
Rahul Gandhi’s Meeting with Former BJP Minister : मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांना कडाडून विरोध करणारे ज्येष्ठ नेते अनिल जोशी यांनी मंगळवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीमुळे जोशी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. कायद्यांना परखडपणे विरोध केल्याच्या कारणास्तव भाजपने त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते.
अनिल जोशी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशाला महत्व प्राप्त झाले आहे. त्यांनी दिल्लीत राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. पंजाबमधील हिंदुत्तवादी चेहरा म्हणूनही जोशी यांच्याकडे पाहिले जाते. भाजपमधून त्यांना 2021 मध्ये निलंबित करण्यात आले होते.
भाजपमधून डच्चू मिळाल्यानंतर जोशी यांनी शिरोमणी अकाली दलात प्रवेश केला होता. नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांनी अकाली दलालाही रामराम ठोकला होता. पंजाबमधील मझा भागामध्ये त्यांचा दबदबा आहे. राज्यात तरणतारण विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. जोशी यांना या निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट दिले जाण्याची चर्चा आहे. इतर सर्व पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे.
जोशी यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे. जोशी यांनी 1998 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2007 मध्ये अमृतसर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2012 च्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. शिरोमणी अकाली दल आणि भाजपच्या सरकारमध्ये ते मंत्री होते.
मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात जोशी यांनी उघडपणे बंड पुकारले होते. सरकारच्या कृषिविषय़क धोरणांविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली होती. त्यांनी शिरोमणी अकाली दलाच्या तिकीटावर 2024 मध्ये अमृतसर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण काँग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला.
दरम्यान, जोशी यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत अद्याप अधिकृतपणे घोषणा झालेली नाही. असे असले तरी पंजाबचे काँग्रेस प्रभारी भूपेश बघेल यांच्या उपस्थितीत आजच जोशी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. ते तिकीटासाठी काँग्रेसमध्ये करणार नाहीत, तर काँग्रेसची विचारधारा आणि राहुल गांधी यांच्या व्हिजन पाहून ते प्रभावित झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.