नवी दिल्ली : चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) धुरा हाती घेतली आहे. चन्नी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्ताराच्या यादीला काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या समर्थकांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार असून, नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. अमरिंदरसिंग यांना काँग्रेस आता हा आणखी एक धक्का देणार आहे.
मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा शपथविधी नुकताच झाला. चन्नी यांनी शपथ घेतल्यानंतर सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सैनी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. चन्नी यांच्या रुपाने काँग्रेसला पंजाबमध्ये पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. जातीय समीकरणे पाहून राहुल गांधींनी दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज नेत्यांना खूष करण्याचा हा प्रयत्न होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चन्नी यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होणार आहे. चन्नी यांनी मंत्रिमंडळ विस्ताराआधी राहुल गांधींशी चर्चा केली होती. नवीन मंत्र्यांच्या यादीला राहुल गांधींनी मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून चन्नी हे तीन वेळा दिल्लीला जाऊन आले आहेत. त्यांचे दिल्ली दौरे हे प्रामुख्याने नवीन मंत्रिमंडळाबाबत होते. आता नवीन मंत्र्यांची यादी अंतिम झाली असून, चन्नी हे आज दुपारी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतील. यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त जाहीर करण्यात येणार आहे.
चरणजितसिंग चन्नी यांनी नुकतीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी हेही या शपथविधीला उपस्थित होते. त्यांनीच चन्नी यांची निवड करत दोन गटांमध्ये विभागलेल्या पंजाब काँग्रेसमधील मतभेदांवर जालीम उपाय केल्याचे बोलले जात आहे. परंतु शपथविधीला अमरिंदरसिंग यांची दांडी मारली होती. त्यामुळे पंजाब काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. यामुळे अमरिंदरसिंग हे काँग्रेस सोडतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी आरपारची लढाई सुरू केली असून, ते सातत्याने काँग्रेस नेतृत्वाला आव्हान देत आहेत. त्यांनी आता पक्षातून काढून दाखवा, असे थेट आव्हान दिले होते. त्यांचे कट्टर शत्रू प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना हे आव्हान त्यांनी दिले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी अनुभव नसलेले आणि दिशाभूल झालेले आहेत, अशी टीका त्यांनी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.