Reservation News : खरंच, श्रीमंतांना आरक्षण असावं का? कळीच्या मुद्द्यावर बोलणार कोण?

Reservation News : 'सांपत्तिक स्थिती उत्तम असल्याने त्यांना कोणत्याही आरक्षणाची आवश्यकताच भासत नाही.'
Reservation News
Reservation News Sarkarnama

Reservation News : जेव्हा जेव्हा आरक्षणाचा मुद्दा तापतो, तेव्हा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आर्थिक निकषाबाबतचा व्हिडिओ व्हायरल होतो. ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे आणि आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात देशमुख यांनी कोणाला आरक्षण द्यावे, हा मुद्दा मांडला होता. मी देशमुख आहे म्हणजे सगळे देशमुख माझ्यासारखे आहेत, असे आपण मानायचे का? देशमुख गरीब आणि गरजूही असतात. मुंडेसाहेब, आपणास खरंच आरक्षणाची गरज आहे का? असा थेट सवाल त्यांनी केला होता. विशेष म्हणजे मला आरक्षणाची गरज नाही. मी आरक्षण घेत नाही, असे त्यांनीही तेथेच स्पष्ट केले होते. (Latest Marathi News)

आरक्षण नाकारले -

हे सांगण्याचे आज कारण असे की, अहमदनगर शहर भाजपचे उपाध्यक्ष धनंजय जाधव हे ओबीसीमध्ये मोडतात. हे सर्वश्रुत आहे. ते आज राजकारणात आहेत. युवा कार्यकर्ते आहेत. त्यांचे वडील पै. कृष्णा जाधव हे उपनगराध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी सुप्रिया या नगरसेविका होत्या. यापूर्वी धनंजय हे नगरसेवक होते. त्यांनी खुल्या वर्गातून (प्रभाग १०) निवडणूक लढविली होती आणि ते विजयीही झाले होते. त्यांच्या पत्नी सुप्रिया जाधव या विद्यमान नगरसेवक आहेत. वास्तविक नगर शहरातील जाधव कुटुंबाची आर्थिक स्थिती उत्तम आहे. जमीनदार आहेत. उद्योग व्यवसायाचे त्यांचे जाळे आहे. सांपत्तिक स्थिती उत्तम असल्याने त्यांना कोणत्याही आरक्षणाची आवश्यकताच भासत नाही.

Reservation News
Maratha Reservation News : आधी आरक्षण; मगच सरकारी कार्यक्रम, मराठा तरुण आक्रमक...

नको म्हणण्याचे धाडस -

ओेबीसींना सरकारी योजनांचा जो फायदा होतो. तो घेणे किंवा फायदा उठविणे योग्य नाही, असे त्यांना वाटते. इतक्यावरच न थांबता त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र पाठविले हे विशेष. माझे आरक्षण गरजूंना द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. तसे आरक्षण एखाद्याला कायद्याने देता येते की नाही, याबाबत कायदेतज्ज्ञ स्पष्ट करतील. तशा तांत्रिकबाबतीत जाण्याचे मुळात कारण नाही. एक गोष्ट मात्र खरी, की आरक्षण नको असे म्हणण्यास धाडसही लागते. तसे धाडस जाधव यांनी दाखविले, याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

आरक्षणाचे राजकारण पेटले -

गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वातावरण गढूळ बनले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांना राज्यातील मराठा समाजाने डोक्यावर घेतले. त्यांच्या सभा लाखोंच्या संख्येने होत आहेत. ते सरकारवर तोफ डागत आहेत. दुसरीकडे धनगर समाजही आरक्षणासाठी आग्रही आहे. आदिवासी समाजही आपल्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही, असे इशारे देत आहे. जरांगे हे ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांना लक्ष्य करीत आहेत.

जरांगे पाटील ‘सकाळ’ कार्यालयात आले असता, त्यांचे या मुद्द्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, ओबीसी नेत्यांपैकी फक्त भुजबळच आम्हाला विरोध करीत आहेत. त्यामुळे आम्हीही त्यांच्यावर टीका करतो. गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे जरांगे यांना वाटते. हे योग्यच आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, याविषयी कोणाचे दुमत नाही, पण ते कायद्याच्या कसोटीवर किती टिकते, हे पाहावे लागेल. सरकार त्यासाठी काय करणार, हे यथावकाश कळेलही. राज्यात आरक्षणाचे राजकारण पेटले आहे, हे मात्र नाकारता येणार नाही.

Reservation News
Maratha Reservation News : धक्कादायक! जरांगेंना पत्र लिहित युवकाने संपवली जीवनयात्रा; मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शर्टवर...

असल्या गढूळ वातावरणात भाजपचा एक युवा नेता पुढे येतो. मला आरक्षण नको म्हणतो. ही निश्चितच सोपी गोष्ट नाही. प्रत्येक समाजाला वाटते आपला वाटा तसाच राहावा. आपल्यात कोणी वाटेकरी होऊ नये. पण जर गरजच नाही, तर आरक्षण घ्यायचे कशाला? हा विचार करणारा एक युवा कार्यकर्ताही राजकारणात आहे, हे काही कमी नाही.

सोशल मीडियावर पाऊस -

राज्यात ज्यांना ज्यांना आरक्षण मिळते. त्या-त्या समाजातील सधन मंडळींनी असा विचार केला, तर समाजात जातीपातीच्या भिंती उभ्या राहणार नाहीत. जरी घटनेने आरक्षणाचा अधिकार दिला असला, तरी मी धनवान आहे. मी माझ्या मुलांना शिक्षण, नोकरी कोणत्याही गोष्टींसाठी आरक्षण मागणार नाही, अशी भूमिका घेतल्यास त्या-त्या जातीतील गरिबांनाही निश्चित फायदा होऊ शकतो. पण त्यासाठी मन मोठे करावे लागेल. आरक्षण हा संवेदनशील मुद्दा आहे. त्याबाबत भलेभले राजकारणी बोलण्याचे टाळतात.

दुसरीकडे मात्र धनंजय जाधव आरक्षण नको म्हणतात हे काही कमी नाही. त्यांनी हा निर्णय घेतल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस कोसळला. स्वागताबरोबर ट्रोलधारकही सरसावले. जाधव यांनी सुरुवात केली आहे. त्यांचे अनुकरण सर्वच पक्षातील श्रीमंत नेते अन्‌ कार्यकर्त्यांनी केले, तर राज्यकर्त्यांविषयीचा जिव्हाळा अधिक वृद्धिंगत होईल, असे वाटते. जाधव यांच्याप्रमाणे आरक्षण नाकारणारे किंवा शासकीय योजनांचा फायदा न घेणारे अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले आहेत. त्यांच्या पंक्तीत आज धनंजय जाऊन बसले आहेत.

(Latest Marathi News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com