Alure Guruji : पगार, पेन्शन विद्यार्थ्यांवर खर्च करणारे शिक्षणमहर्षी

S N Alure Guruji : विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण मिळावे, यासाठी सि. ना. अर्थात सिद्रामप्पा नागप्पा आलुरे गुरुजी हे आयुष्यभर आग्रही राहिले. आपल्या संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या एकाही शाळेत शिक्षकाची नियुक्ती करताना त्यांनी डोनेशन म्हणून एक पैसाही घेतला नाही.
Alure Guruji
Alure Guruji Sarkarnama
Published on
Updated on

तुम्ही सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने बाय रोड जात असाल तर शाळा सुटायच्या आणि भरायच्या वेळेत पांढरा शर्ट, खाकी हाफ पँट आणि डोक्यावर गांधी टोपी अशा गणवेशातील विद्यार्थ्यांची गर्दी तुम्हाला दिसेल. हे दृश्य दिसलं की समजून जायचं तुम्ही तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावात किंवा अणदूरच्या जवळपास आहात. हे विद्यार्थी आणि त्यांच्या शाळेबाबत जिल्हाभरात आधीपासूनच कुतूहल आहे. परिसरातील हजारो गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय या शाळेमुळे झाली आहे.

या भागात गुरुजी हा शब्द उच्चारला की सि. ना. अर्थात सिद्रामप्पा नागप्पा आलुरे गुरुजी यांचं नाव डोळ्यांसमोर येतं. आलुरे गुरुजी यांनी अणदूरसह तुळजापूर तालुक्यात शैक्षणिक क्रांती केली. मुलांसाठी उच्च दर्जाचं शिक्षण तर उपलब्ध केलं, शिवाय परिसरातील गरजू मुलांना नोकरीही दिली. संस्थाचालकाला डोनेशन म्हणून मोठी रक्कम न देता शिक्षकाची नोकरी लागते, यावर आताच्या पिढीचा विश्वास बसणार नाही, पण आलुरे गुरुजी यांनी हे खरं करून दाखवलं आहे. नोकरीसाठी डोनेशन न घेणारा शिक्षण संस्थाचालक शोधूनही सापडणार नाही. जे काही सन्माननीय अपवाद आहेत, त्यात आलुरे गुरुजी यांनाही मानाचं स्थान आहे.

जीवनात एक ध्येय ठरवून ते पूर्णत्वाला नेणाऱ्या अनेक विभूती महाराष्ट्रात होऊन गेल्या. अशा महान विभूतींमुळेच महाराष्ट्राची शैक्षणिक, सामाजिक जडणघडण झाली. आलुरे गुरुजीही अशा महान विभूतींपैकीच एक. त्यांचं आयुष्य हे समर्पणाचं प्रतीक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केलं. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य समजलं जातं. तशी पिढी घडवण्यात आलुरे गुरुजी यांनीही मोलाचा वाटा उचलला. 'तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा...' या ओळी आहेत प्रसिद्ध शायर साहीर लुधियानवी यांच्या. गुरुजींच हे आवडत गीत. या ओळींप्रमाणेच पिढी घडवण्याचं काम गुरुजींनी आयुष्यभर केलं.

आलुरे गुरुजी यांच्या जन्म 6 सप्टेंबर 1932 रोजी अणदूर येथे झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. गावात पहिली ते चौथीपर्यंतच शिक्षणाची सोय होती. त्यांचं पुढील शालेय शिक्षण अणदूरशेजारच्या नळदुर्ग येथे झालं. शाळेसाठी ते पायी ये-जा करायचे. महाविद्यालयीन शिक्षण सोलापूर येथे झालं. कठीण परिस्थितीतही त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. यासाठी त्यांच्या मातुःश्री लक्ष्मीबाई यांनी त्यांना पाठबळ दिलं. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या मातुःश्री लक्ष्मीबाई या त्यांना रोज गावातून डबा पाठवायच्या. बी.एस्सी, बी.एड. झाल्यानंतर त्यांना जिल्हा परिषेदच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. बीड (Beed) जिल्ह्यात त्यांनी नोकरी केली. खरंतर आलुरे गुरुजींना पोलिस अधिकारी होण्याची संधी उपलब्ध झाली होती, मात्र शिक्षकच व्हायचं, असं त्यांनी ठरवलं होतं, असं त्यांचे सहकारी, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आलुरे गुरुजी यांच्यावरील गौरवग्रंथात लिहिलं आहे.

