
Plane Crash update : एअर इंडियाचे बी७८७ ड्रीमलायनर विमानाचा आज दुपारी अहमदाबादमध्ये भीषण अपघात झाला आहे. हे विमान एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसितगृहावरच कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातावेळी काही विद्यार्थी व डॉक्टर वसतिगृहातील खानावळीमध्ये जेवण करत होते.
अहमदाबादमधील मेघानीनगर भागात विमानाचा अपघात झाला आहे. याच भागात हे वैद्यकीय महाविद्यालय आहे. खानावळीच्या इमारतीमध्ये विमान घुसल्याचे समोर आले आहे. यावेळी विद्यार्थी, डॉक्टर जेवण करत होते. त्यामुळे अनेकजण जखमी झाल्याची माहिती असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात प्रवाशांसह काही विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विमानाचे काही अवशेष वसतिगृहाच्या इमारतीवर दिसत आहेत. इमारतीला भलेमोठे भगदाड पडले असून मोठे नुकसान झाले आहे. खानावळीमधील टेबलांवर जेवणाची भरलेली ताटंही समोर आलेल्या फोटोंमध्ये दिसत आहेत. त्यामुळे याठिकाणी अपघातावेळी मोठी विद्यार्थी संख्या असण्याची शक्यता आहे.
एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा मेसमध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गेला होता. अचानक विमान मेसमध्ये घुसल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. त्याने मेसमधून खाली उडी मारली. त्यामुळे तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याने फोन करून आपल्याला माहिती दिल्याची माहिती या महिलेने दिली आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त विमान निवासी भागातच कोसळल्याने इतर इमारतींचेही मोठे नुकसान झाले आहे. इतर सर्वसामान्य नागरिकही या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहे. परिसरातील अनेक इमारती विमानाच्या स्फोटामुळे नुकसानग्रस्त झाल्या आहे. अद्याप किती जीवितहानी झाली आहे, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.