

National Investigation Agency Takes Charge of the Case : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनसमोर झालेल्या स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या पहलगाव दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. त्यातच दिल्लीतील स्फोटाचे दहशतवादी कनेक्शन समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या स्फोटामध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून दिल्लीतील बैठका घेतल्या जात आहेत. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. दिल्ली पोलिसांकडूनच या स्फोटाचा तपास केला जात होता. पण शहांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर आता हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA कडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशातील दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी, दहशतवादी हल्ल्यांचा तपास करण्यासाठी 2008 मध्ये 'एनआयए'ची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे या संस्थेकडे तपास देण्यात आल्याने आतापर्यंतच्या तपासात दिल्लीतील स्फोट हा मोठ्या दहशतवादी षडयंत्राचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. या स्फोटाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
'एनआयए'कडे तपास येण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांसह इतर तपास यंत्रणांकडून अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. स्फोट झालेल्या कारचाही तपास लागला असून त्याअनुषंगाने पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे एनआयएच्या पथकानेही घटनास्थळाचा ताबा घेत तातडीने तपासही सुरू केला आहे.
दिल्लीतील स्फोटामागे डॉ. उमर मोहम्मद हा मास्टरमाईंड असल्याची चर्चा आहे. स्फोट झाला त्यावेळी तोच कार चालवत होता. त्यामुळे हा आत्मघातकी दहशतवादी असल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांकडून वर्तविला जात आहे. यामागे फरीदाबाद कनेक्शन समोर आले आहे. सोमवारीच फरीदाबाद येथील एका मेडिकल कॉलेजमधून दोन तर इतर ठिकाणाहून एका अशा तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. त्यांना अटक कऱण्यात आल्याने घाबरलेल्या डॉ. उमरने हा स्फोट घडवून आणल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अटक करण्यात आलेले तीन डॉक्टर अमोनियम नायट्रेटचा पुरवठा, बॉम्ब बनविण्याचे प्लॅनिंगमध्ये सहभागी असू शकतात. हे चौघेही डॉक्टर एकमेकांशी संबंधित असावेत. या चौघांचेही जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे का, याबाबतचा तपास यंत्रणांकडून केला जात आहे. स्फोटामध्ये अमोनियम नायट्रेट फ्युएल ऑईल यासारख्या शक्तीशाली विस्फोटकांचा वापर करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.