
New Delhi News : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगाममध्ये जाऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश पाहून अमित शहा हेही भावूक झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
दहशतवादी हल्ल्याचा जगभरात निषेध होत आहे. भारताकडून या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असे सरकारने म्हटले आहे. कालपासून दिल्लीत अनेक बैठका सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख व इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या आहेत.
यादरम्यान शाह यांनी मंगळवारी सकाळी बेछूट गोळीबार झालेल्या ठिकाणाची सुरूवातीला हेलिकॉप्टरमधून पाहणी केली. त्यानंतर प्रत्यक्ष त्याठिकाणीही भेट दिली. मृत्यू झालेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी नातेवाईकांनी शहांसमोरच हंबरडा फोडला. हे पाहून शहाही भावूक झाले. कुणाच्या डोक्यावर, पाठीवरून हात फिरवत त्यांनी नातेवाईकांचे सांत्वन केले. यावेळी येथील वातावरण अत्यंत भावनिक झाले होते.
शहांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, ‘पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात आपल्या जवळच्यांना गमावण्याचे दु:ख देशातील प्रत्येकाला आहे. ते शब्दांत व्यक्त केले जाऊ शकत नाही. मी आपल्या या सर्व कुटुंबांना आणि देशाला विश्वास देतो की, या निर्दोष लोकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना सोडणार नाही.’ त्याआधी शहांनी मृतांच्या पार्थिवाचे दर्शनही घेतले.
दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांसह काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सरकारकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन श्रीनगरला जाणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.