
अॅड. असीम सरोदे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे जीममधील फोटो शेअर केले. एकदम जबरदस्त तब्येत आहे. म्हणजे 54-55 वय झाल्यानंतर लोक रिटायरमेंटचा विचार करायला सुरूवात करून वर्षे मोजत बसतात. पण या वयातही राहुल गांधी यांना तरुण तडफदार नेते असे का म्हंटले जाते याच उत्तर मिळालं. पण नेता सुदृढ आणि पक्ष कुपोषित अस नसाव अशी कमेंट ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी करून सरोदे यांच्या पोस्टवरील सगळी मजा घालवली.
खरंतर राहुल गांधी यांनी जो काय भारी लेख लिहिलाय, त्यावरून शिळ्या कडीला उत आला आहे. ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी यांनी आरोप केले पण त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणूनच त्यांनी मतदार यादीतील घोळाचा मुद्दा पुढे आणला असावा असं मला वाटतं. कारण यापूर्वी देखील विधानसभा निवडणूक होताच भाजपने मतदार याद्यात घोळ केला असा आरोप केले गेले. नंतर हे प्रकरण शांत झाले.
मतदार यादीतील घोळ हे बूथ लेव्हलवर होतात. मुंबई, दिल्लीत बसून सूत्र हलवली जात असली तरी कोणत्या बूथवर नाव घुसवली, कोणत्या बूथवर नको असलेली नाव उडवली हे बूथवर सगळ्यात आधी कळू शकत. पण त्यासाठी बूथवर पक्षाची यंत्रणा तेवढी सतर्क असली पाहिजे. काँग्रेसच्या नेत्यांनी वेळीच निवडणूक निर्णय अधिकार्याकडे हरकत घ्यायला हवी, तेवढे कष्ट तर त्यांना घ्यावेच लागतील. मतदान होऊन गेल्यावर, निकाल लागल्यावर ओरडत बसण्यात काही अर्थ नाही. फार फार तर मिडियात स्पेस मिळेल.
राहुल गांधी सध्या योग्य ट्रॅकवर आहेत. त्यांच्या भाषणात आक्रमकपणा आला आहे. नुकताच त्यांनी 'नरेंदर सरेंडर' अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. ती लोकांना अपिल झाली. पण पुढे काय? राहुल गांधी यांचा हा विचार लोकांमध्ये घेऊन जाण्याची यंत्रणा पक्षाकडे आहे का? याचा विचार झाला पाहिजे. नाही तर राहुल गांधी यांच्या भाषणाला राज ठाकरेंप्रमाणे भरपूर गर्दी होईल पण ही गर्दी मतांमध्ये परिवर्तीत होणार नाही अशी स्थिती होईल. तसंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीच तीच भाषणे, तीच स्टाइल आता लोकांना फार अपिल होत नाही. कदाचित रोज दोन-चार भाषण मोदी देतात, ती टीव्हीवर लाईव्ह असतात, सोशल मिडियावर व्हायरल होतात म्हणून पण मोदींच्या भाषणांची क्रेझ कमी झाली असावी.
पण सरकार आणि संघटना या बळावर त्याचा फटका बसत नाही. राहुल गांधींना संघटना सुदृढ केल्याशिवाय अच्छे दिन येणार नाहीत. महाराष्ट्राचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची अनपेक्षित निवड केली. ही निवड होऊन चार महिने होऊन गेले तरी त्यांना त्यांची कार्यकारिणी जाहीर करता आली नाही. पुण्याचे शहराध्यक्षपद किती तरी वर्षापासून प्रभारी आहे. जर पक्ष कठोर निर्णय घेणार नसेल तर संघटन मजबूत कसे होणार? फक्त राहुल गांधी यांची छाती 56 इंचाची होऊन जमणार नाही तर संघटनेच्या बाहुंमध्ये ताकद आली पाहिजे.
काँग्रेस फुटली, अनेक मातब्बर नेते निघून गेले, काँग्रेसमध्ये अनेक चांगले, विचारांवर निष्ठा असलेले तरुण आहेत, फक्त त्यांना पाठबळ हवे आहे. त्यांना संधी दिली तर पुढचे अनेक वर्ष पक्ष मजबूत होऊ शकतो. पण अजून काँग्रेस याचा विचार करताना दिसत नाही. देशात, राज्यात, शहरात आणि गावात सक्षम विरोधक असलाच पाहिजे. पण नुसत असं म्हणून विरोधकांची ताकद वाढणार नाही तर विरोधकांनीच त्यासाठी कष्ट उपसले पाहिजेत. तरच पुढच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस दखलपात्र होईल. पण राहुल गांधी व्यायाम करून शरीर कमावत असतील आणि पुणे महापालिका निवडणुकीत 10-15 नगरसेवक निवडून येण्याची शाश्वती नसले तर राहुलजींच्या भूमिकेचा आणि शरीराचा काय उपयोग? असा प्रश्न पडला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.