Alure Guruji
Top 10 News : काँग्रेसच्या माजी आमदाराला न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला; 'NCP'ला धक्का! बड्या नेत्यानं दिला राजीनामा - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

गुरुजी तिकडे बीड जिल्ह्यात नोकरी करत असताना इकडे, गावात म्हणजे अणदूर येथे काही मान्यवरांनी शिक्षणसंस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. ते वर्ष होतं 1959. र. प. देशमुख, फुलचंद कस्तुरे, नीलकंठप्पा आलुरे, नारायणराव मोकाशे, आदप्पा आलुरे, शंकरराव मुळे, बसवणप्पा कर्पे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. अणदूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी, असा हेतू त्यामागे होता. या सर्वांनी मग आलुरे गुरुजी यांना गावी परत येण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत आलुरे गुरुजी यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि आणदूरला परत आले. 10 जुलै 1959 रोजी शिक्षण प्रसारक मंडळ, अणदूर, या संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर संस्थे तर्फे प. ना. देशमुख विद्यालय सुरू करण्यात आलं आणि आलुरे गुरुजी यांच्या अलौकिक अशा शैक्षणिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.

पुढं 1962 मध्ये आलुरे गुरुजी यांची संस्थेच्या सचिवपदी निवड झाली. 1964 मध्ये ते शाळेचे मुख्याध्यापक झाले. भावाच्या शिक्षणासाठी तत्कालीन मुख्याध्यापक एम. जी. कुलकर्णी यांनी सोलापूरला स्थलांतर केल्यामुळं आलुरे गुरुजींना ती जबाबदारी स्वीकारावी लागली होती. संस्थेच्या समोर अनेक अडचणी होत्या. आलुरे गुरुजी यावर मात करत गेले. दरम्यानच्या काळात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांचं 27 मे 1964 रोजी निधन झालं. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी 1965 मध्ये या शाळेचं नाव बदलून जवाहर विद्यालय असं करण्यात आलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित आणि दर्जेदार शिक्षण देण्याचा वसा आलुरे गुरुजी यांनी अखेरपर्यंत जपला. तत्पूर्वी, 1971 मध्ये बालाघाट शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेद्वारे नळदुर्ग आणि तुळजापूर येथे महाविद्यालये चालवली जातात. गुरुजींनी या संस्थेचं कार्याध्यक्षपद सांभाळलं होतं.

Alure Guruji
Haryana Election Result : हरियाणात दलितांची मतं कुणाला मिळाली? CSDC च्या सर्व्हेतून झाला खुलासा

कर्मवीर भाऊराव पाटील, बापूजी साळुंखे आदींनी शैक्षणिक क्षेत्रात जसं भरीव काम केलं, आलुरे गुरुजी यांनी ते अणदूर परिसरात पुढं चालवलं. आणदूरसह तुळजापूर तालुक्यातील विविध गावांत संस्थेच्या जवळपास 26 शाळा सुरू आहेत. शाळेवर शिक्षकाची नोकरी लागणं किती कठीण काम असतं, हे सर्वांनाच माहिती आहे. डोनेशन म्हणून भरमसाठ रक्कम द्यावी लागते. आता शिक्षक म्हणून नोकरीसाठी किती पैसे द्यावं लागतात, याचा आकडा कानावर पडला तर धक्का बसतो. आलुरे गुरुजी यांनी आपल्या संस्थेत अनेकांना नोकरी दिली. यासाठी त्यांनी कोणाकडूनही डोनेशनपोटी एक पैसाही स्वीकारली नाही. उलट, काही गरजूंना तर त्यांनी शोधून आपल्या शाळेवर आणून नोकरीला लावल्याचंही त्यांच्या सहवासात आलेले लोक सांगतात.

शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही त्यांचं कार्य उल्लेखनीय असं आहे. अणदूर येथील ग्रामदैवत श्री खंडोबाचं मंदिर राज्यभरात प्रसिद्ध आहे. या मंदिरात त्यांनी दलितांना प्रवेश खुला केला, पूजेचा मानही मिळवून दिला, अशी माहिती त्यांच्यावर प्रकाशित करण्यात आलेल्या गौरवग्रंथात दिली आहे. अनिष्ट रूढींच्या विरोधातही त्यांनी मोहीम राबवली, गावात व्यसनमुक्ती व्हावी, यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. त्यांच्यावर महात्मा गांधीजींचा प्रभाव होता. त्यातूनच त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठीही सातत्यानं प्रयत्न केले.

जवाहर विद्यालयात परगावचे विद्यार्थीही मोठ्या संख्येनं यायचे. पावसाळ्यात या विद्यार्थ्यांची अडचण व्हायची. अशावेळी या विद्यार्थ्यांना आलुरे गुरुजी आपल्या घरी घेऊन जायचे. त्यांच्या अर्धांगिनी कै. शांताकाकी या विद्यार्थ्यांना हवे नको ते आवर्जून पाहायच्या. परगावच्या विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन आलुरे गुरुजी यांनी वसतिगृहाच्या उभारणीचा निर्णय घेतला. मागासवर्गीय आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतीगृहे सुरू केली. वसतिगृहाची उभारणी झाली आणि खेडेगावांतील विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली.

मुख्याध्यापक पदावरून आलुरे गुरुजी 1990 मध्ये निवृत्त झाले. त्यानंतरही संस्थेचे सचिव म्हणून जवाहर विद्यालय, जवाहर महाविद्यालयातील शिक्षणाच्या दर्जावर त्यांचं कायम लक्ष राहिलं. शिक्षक, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक, प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी ते स्वतःहून पुढाकार घ्यायचे. शिक्षकाची नोकरी लागल्यानंतर अगदी पहिल्या महिन्यापासून त्यांनी आपल्या पगारातील 25 टक्के रक्कम गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केली. गुरुजी तुळजापूरचे आमदारही झाले होते. काँग्रेसच्या उमेदवारीवर 1980 मध्ये त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. शिक्षक आणि आमदारकीच्या पेन्शनची रक्कमही गुरुजींनी दलित मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केली.

शैक्षणिक क्षेत्रासह गुरुजींचा वावर राजकारण, सहकार क्षेत्रातही होता. इंदिरा काँग्रेसच्या उमेदवारीवर गुरुजींनी 1980 मध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. शेतकरी कामगार पक्षाचे माणिकराव खपले यांचा त्यांनी पराभव केला होता. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते. तुळजापूर येथे तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, नवोदय विद्यालय सुरू करण्यात त्यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे.

लातूर येथील श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे संचालक, अध्यक्ष म्हणूनही गुरुजींना काम पाहिलं. ते राज्य सहकारी बँकेचे संचालक, उपाध्यक्ष आणि औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष होते. त्यांनी 2001ते 2011 पर्यंत नळदुर्ग येथील तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.

Alure Guruji
Akhilesh Yadav : अखिलेश यांच्या घराबाहेर उद्रेक; शेकडो पोलिस, बॅरिकेडिंग, तारांचे कुंपण... काय घडलं?

गुरुजींना घडवलेले विद्यार्थी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांचे शिक्षण अणदूरच्या जवाहर विद्यालयात झालं आहे. गुरुजींनी उभारलेल्या वसतिगृहात राहूनच त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. दलित, मागासवर्गीय आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं, म्हणून गुरुजींनी आयुष्य समर्पित केलं. आलुरे गुरुजी यांच्यामुळे मला सामाजिक भान मिळालं, विचारांची शिदोरी मिळाली, असं आमदार चौगुले सांगतात.

