घेतलं नाही. त्यातूनच लाठीमाराचा प्रकार घडल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि मराठा समाज सरकारविरोधात विधायक मार्गाने आक्रमक झाला. हा लाठीहल्ला करण्याचे आदेश कुणी दिले होते, हे अद्यापही समोर आलेलं नाही. आरक्षण देण्यासाठी सरकारने एक महिन्याची मुदत मागितली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं. त्यांनी स्वतःहून आणखी दहा दिवसांची मुदत वाढवून दिली. या कालावधीत सरकारने काहीही केलं नाही. दरम्यान, या काळात जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र पिंजून काढत जनजागृती केली. चाळीस दिवसांची मुंदत संपल्यानंतर त्यांनी पुन्हा अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केलं. सरकारच्या मध्यस्थीनंतर त्यांनी नवव्या दिवशी उपोषण स्थगित केलं. सरकारने दोन महिन्यांचा अवधी मागून घेतला होता. त्यानुसार २४ डिसेंबरला हे दोन महिने संपणार आहेत. आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची तोफ राज्यभरात धडाडू लागली आहे. परिस्थिती चिघळू लागली आहे. ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास त्यांचा विरोध आहे.
मनोज जरांगे पाटील हे निर्धाराचे पक्के आहेत. काही वर्षांपूर्वी तर ते तब्बल दीड वर्ष घरी आले नव्हते. कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींवर संतप्त कार्यकर्त्यांनी न्यायालयात हल्ला केला होता. त्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल करण्यात आले होते. माझे कार्यकर्ते कारागृहातून बाहेर आल्याशिवाय मी माझ्या घराचा उंबरठा शिवणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी त्यावेळी केली होती. कार्यकर्ते दीड वर्षानंतर कारागृहाच्या बाहेर आले. त्यानंतरच जरांगे पाटील आपल्या घरी गेले होते. आताही त्यांनी तसाच निर्धार केला आहे. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय घराचा उंबरा शिवणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली आहे. दिवाळीलाही ते घरी गेले नाहीत. संघटना बांधणी, आंदोलनाच्या प्रारंभीच्या काळातील जरांगे पाटील यांचा प्रवास अतिशय खडतर होता. संघटनेच्या कामासाठी त्यांना नेहमी प्रवास करावा लागायचा. मात्र त्यासाठीच्या साधनांची कमतरता होती. कार्यकर्त्यांची आर्थिक स्थितीही अगदी बेताचीच. त्यामुळे अडचणी यायच्या. त्यांची इच्छाशक्ती पाहून एखादा मित्र मदत करायचा आणि त्यांचे पुढचे काम सुरू व्हायचे. संघटनेची कामे, आंदोलन करताना जरांगे यांचे जेवणाकडे दुर्लक्ष असते. जेवणाची वाट न पाहता चहा घेऊन ते लगेच पुढच्या कामासाठी निघतात. मिळाले तर खायचे, अन्यथा तसेच पुढे निघायचे, अशी त्यांच्या कामाची पद्धत आहे.
मनोज जरांगे पाटील हे २०११ पासून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या नेतृत्वात २०१४ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चाने अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. मराठा आरक्षणासाठी त्यांनी आतापर्यंत ३५ पेक्षा अधिक आंदोलने केली आहेत, मोर्चे काढले आहेत. जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगावमध्ये २०१२ मध्ये त्यांनी तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन केलं होतं. सहा दिवस उपोषणही केलं होतं. गोरीगंधारी येथे आंदोलन करून त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून दिली होती.
समाजासाठी लढणाऱ्या या योद्ध्याची संभाजीराजे छत्रपती यांनीही उपोषणस्थळी भेट घेतली होती. त्यावेळी जरांगे पाटील यांचे डोळे भरून आले. संभाजीराजे यांनी आपल्या रुमालाने त्यांचे डोळे पुसत, रडायचं नाही, आता लढायचं अशा शब्दांत धीर दिला होता. त्यावेळी जरांगे पाटील यांनी संभीजीराजेंच्या हातात हात देऊन, आरक्षण मिळेपर्यंत आता माघार घेणार नाही, असा निर्धार व्यक्त केला होता. ते निर्धाराचे पक्के आहेत, म्हणून अवघा मराठा समाज त्यांच्यामागे एकवटला आहे. सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्यानंतर जरांगे पाटील यांनी १४ ऑक्टोबरला अंतरवाली सराटी येथे आयोजित केलेल्या सभेत हे चित्र दिसून आलं. या सभेला लाखो लोकांनी स्वखर्चाने उपस्थिती लावली होती.
दुसरं उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. वजन घटलं होतं. काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर ते पुन्हा बाहेर पडले आहेत. राज्यभरात विविध ठिकाणी सभा घेत आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण नको म्हणणारे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर उपोषण सुरू असताना जरांगे पाटील यांनी निशाणा साधला होता. आता काही सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध सुरू केला आहे. हा संघर्ष आता मराठा विरुद्ध ओबीसी असा केला जात आहे की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.
आता जरांगे पाटील यांचे दौरे सुरू झाल्यानंतर छगन भुजबळ हे त्यांच्या विरोधात जास्तच आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. आधी भाजपचे नितेश राणे यांनी जरांगे पाटलांविरुद्ध मोहीम उघडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि प्रकाश शेंडगे यांनी मोर्चा उघडला. त्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भर पडली आहे. जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कुणीतरी आहे आणि त्याचं नाव कालांतराने समोर येईल, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. बारावीपर्यंत शिकलेले जरांगे पाटील हे या सर्व मुरब्बी राजकारण्यांचे हल्ले परतवून लावत आहेत.
बहुतांश राजकीय नेते मराठा समाजातील असतीलही, मात्र मराठा समाजातील सर्वच नागरिक श्रीमंत नाहीत. शेतीची विभागणी झालेली आहे. त्यामुळे बहुतांश जाणांना चार-पाच एकरांपेक्षा अधिक जमीन नाही. त्याच पावसाचा भरवसा नसतो. पिके आली तरी त्याला भाव मिळेल की नाही याची शाश्वती नसते. महागाईचे संकट तर पाचवीला पूजलेलेच आहे. ही परिस्थिती अनुभवल्यामुळेच जरांगे पाटील यांनी हा गरजवंत मराठ्यांचा लढा सुरू केला आहे. हा लढा आता अंतिम टप्प्यात असून, मराठ्यांना लवकरच आरक्षण मिळेल, असा विश्वास जरांगे पाटील व्यक्त करत आहेत. जरांगे पाटील यांच्या लढ्यावर, त्यांच्या निर्धारावर, त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास असलेला गरजवंत मराठा समाज आरक्षणाचा निर्णय केव्हा होईल, याकडे डोळे लावून बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.