दिल्ली : ५ राज्यांमधील निवडणूक निकालात भाजप (BJP) आणि आम आदमी पक्षाचा (Aam Aadmi Party) करिश्मा पहायला मिळाला. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये भाजपने बहुमताने विजय मिळवला आहे. तर पंजाबचे मैदान एकहाती 'आप'ने मारले आहे. याशिवाय गोव्यात देखील 'आप'ने २ जागा जिंकल्या आहेत. याशिवाय नियमित बातम्यांमध्ये नसलेली एक गोष्ट म्हणजे नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) (JDU) पक्षानेही मणिपूर विधानसभेत ६ जागा जिंकल्या आहेत.
याच सर्व निकालानंतर आता आम आदमी पक्षाला आणि जनता दल (संयुक्त) पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख मिळवण्याची मोठी संधी मिळाली आहे. मात्र त्याचवेळी मणिपूर, उत्तरप्रदेश, गोवा या राज्यांमध्ये निवडणूक लढवून देखील समाधानकारक यश न मिळाल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाला त्यांचा राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता गमावण्यासाठी धोक्याची घंटा आहे.
लोकसभेच्या एकूण जागांच्या किमान २ टक्के जागा ३ राज्यांमधून. म्हणजेच लोकसभेत ३ राज्यांमधून किमान ११ खासदार.
लोकसभेत किमान ४ खासदार. सोबतच ४ राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये किमान ६ टक्के मत.
किमान ४ राज्यांमध्ये संबंधित पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा.
राज्य पक्षाचा दर्जा मिळवण्याचे निकष ? (Criteria for get state party status in india)
संबंधित पक्षाला त्या राज्यात विधानसभा निवडणुकीत किमान ८ टक्के मत
संबंधित पक्षाला त्या राज्यात विधानसभा निवडणुकीत किमान ६ टक्के मत आणि २ विधानसभा सदस्य
संबंधित पक्षाचे त्या राज्यात किमान ३ विधानसभा सदस्य.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातून ४ आणि लक्षद्वीपमधून १ असे एकूण ५ खासदार आहेत. मात्र महाराष्ट्र वगळात अन्य ठिकाणच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला पुरेशी मत किंवा पुरेसे विधानसभा सदस्य मिळालेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या गुजरात, झारखंड, मेघालय या राज्यांमध्ये प्रत्येकी १ आणि केरळ विधानसभेमध्ये २ सदस्य आहेत. गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव आमदाराचा पराभव झालेला आहे.
या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसची या सर्व राज्यांमधील मतांची टक्केवारी १ टक्क्यांपेक्षा देखील कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता गुजरात, झारखंड, मेघालय, केरळ आणि गोवा या राज्यांमध्ये राज्य पक्षाच्या मान्यतेसाठी देखील पात्र नाही. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ खासदार देखील ३ वेगळ्या राज्यांमधून नाहीत.
तृणमूल काँग्रेसचे सध्या केवळ पश्चिम बंगालमधूनच २२ खासदार आहेत. तर मेघालय आणि पश्चिम बंगालमध्ये वगळता तृणमूलचे कोणत्याही राज्यात विधानसभा सदस्य नाहीत. गोव्यातही केवळ ५ टक्के मत मिळवण्याच तृणमूल काँग्रेसला यश आले आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगाल आणि मेघालयच्या बाहेर अन्य २ राज्यांमध्ये ६ टक्के किंवा पुरेसे विधानसभा सदस्य नाहीत. याशिवाय भारतीय कम्युनिस्ट पक्षाचीही काहीशी अशीच परिस्थिती आहे.
आम आदमी पक्षाला दिल्ली, पंजाब आणि गोवा अशा ३ राज्यांमध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. 'आप'चे गोव्यात सध्या २ आमदार आणि ६ टक्के मत आहेत. तर जनता दल (संयुक्त) ला यापूर्वी बिहार आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता आहे. याशिवाय आता मणिपूरमध्येही जनता दल (संयुक्त) ला राज्य पक्ष म्हणून मिळाली आहे. २०१९ साली झालेल्या अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत जनता दल (संयुक्त) ला ७ जागा मिळाल्या आहेत.
२०१४ पूर्वी प्रत्येक ५ वर्षांनी निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचा दर्जा निश्चित केला जात असे. मात्र २०१६ ला निवडणूक आयोगाने केलेल्या एका सुधारणेनुसार १० वर्षांनी राजकीय पक्षाचा दर्जा निश्चित केला जाणार आहे. परिणामी, ५ वर्षे सर्वच पक्षांना मुदतवाढ मिळाली आहे. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचा दर्जा निश्चित केला जाणार आहे.
निवडणूक आयोगाच्या या बदलामुळे पुढच्या अडीच वर्षांमध्ये १५ राज्यांतील विधानसभा आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा राखण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी संधी मिळणार आहे. आगामी काळात गुजरात, हिमाचल प्रदेश, त्रिपूरा, मेघालय, नागालँड, कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश, मिझोराम, राजस्थान, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिसा, आंध्र प्रदेश या १५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक नियोजित आहेत.
सध्या किती पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे?
देशात सध्या ८ राजकीय पक्षांना ‘राष्ट्रीय पक्ष’चा दर्जा आहे. यात भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षांचा समावेश आहे. (List of national parties of india)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.