

Tamil Nadu political news : दक्षिण भारतात ताकद वाढविण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाचे तमिळनाडूतील ताकदवान नेते के. अण्णामलाई हे पक्षावर प्रचंड नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ते पक्ष सोडून नवा पक्ष काढण्याच्या तयारीत असल्याचेही तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.
अण्णामलाई यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांचे एक पोस्टर कारणीभूत ठरले आहे. कोईम्बतूरमध्ये अनेक ठिकाणी त्यांची पोस्ट झळकली आहे. या पोस्टर्सवर त्यांचा फोटो आणि त्यावर 'भयमुक्त मनाला कोणतीही मर्यादा नसते', असे लिहिले आहे. त्यावरून तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई नवा पक्ष काढणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
कोईम्बतूरमध्ये राज्य भाजपची महत्वपूर्ण बैठक होत असताना असे पोस्टर्स झळकले आहे. विशेष म्हणजे अण्णामलाई सध्या परदेशात आहेत. त्यांच्या समर्थकांनी बैठक होत असलेल्या परिसरात हे पोस्टर्स लावले आहेत. अण्णामलाई यांनी आतापर्यंत दोन बैठकांना दांडी मारली आहे. त्यामुळे पक्षांतर्गतही याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
सध्या सुरू असलेल्या चर्चांवर किंवा पोस्टर्सवर अण्णामलाई यांच्याकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी मात्र आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, तामिळनाडूमध्ये आणखी एक राजकीय पक्ष स्थापन होण्याच्या मार्गावर असून उलथापालथ अधिक तीव्र झाली आहे.
इंडिया टुडेला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अण्णामलाई हे नवीन पक्ष काढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजपचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना दिल्लीत जाऊन भेटणार आहेत.' या घडामोडींमुळे तमिळनाडूतील राजकारण पुन्हा तापणार आहे. अण्णामलाई यांनी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या इयत्ता नववीसाठीच्या त्रिभाषा सुत्रावरून नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी याबाबत थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहिले होते.
दरम्यान, अण्णामलाई यांना विधानसभा निवडणुकीआधी प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यात आले होते. एआयएडीएकेशी आघाडी करण्यावरून त्यांचा विरोध होता. निवडणुकीमध्येही अण्णामलाई फारसे सक्रीय दिसून आले नाहीत. त्यांना उमेदवारीही देण्यात आली नव्हती. त्यामुळे पक्षात त्यांची पीछेहाट झाल्याचे चित्र दिसत होते. आता थेट ते पक्षातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.