मराठवाड्याचे साने गुरुजी, अशी ओळख असलेल्या आलुरे गुरुजी यांचं वयाच्या 90 व्या वर्षी 2 ऑगस्ट 2021 रोजी निधन झालं. त्यापूर्वी, आलुरे गुरुजी यांनी वयाची 85 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांच्यावर गौरवग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं होतं. त्या गौरवग्रंथात त्यांचे सहकारी, त्यांचे विद्यार्थी आणि त्यांच्या सहवासात आलेल्या मान्यवरांनी लिहिलेले लेख वाचले की आलुरे गुरुजींच्या मोठेपणाची प्रचीती येते.

जवाहर महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. अनिता मुदकण्णा यांनी आलुरे गुरुजी यांच्यावर 'दिव्यत्वाची हीच प्रचीती' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकातील एका प्रकरणात त्या लिहितात, साहीर लुधियानवी यांचे 'तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा' हे गुरुजींचं आवडतं गीत. या गीताच्या ओळी गुरुजींच्या मानवतावादी, निधर्मी विचारांची साक्ष देतात. शाळा, महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाबाबत विचारविनिमय सुरू झाला की गुरुजींच्या या आवडत्या गाण्याचा उल्लेख व्हायचा. या गीताचा सारांश हा मानवजातीला माणुसकीचा धर्म शिकवून जाणारा आहे. विद्यार्थ्यांवर असे संस्कार करण्याचा प्रयत्न आलुरे गुरुजी यांनी आयुष्यभर केला.

जवाहर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा. किरण सगर सांगतात, जवाहर विद्यालयातून चांगला माणूस घडला पाहिजे, आपण समाजाचं देणं लागतो, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे, असे उदात्त विचार उराशी बाळगून गुरुजींनी आयुष्यभर काम केलं. या शाळेचा लोकिक पाहूनच मी तेथे शिक्षण घेण्याचा निर्धार केला होता. शाळा आणि वसतिगृहात प्रवेश मिळाला. अणदूरचं जवाहर विद्यालय म्हणजे जणू संस्कारांचं विद्यापीठच. हे शक्य झालं होतं केवळ सिद्रामप्पा आलुरे गुरुजी यांच्यामुळे.

Alure Guruji
Sharad Pawar : ‘NCP’ला धक्का! 'तुतारी' हाती घेण्यासाठी रांगा लागल्या असतानाच बड्या नेत्यानं दिला राजीनामा

आलुरे गुरुजी यांचं शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्य उत्तुंग आहे. आयुष्यभर त्यांनी तत्वांशी तडजोड केली नाही. सर्वांना माणूस बनण्याची शिकवण दिली. अणदूरच्या जवाहर विद्यालयात शिक्षण घेणं हे प्रतिष्ठेचं समजलं जातं. अमका विद्यार्थी जवाहर विद्यालयात शिकतो आहे, असं म्हटलं की त्याच्याकडे आदरानं पाहिलं जायचं. संस्थेसह विद्यार्थ्यांनाही ही प्रतिष्ठा मिळाली ती आलुरे गुरुजी यांच्या कडक शिस्तीमुळं, त्यांच्या मूल्याधिष्ठित, दर्जेदार शिक्षणाच्या आग्रहामुळं. शिक्षणाचा बाजार मांडल्या गेलेल्या आजच्या काळात आलुरे गुरुजी यांच्यासारख्या कर्मयोगी, शिक्षणमहर्षींची उणीव सर्वांनाच भासत आहे.

आपण समाजाचं देण लागतो, या भावनेतून आलुरे गुरुजी यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी आयुष्य समर्पित केलं. हा परिसर या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या काय ऋणात राहणार आहे. असं असलं तरी आलुरे गुरुजी यांच्या कार्याची म्हणावी तशी दखल घेण्यात आली का, याचा विचार सरकारनं आणि समाजानंही आवर्जून करायला हवा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com