Suresh Kalmadi : काँग्रेसमध्ये दहशत असलेले पुण्याचे 'भाई' एका आरोपाने झाले 'क्लीन बोल्ड'

Pune Politics : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कलमाडींना महागात पडला. इथूनच त्यांची राजकीय कारकीर्द उतरणीला लागली. ते जवळपास नऊ महिने तिहार जेलमध्ये होते.
Suresh Kalmadi
Suresh KalmadiSarkarnama

पुण्याच्या राजकीय वर्तुळात काही वर्षांपर्यंत ‘सबसे बडा खिलाडी’ कोण, असा कुणाला प्रश्न विचारला तर आपसूकच तोंडी नाव यायचं ते सुरेश कलमाडी यांचं. त्यावेळी ‘सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी’ हा केवळ नारा नव्हता तर ते उघड सत्य होतं. पुण्याच्या राजकारणातील ‘भाई’ म्हणजेच सुरेश कलमाडी यांना ‘क्लीन बोल्ड’ करणारा नेता ते राजकारणात सक्रिय असेपर्यंत तरी दुसरा कुणी नव्हता. 1995 ते 2007 या काळात काँग्रेसकडं कलमाडींशिवाय दुसरा चेहरा नव्हता. सुरेश कलमाडींची (Suresh Kalmadi) दहशत इतकी होती की त्यांच्या शब्दापलीकडे कुणीही जात नसत. शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवकांचा त्यांच्या समोर थरकाप उडायचा. पण भ्रष्टाचाराचे आरोप झाले अन् भाईंच्या राजकारणाला उतरती कळा लागली.

कॉमनवेल्थ गेम्सने केला खेळ

पुण्यात (Pune) 2009 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ यूथ गेम्स (Commonwealth Youth Games) कलमाडींसाठी टर्निंग पॉईंट ठरल्या. पुण्याचा चेहरामोहरा बदलताना त्यांनी क्रीडानगरी म्हणून पुण्याला नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्यामुळं पुण्यात बालेवाडीसारखं क्रीडा संकुल उभं राहिलं. त्याच जोरावर पुण्यात 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स झाल्या. या स्पर्धेच्या आयोजन समितीचे ते अध्यक्ष होते. यानिमित्तानं त्यांनी पुण्यात कोट्यवधी रुपये आणले. क्रीडानगरी सुसज्ज करण्याबरोबरच पुण्याच्या काही भागांतील रस्ते, सुशोभीकरण अशी अनेक कामं केली. त्यासाठी शहर काँग्रेसच्या (Congress) पदाधिकाऱ्यांनीही झोकून देत काम केलं. पण या गेम्समध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांना महागात पडला. इथूनच त्यांची राजकीय कारकीर्द उतरणीला लागली. ते जवळपास नऊ महिने तिहार जेलमध्ये होते.

Suresh Kalmadi
Balasaheb Thackeray : अन् बाळासाहेब ठाकरेंसाठी अवघी मुंबई थांबली

दबदबा कमी झाला

पुणे काँगेससाठी (Pune Congress) भाई हे नावच पुरेसं होतं. हा दबदबा केवळ कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांवरच नव्हता तर प्रशासनही त्यांना दचकून असायचे. कुशल संघटक म्हणून तर त्यांनी आपली ओळख निर्माण केलीच पण कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून मेहनत घेणारा कार्यकर्ता म्हणूनही ते नावारुपाला आले. त्यामुळेच त्यांच्या शब्दाला किंमत होती. इव्हेंट मॅनेटमेंटमध्येही त्याकाळी पुण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हतं. प्रसारमाध्यमांना आपल्याभोवती चकरा मारायला लावण्यातही त्यांची हातोटी होती. त्यामुळे कॉमनवेल्थ गेम्स, पुणे फेस्टिव्हल, पिफ, पुणे मॅरेथॉन असे अनेक इव्हेंट त्यांनी यशस्वी करून दाखवले. आजही त्यापैकी अनेक इव्हेंट दिमाखात सुरू आहेत, तेही कलमाडींच्या मार्गदर्शनाखाली. पण राजकारणातील त्यांचा वचक मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर ओसरत गेला तो गेलाच.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकेकाळी पायलट असलेल्या कलमाडींना शरद पवारांनी पुण्याचे कारभारी बनवले. त्याच पवारांनी कारभारी बदला, असं आवाहन पुणेकरांना महापालिका निवडणुकीत केलं होतं. त्यानंतर महापालिकेतील काँग्रेसची सत्ता गेली ती पुन्हा आली नाही. 1991 मध्ये विठ्ठलराव गाडगीळ यांच्या पराभवानंतर सुरेश कलमाडी यांची पुण्यात एन्ट्री झाली. कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली 1992, 1997 आणि 2002 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला निर्भेळ यश मिळालं होतं. काँग्रेसनं सलग पंधरा वर्षे सत्ता उपभोगली ती कलमाडींच्या करिष्म्यामुळं. (Political News)

