BJP Vs Congress : सत्ता भाजपची; तरी काँग्रेसने फोडला घाम : बहुमत मिळवताना अक्षरश: दमछाक

BJP Vs Congress : केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही स्थानिक निवडणुकीमध्ये बाजी मारताना भाजपची चांगलीच दमछाक होत आहे.
BJP vs Congress
BJP vs CongressSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Congress : केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही स्थानिक निवडणुकीमध्ये बाजी मारताना भाजपची चांगलीच दमछाक होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतही काँग्रेसने लक्षवेधक कामगिरी केली. उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली पण बहुमत मिळवताना काँग्रेसने अक्षरश: घाम फोडला होता. त्यापाठोपाठ पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतही भाजपचा धुव्वा उडवून काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. 18 पैकी तब्बल 17 जागा जिंकत काँग्रेस आणि खेतानी-मानकर गटाने एकहाती वर्चस्व राखले आहे.

उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपप्रणीत पॅनलने 18 पैकी 10 जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. सुरुवातीला सर्व जागा भाजपप्रणीत पॅनलला जातील, असे चित्र होते. पण शेवटच्या क्षणी काँग्रेसप्रणीत पॅनेलने भाजपला घाम फोडला. शेवटी काँग्रेसप्रणीत पॅनलला अवघ्या 7 जागी समाधान मानावे लागले. पण विशेष म्हणजे भाजपमधील अनेक चेहरे काँग्रेसकडून आलेल्या बंडखोरांचेच आहेत, हेही वास्तव आहे. काँग्रेसमधीलअसंतुष्ट मंडळी सत्ताधाऱ्यांकडे आकर्षित होत असल्याचा चांगलाच फायदा भाजपला होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या सहकारी संस्था असलेल्या खरेदी विक्री संघ, जिनिंग प्रेसिंग यावर भाजपची ताकद वाढताना दिसत आहे.

उमरखेडमध्ये माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर हे आधी काँग्रेसमध्ये होते. पण त्यांना स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून सन्मानाची वागणूक मिळत नव्हती. त्यामुळे त्यांनी आपसुकच भाजपशी घरोबा केला. त्यांनी जाताना आपल्यासोबत माजी आमदार विजय खडसे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश चव्हाण यांनाही नेले. काँग्रेसमध्ये प्रदेश महासचिव तातू देशमुख, राम देवसरकर, नंदकिशोर अग्रवाल, दत्तराव शिंदे ही नेतेमंडळी सचोटीने काम करीत असली तरी या नेत्यांमध्ये साहेबराव कांबळे यांच्या रूपाने एका माजी अधिकाऱ्याची भर पडली. साहेबराव कांबळे यांनी विधानसभा निवडणुकीत आपला जलवा दाखवत विरोधकांना घाम फोडला होता.

BJP vs Congress
BJP vs Congress : भाजपचा धुव्वा, विद्यमान मंत्री अन् आमदारालाही दणका : क्लिन स्वीप देत 'काँग्रेसने' जिंकल्या सगळ्या जागा

मात्र काँग्रेसमधील काही नेत्यांनी विरोधकांसोबत हातमिळवणी केल्याने त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला. त्यातूनही सावरत त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा आपली झलक दाखविली. त्यामुळेच एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. ज्या 7 जागा निवडून आल्या, त्यात साहेबराव कांबळे यांचा सिहांचा वाटा आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. पण बाजार समितीची निवडणूक हरल्याने आता उमरखेड तालुक्यात काँग्रेसकडे एकही मोठी सरकारी संस्था नाही. आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसने मित्रपक्षांना विश्वासात घेऊन नियोजनबध्द पद्धतीने कार्यपद्धती अवलंबण्याचे आव्हान आहे.

BJP vs Congress
BJP Vs Congress : सुनील केदार अन् काँग्रेसचा 5 वर्षात टप्प्यात आणून कार्यक्रम; नागपूर जिल्हा परिषद यंदा भाजप काबीज करणार?

पांढरकवडामध्ये काय घडले?

इकडे पांढरकवडामध्येही निवडणूक जाहीर होताच आपल्या भागातील बाजार समितीवर आपली सत्ता असावी, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या रणांगणात उतरले होते. स्थानिक आमदार राजू तोडसाम यांच्यापासून बाजार समितीच्या माजी पदाधिकाऱ्यांनी मतदार संघ पिंजून काढला होता. बाजार समितीसाठी शनिवारी (7 जून) मतदान झाले. मतदानानंतर मतमोजणी झाली. यात अगदी सुरुवातीपासूनच काँग्रेस, निमीष मानकर-सलीम खेतानी गटाचे वर्चस्व दिसून आले. अखेरीस निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने 18 पैकी तब्बल 18 जागेवर विजय मिळविला. एक जागा अपक्षाला मिळाली.

काही मतदार संघात मतदान अत्यंत चुरशीने झाले होते. एका मतदार संघात दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली. यामुळे फेरमतमोजणी घ्यावी लागली. यातही काँग्रेस खेतानी-मानकर गटाचे हरिहर लिंगणवार विजयी झाले. त्यामुळे भाजप आणि अण्णासाहेब पारवेकर गटाला बाजार समिती निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. मंत्री, पालकमंत्री, आमदार सगळे भाजपचे असूनही भाजपलाच सपाटून मार खावा लागला. अण्णासाहेब पारवेकर यांचा शब्दही इथे प्रमाण मानला जातो. पण त्यांनाही करिश्मा दाखवता आला नाही. इथेही भाजपला काँग्रेसमधील असंतुष्टांचीही साथ मिळाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com