MP Amol Kolhe On Bullock Cart Races in Maharashtra : बैलगाडा शर्यतींवरची बंदी सर्वोच्च न्यायालयानं उठवली. या शर्यती पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी मनापासून प्रयत्न करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी याबाबतचं आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. (Sarkarnama Podcast)
अमोल कोल्हे म्हणाले, "बैलगाडा शर्यतीच्या आयोजनातील नियमांचे पालन झाले पाहिजे. कारण, नियमांचे पालन झाले नाही, तर त्याचा फटका भविष्यात बसणार आहे. याबाबत माझा बैलगाडा मालकांवर विश्वास आहे. कारण, त्यांनी बंदीचा काळ सोसला आहे. त्याचा त्यांना चटका बसलेला आहे. त्यामुळे त्यांना त्याचे महत्त्व समजलेले आहे."
"बैलगाडा शर्यतीबाबत अनेक पैलूंचा अंतर्भाव होतो. पहिली बाब म्हणजे, ही चारशे वर्षे जुनी आपली परंपरा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ग्रामीण अर्थकारणाला यातून फार मोठी चालना मिळते. म्हणजे बारा बलुतेदार, सोळा अलुतेदार आहेत. ही चारशे वर्षांची परंपरा जर आपण बारकाईने पाहिली, तर गाडी बनवणाऱ्यांपासून वाजंत्र्यापर्यंत, अनाउन्सरपासून वाहतुकीचे काम करणाऱ्यांपर्यंत ते छोटे-छोटे स्टॉल लावणाऱ्या प्रत्येक घटकापर्यंत याचे अर्थकारण अवलंबून आहे. त्यातून ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळतेय. यातून ग्रामीण पर्यटन, आंतरराष्ट्रीय पर्यटनाचीही फार मोठी संधी आहे. स्पॅनिश बुल फाइट किंवा बुलरनमुळे स्पेनच्या अर्थकारणाला फार मोठा आधार मिळाला. ती संधी बैलगाडा शर्यतीमध्ये आहे," असे कोल्हे म्हणाले
"चौथी महत्त्वाची गोष्ट, ही देशी गोवंशाची संवर्धनाची आहे. खिलार जातीच्या बैलांचा उपयोग बैलगाडा शर्यतीसाठी होतो. खिलार जातीची गाय दूध कमी देते. त्यामुळे खोंडाच्या पैदाशीसाठी ही गाय सांभाळली जाते. दुष्काळी भागात, माण-खटाव असेल, अगदी आंध्र आणि कर्नाटकातील दुष्काळी भागात खिलार जातीच्या खोंडाची पैदास होते आणि तिथून ते घाटावर आणले जातात. हे संपूर्ण चक्र आहे. आज बैलगाडी वाहतुकीसाठी वापरली जात नाही. ट्रॅक्टरमुळे नांगरणीसाठीही जास्त उपयोग होत नाही. मग, खोंडाचा जन्म झाल्यानंतर एका अर्थाने देशी गोवंशाच्या रक्षणासाठी बैलगाडा शर्यती फायदेशीर ठरतात," कोल्हे म्हणाले
"बैलगाडा शर्यत खरंतर एक नाद आहे. ते ग्रामीण विकासाला चालना देणारे मॉडेल तयार झाले पाहिजे. मी जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये याबाबत असे मत मांडले की बैलगाडा शर्यतीसाठी एक मॉडेल घाट बनला पाहिजे. एकदा हा मॉडेल घाट बनला की त्याला सुसूत्रता येईल. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असा एक मॉडेल घाट बनला की ते होईल. त्यासाठी प्रयत्न करता येतील. यासाठी एक सक्षम मॉडेल मांडले पाहिजे. जोपर्यंत आयोजक याबाबतचे मॉडेल समोर ठेवणार नाहीत, तोपर्यंत या शर्यतीबाबत आक्षेप येतच राहतील. जसं की, लावणीच्या कार्यक्रमातून अनेक ठिकाणी राडा होत असतो, पण त्याच ठिकाणी कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होत असते. त्यामुळे तुम्हाला राडा पाहिजे की व्यासपीठ पाहिजे, याचा विचार केला पाहिजे," असे कोल्हे म्हणाले
"या गोष्टी लोकप्रतिनिधी किंवा आयोजकांनी प्रस्थापित केल्या पाहिजे. त्यामध्ये तुम्हांला दूरगामी विधायक परिणाम पाहिजेत की, लोकानुनय पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी मी सुरुवातीपासून चतुःसूत्रीचा उल्लेख करत आलो आहे. मी त्याचाच पुरस्कार करत आलो आहे. त्याला जर हातभार लागत असेल, तर त्याचा विचार केला पाहिजे. बैलगाडा शर्यतीच्या आयोजनामुळे छोट्या-छोट्या गावांच्या अर्थकारणावर फरक पडत असतो..... ते फक्त जत्रेत स्टॉल लावणाऱ्यापुरते राहत नाही. ते नाक्यावर चहा विकणाऱ्यापासून खेळणी विक्रेत्यावर परिणाम करणारे असते. हे जे सर्व समीकरण आहे, त्याकडे आपण सकारात्मक पाहिले पाहिजे. या चतुःसूत्रीचा विचार करून आयोजित केलेली बैलगाडा शर्यत ही आदर्श असेल. परंपरा, ग्रामीण अर्थकारणाला चालना, पर्यटनाला चालना, स्थानिक तरुणांना रोजगार निर्माण झाला पाहिजे. केवळ मोठी बक्षिसे लावून शर्यती होत नाहीत. जेवढी मोठी बक्षीस लावून ईर्षेने शर्यती होतील. त्यातून या सगळ्या गोष्टींचे नक्कीच आपण नुकसान करू," असे कोल्हे म्हणाले