असं म्हणतात की, या काळात महापालिकेत सुई पडली तरी त्याचा आवाज कलमाडींपर्यंत पोहोचायचा. कलमाडी महापालिकेच्या सर्व कामांवर विशेष लक्ष ठेवून असायचे. नगरसेवकाला फोन करून माहिती घ्यायचे. स्थायी समिती, सर्वसाधारण सभांमध्ये मांडण्यात येणारे विषय कलमाडींच्या हाताखालून जायचे. यावरूनच त्यांचा काँग्रेसमध्ये काय दरारा होता, याची प्रचीती यावी. छोट्यातला छोटा पदाधिकारी असो की महापौर, कलमाडींच्या शब्दाबाहेर नसायचे. त्यामुळं पक्षात गटतट कधी दिसले नाहीत. तसं कलमाडींनीच होऊ दिलं नाही. गांधी घराण्याचे निष्ठावंत समजले जाणाऱ्या कलमाडींवरच पुणे काँग्रेसची संपूर्ण जबाबदारी होती. महापौरांची निवड असो की नगरसेवक पदाचे तिकीट कोणाला द्यायचे, हे तेच ठरवायचे. त्यांचा शब्द अंतिम असायचा.

पुण्याच्या बाबतीत कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर हायकमांडला कलमाडींच्या मांडवाखालूनच जावं लागायचं. केंद्रात मंत्री असतानाही त्यांनी आपली शहरावरील पकड कमी होऊ दिली नव्हती. ते 1995 -96 या काळात रेल्वे राज्यमंत्री होते. दिल्लीतून किमान आठवड्यातून एकदा तरी पुण्यात त्यांचा मुक्काम असायचा. ते दिल्लीला जाताना किंवा येणार असतील तेव्हा विमानतळावर त्यांचे स्वागत आणि निरोपासाठी पदाधिकाऱ्यांचा जथ्था असायचा. त्यामध्ये मग शहराध्यक्षांसह महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, इतर वरिष्ठ पदाधिकारी असायचे. महापालिकेत सत्ता आल्यानंतर कलमाडींनी दरवेळी महिलांना झुकतं माप दिलं. पंधरा वर्षांत त्यांनी पाच महिलांना महापौरपद दिले. त्यामध्ये कमल व्यवहारे, वंदना चव्हाण, दीप्ती चवधरी, वत्सला आंदेकर, रजनी त्रिभुवन यांचा समावेश आहे. त्याचबरोबर स्थायी समितीच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महिलांना संधी दिली.

Suresh Kalmadi
Ashok Chavan Resign Congress : विश्वासदर्शक ठरावाला उशीर ते भाजप पदाधिकाऱ्याच्या घरची चव्हाणांची ‘ती’ भेट ठरली महत्त्वपूर्ण...

असे झाले पुण्याचे भाई

पुण्यातील NDA म्हणजेच नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीमधून कलमाडी इंडियन एअर फोर्समध्ये १९६० मध्ये दाखल झाले होते. स्कॉड्रन लीडर म्हणून ते सेवानिवृत्त झाले. सुरेश कलमाडींनी 1965 आणि 1971 च्या पाकिस्तानाविरुद्धच्या युद्धात भारतीय वायुसेनेचे पायलट म्हणून कर्तव्य बजावले होते. 1974 मध्ये सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूना कॉफी हाऊसच्या माध्यमातून एक व्यावसायिक म्हणून आपली ओळख निर्माण करण्यास सुरवात केली. याचदरम्यान त्यांची शरद पवारांशी भेट झाली. त्याकाळी कलमाडींमधील राजकारणी पवारांनी हेरला. प्रचंड महत्वाकांक्षी असलेले कलमाडी मग काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. काहीजण असे सांगतात की ते पवारांना त्यावेळी आपले गॉडफादर मानायचे. पवारांच्या सांगण्यावरून त्यांना 1977 मध्ये पुणे युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. विशेष म्हणजे, त्यावेळी कलमाडींना फारसा अनुभव नसतानाही पवारांनी त्यांची शिफारस केली होती. त्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्र युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष बनले.

तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई पुण्यात आले होते, तेव्हा त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आली होती. युवक काँग्रेसने त्यांच्याविरोधात पुण्यातील टिळक रस्त्यावर आंदोलन केलं होतं. त्यामध्ये कलमाडींचं नाव पुढं आल्याचं काही जण सांगतात. पण तत्कालीन पदाधिकाऱ्यांकडून मात्र युवक काँग्रेसचा यात हात नव्हता, असा दावा केला जातो. या प्रकारानंतर मात्र कलमाडी दिल्लीत पोहचले. ही खबर संजय गांधी यांच्यापर्यंत पोहोचली होती. कलमाडीही त्यांचेच निकटवर्ती मानले जातात. हाच कलमाडींसाठी टर्निंग पॉईंट ठरला होता. शरद पवार एस काँग्रेसमध्ये गेल्यानंतर तेही त्यांच्यासोबत गेले. पवारांनी 1982 मध्ये त्यांना राज्यसभेचे खासदार केले. 1982 ते 1996 आणि पुन्हा 1998 असे तीन वेळा ते राज्यसभेचे सदस्य होते. ते केंद्रात रेल्वे राज्यमंत्रीही होते.

1996 ते 98 आणि पुढं 2004 व 2009 च्या लोकसभा निवडणुकीत कलमाडींनी भाजपच्या उमेदवारांना पराभूत केलं. यादरम्यान 1998 च्या निवडणुकीत आपल्याला लोकसभेचे तिकीट मिळणार नाही, या भीतीने कलमाडींनी काही महिने आधीच काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्यांनी थेट विठ्ठल तुपे यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, पण त्यांना जवळपास 3, लाख 40 हजार मतं मिळाली होती. यावरून कलमाडींची शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली लोकप्रियता दिसून आली.

Suresh Kalmadi
CM Eknath Shinde Birthday : ऑटोरिक्षा चालक ते मुख्यमंत्री : गोष्ट शिवसेनेच्या एका वाघाची

काँग्रेसच्या मातब्बर उमेदवाराचा पराभव

1998 ची राज्यसभेची निवडणूकही कलमाडींनी गाजवली. काँग्रेसकडून शरद पवारांवर निवडणुकीची जबाबदारी टाकण्यात आली होती. कलमाडींनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्यावेळी काँग्रेसचे सर्वाधिक 80 आमदार होते. त्यामुळे त्यांचे दोन खासदार सहज निवडून येत होते. त्यानुसार नजमा हेपतुल्ला आणि राम प्रधान यांना उमेदवारी देण्यात आली. इथेही कलमाडींना आपला करिष्मा दाखवला. सोनिया गांधींचे अत्यंत विश्वासू असलेल्या राम प्रधानांचा एका मतानं पराभव झाला. कलमाडींनी काँग्रेसचेच आमदार फोडले होते. कलमाडींच्या या फिल्डींगसमोर पवारांचेही काही चालले नव्हते. हा पराभव पक्षश्रेष्ठींच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्या कारणानेही पवार आणि सोनिया गांधी यांच्यातील दरी वाढल्याचं बोललं जातं. त्यानंतर पुढच्याच वर्षी पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तोपर्यंत कलमाडींनी राजकारणातील आपला दबदबा सिद्ध केला होता. त्याच कलमाडींना पुढं काँग्रेसनं 2004 च्या लोकसभा निवडणुकीत उतरवले आणि ते निवडूनही आले.

एकीकडे राजकारणात जम बसवत असताना कलमाडींनी देशातील क्रीडा संस्थांमध्येही हातपाय पसरले होते. युवक काँग्रेसमध्ये सक्रिय असतानाच ते 1980 मध्ये महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष बनले. 1996 ते 2012 पर्यंत ते भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष होते. 2000 ते 2013 या कालावधीत आशियाई अॅथलेटिक्स संघनटेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. या माध्यमातूनही त्यांनी दिल्लीत आपलं वजन कमी होऊ दिलं नाही. राष्ट्रकुल स्पर्धा भारतात आणण्यात त्यांचाच मोठा वाटा होता. पण याच राष्ट्रकुल स्पर्धांनी त्यांच्या राजकारणाचा डाव उधळला.

