

Goa Election New Alliance News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर असतानाच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने गोव्यात राजकीय डाव टाकला. यामुळे राष्ट्रीय राजकारणात भूकंप आला असून भाजप-काँग्रेसचे धाबे दणाणल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पार्टीने आगामी गोवा निवडणुकीसाठी ‘गोवा फर्स्ट’ या नव्या आघाडीची घोषणा केली आहे. भाजप आणि काँग्रेसला पर्याय देण्याचा दावा या आघाडीकडून करण्यात आला आहे. या नव्या आघाडीतून भाजपला धोबीपछाड करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून या नव्या आघाडीची चर्चा गोव्यात सुरू झाली होती. आधी यासंदर्भात गोवा फॉरवर्ड पार्टीकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. तर ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीदेखील आपण गोव्यात जात असून तेथे तुम्हाला मोठी घोषणा ऐकण्यास मिळेल, असे सांगितले होते. यावरून गोव्याच्या राजकारणात केजरीवाल राजकीय खेळी खेळतील, असे संकेत मिळत होते.
दरम्यान, आज (ता. १३) केजरीवाल यांनी प्रत्यक्ष गोव्यात पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली. त्यांनी या युतीचे नाव ‘गोवा फर्स्ट’ असणार आहे, असे सांगत गोव्याच्या राजकारणात भाजप आणि काँग्रेसला एक सक्षम पर्याय म्हणून ही युती उदयास येईल, असा दावा केला. केजरीवाल म्हणाले की, गोव्यातील लोकांकडे भाजप किंवा काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नव्हता, ते मर्यादित होते. गोव्याच्या मतदारांनी कधी भाजपला, तर कधी काँग्रेसला सत्तेवर निवडून दिले. पण आता त्यांच्यापुढे एक नवीन पर्याय असेल, असे म्हणत त्यांनी भाजप आणि काँग्रेसमध्ये युती असल्याचा आरोपदेखील यावेळी केला. तर आता गोव्यातील जनतेला बदल हवा असल्याचा दावादेखील त्यांनी केला आहे.
भाजप-काँग्रेसवर हल्लाबोल
गोव्यात भाजप आणि काँग्रेसची छुपी युती असून यातूनच दोन्ही पक्षांनी येथे सत्ता ताब्यात घेतली. आधी 2017 मध्ये लोकांनी भाजपवर नाराज होऊन काँग्रेसला मतदान केले. मात्र, सत्तेतील आपलेच आमदार भाजपकडे पाठवून भाजपचे सरकार काँग्रेसने आणले. यानंतर 2022 मध्ये देखील लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केले. मात्र, काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांनाच सरकार स्थापनेसाठी मदत केली. अशा पद्धतीने गोव्याच्या लोकांची दोन वेळा फसवणूक झाली. पण आता अशी फसवणूक तिसऱ्यांदा होणार नसून त्यांना नवा पर्याय आहे.
हे फक्त पैशाचे सरकार
या सरकारला कोणतीही विचारधारा नसून भाजपमध्ये निम्म्याहून अधिक काँग्रेसचे आहेत. यामुळे हे सरकार ना भाजपचे आहे आणि ना काँग्रेसचे. हे फक्त पैशाचे सरकार आहे. त्यांच्यासाठी फक्त पैसा महत्त्वाचा असून आज गोव्यात माफिया राज्य करत आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
काँग्रेसला पर्याय
तर आता गोव्यातील जनतेला ‘गोवा फर्स्ट’ हा पर्याय असून ते ‘गोवा फर्स्ट’ला मतदान करू शकतात. ते भाजपचा पराभव करू शकतात. तर हा काँग्रेसवर नाराज असलेल्यांना देखील पर्याय असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले आहे.
सरकार बनवणार
यावेळी केजरीवाल यांनी गोव्यात ‘गोवा फर्स्ट’ निवडणूक जिंकेल आणि स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर ही आघाडी गोव्यातील जनतेप्रती कटिबद्ध असेल, त्यांच्या हिताचे काम करेल. तर जनविश्वासाच्या जोरावर निवडणूक जिंकणे आणि सरकार स्थापन करणे हे ‘गोवा फर्स्ट’चे उद्दिष्ट असल्याचेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर नव्या आघाडीमुळे राजकीय भूकंप झाला असून नव्या आघाडीमुळे राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.