"मी या विषयावर चित्रपट काढणार आहे. कारण, मागच्या वेळी जेव्हा बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाली, त्याच्या आधी मी एक घोषणा केली होती की, मी बैलगाडा शर्यतीसाठी माझी राजकीय कारकीर्द पणाला लावेल. त्यावेळी मला अनेक जणांनी सांगितलेले की, ‘ही गोष्ट फक्त मोजक्याच लोकांसाठी आहे. त्यासाठी तुम्ही राजकीय कारकीर्द का पणाला लावताय?’ त्यानंतर जेव्हा मी खेड तालुक्यातील दावडी निमगाव येथे घाटात घोडी पळवली, त्यावेळी त्या लोकांपर्यंतही हा थरार पोचला, ज्यांना बैलगाडा शर्यत माहीत नव्हती. यातून देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळू शकते, आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळू शकते," असे कोल्हे म्हणाले
"त्यामुळे त्याचा एक घटक म्हणून, त्याचा पुरस्कर्ता म्हणून माझी एक नैतिक जबाबदारी होती की, लोकांपर्यंत ही गोष्ट पोचविणं. त्याचं पुढचे हे पाऊल आहे. हा जो लढा आहे, तो या चित्रपटातून उलगडताना दिसणार आहे. याला जे विधायक वळण द्यायचे आहे. हे विधायक चित्र कसे आहे, ते या चित्रपटातून मांडले जाणार आहे. कारण, तमिळ चित्रपटसृष्टीत जलीकट्टू सिनेमा आला आणि फार मोठी लोकजागृती झाली. त्याचप्रमाणे जेव्हा बैलगाडा शर्यतीवर बंदी आली, त्यावेळी सर्वसामान्य माणूस पुढे आला. चित्रपटाच्या माध्यमातून ही बाब अधिक प्रवाभीपणे मांडता येणार आहे," असे कोल्हे म्हणाले
"बैलगाडा शर्यतीच्या परवानगीचा निर्णय नक्कीच आनंदचा आहे. पण, तितकीच या निर्णयाने आपल्या खांद्यावर जबाबदारी आलेली आहे. त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीचे काटेकोर पालन करून केवळ नाद न राहता एक चांगले मॉडेल करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. त्यासाठी सर्व बैलगाडा मालक व शौकीन एकत्रितपणे प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आपण अजूनही मागणी करतो की, बैल या प्राण्याचा समावेश संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळावा. अत्यंत महत्त्वाची ही मागणी आहे. त्याचा जो एक महत्त्वाचा भाग आहे. कारण, जेव्हा या यादीत समावेश झाला, त्यावेळी बीफ निर्यातीमध्ये दहाव्या क्रमांकावर असणारा देश तिसऱ्या क्रमांकावर आलाय.... ही जी सात क्रमांक ओलांडण्याची झेप आहे, ती या निर्णयाशी निगडित आहे की, याचा आपल्याला प्रामाणिकपणे विचार करावा लागेल. हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे. ‘पेटा’ आणि इतर प्राणीमित्र संघटना न्यायालयात गेल्या की, बैलांवर अन्याय होतो. त्यामुळे मी सातत्याने संसदेत हेच मांडत होतो की, हत्येपेक्षा मोठी क्रूरता असू शकत नाही," असे कोल्हे म्हणाले
त्यामुळे ‘पेटा’सारख्या संघटनेला हा विरोध करण्याचे नेमके कारण काय आहे? बैलगाडा मालकांचा हाच आक्षेप आहे की, जेव्हा आम्ही बैलांना पोटच्या पोरासारखा सांभाळ करतो, तेव्हा तुम्ही दाखवत नाही. पण, तुम्ही एखादी घटना दाखवता आणि क्रूरतेबाबत बोलता. मुळात बैलगाडा शर्यत ही पशूधन दाखविणारी गोष्ट आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कट दिसतो. कारण, बंदी आल्यानंतर बीफच्या निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. एक नियम होतो, एक बंदी होते आणि दहाव्या क्रमांकावर असणारा देश तिसऱ्या क्रमांकावर येतो. या बंदीसाठी सातत्याने आग्रही राहणाऱ्या संस्था आहेत, त्यातील बऱ्याचशा संस्था या आंतरराष्ट्रीय आहेत.
...तर मित्रांनो हे होते डाॅ. कोल्हे यांचं निवेदन. आता सगळ्यांनीच विचार करायचाय की महाराष्ट्राची शान असणाऱ्या या बैलगाडा शर्यतींना नक्की कसं रुप द्यायचं ते, असेही अमोल कोल्हे म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.