2007 नंतर उतरती कळा

2007 मध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर शहर काँग्रेसला उतरली कळा लागली. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करत वेगळी चूल मांडली. पुण्यातील काँग्रेसचे काही पदाधिकारीही पवारांसोबत गेले. पण त्याचा फारसा परिणाम पक्षावर झाला नाही. त्यानंतर तीनच वर्षांत म्हणजे 2002 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं पुन्हा यश मिळवत सत्ता काबीज केली. त्यामुळं कलमाडी आणि पुणे हे समीकरण पुन्हा सिद्ध झालं होतं. कलमाडींचे पुण्यावरील एकहाती नेतृत्व आणि त्यांचा काँग्रेसवर असलेला दबदबा पुन्हा पाहायला मिळाला. पण 2007 च्या निवडणुकीत चमत्कार घडावा याप्रमाणे काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत स्वतः शरद पवार कलमाडी यांच्या विरोधात उतरले होते.

Suresh Kalmadi
Shiv Sena News : शिवसेना शिंदेंची... पण शिवसैनिक कुणाचे?

प्रचारात पवारांनी कलमाडी यांच्यावर बरीच टीका केली. तसेच पुणेकरांना कारभारी बदला, असं आवाहन केलं. सलग 15 वर्षे सत्तेत असणारा कारभारी सत्तेपासून दूर गेला. काँग्रेसचा पराभव करत राष्ट्रवादीनं पहिल्यांदाच महापालिकेत सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. त्यावेळी राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होती. त्यामुळे पुण्यातही अशीच आघाडी होईल आणि काँग्रेसला पुन्हा सत्तेत वाटा मिळेल, अशी चर्चा होती. पण पवारांच्या मनात वेगळंच होतं. या निवडणुकीत काँग्रेसचे 35 आणि राष्ट्रवादीचे 42 नगरसेवक निवडून आले होते. केवळ सात नगरसेवकांचे अंतर असूनही कलमाडींना पवारांचं मन वळवता आलं नाही. ज्या पवारांनी कलमाडींना पुण्यात युवक काँग्रेसचं अध्यक्ष केलं, त्याच पवारांनी पुण्यातील कलमाडींची सत्ता घालवली. कलमाडी, म्हणजेच भाईंना महापालिकेच्या राजकारणातून बाहेर ठेवायचं असल्यानं अजितदादांनी राजकीय खेळी खेळली. काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीने शिवसेना आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. भाई नको म्हणून दादांनी शिवसेना-भाजपला जवळ केलं. राज्यात हा पॅटर्न आजही पुणे पॅटर्न म्हणून ओळखला जातो. आज राज्याच्या सत्तेत असलेल्या महायुतीचाही हाच तर पॅटर्न आहे.

पुणे पॅटर्न हा शहराच्या राजकारणातील भाईगिरी संपवण्याचं पहिलं पाऊल होतं. भाईंसाठी हा मोठा धक्का होता. कारण त्यानंतर शहरातील काँग्रेस कधी सावरलीच नाही. 2007 नंतर एकदाही एकहाती सत्ता मिळवण्याच्या जवळपासही काँग्रेसला पोहोचता आलं नाही. कॉमनवेल्थ गेम्समधील घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कलमाडींचे उरलेसुरले राजकारणही लयाला जाऊ लागले. सीबीआयने त्यांना अटक केल्यानंतर काँग्रेसनं त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं. त्यानंतरही पक्ष त्यांच्यापासून चार हात लांबच राहिला. काही महिने तुरुंगात घालवल्यानंतर कलमाडी पुण्यात आले. पण 2012 ते 2022 या दहा वर्षांत ते एकदाही महापालिकेत आले नाहीत. ज्या कलमाडींनी एकेकाळी पुण्यावर वर्चस्व गाजवलं होतं त्याच कलमाडींनी दहा वर्षे महापालिकेत पाऊलही ठेवलं नाही. 2022 मध्ये ते महापालिकेत आले तेव्हा हातात काठी होती. डोक्याचे, दाढीचे केस पांढरे झाले होते. शरीराने थकलेले होते. काँग्रेसचे काही जुने पदाधिकारी त्यांच्यासोबत होते. पण जो दरारा पूर्वी असायचा, त्याचा लवलेशही दिसला नव्हता. 2007 मध्ये महापालिकेतील सत्ता गेली अन् 2010 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्यांचे राजकारणच संपवले. त्यांना पुन्हा कधीच उभारी घेता आली नाही.

Suresh Kalmadi
Devendra Fadanvis: पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष ते मुख्यमंत्री; महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com