Arvind Kejariwal On Delhi Ordinance : बिहारची राजधानी पाटणा येथे २३ जून रोजी देशातील विरोधकांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक मोठी अट ठेवली आहे. याबाबत त्यांनी विरोधकांना पत्र लिहिले आहे. त्या पत्राद्वारे देशातील विरोधकांपुढे त्यांनी दिल्लीतील एका मुद्द्यावर सर्वात आधी चर्चा करण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. २३) पाटणा येथे भाजपविरोधकांची बैठक होत आहे. यासाठी जनता दल (संयुक्त)चे नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी दिल्लीतील अध्यादेशावर प्रथम चर्चा करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी मंगळवारी (ता. २०) सर्व विरोधक पक्षांना पत्र दिले आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले, विरोधी पक्षांच्या या बैठकीत सर्वप्रथम दिल्लीबाबत आणलेल्या अध्यादेशाला संसदेत पराभूत करण्यावर चर्चा व्हावी. आज दिल्लीत जे घडत आहे ते उद्या इतर राज्यांमध्ये होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रीय राजधानीतील प्रशासकीय सेवांवर नियंत्रण ठेवण्याच्या केंद्राच्या अध्यादेशावर चर्चा करणे खूप गरजेचे आहे. "
केंद्राच्या अध्यादेशात काय आहे?
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि शिस्तभंगाच्या कारवाईसाठी राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण तयार करण्याच्या उद्देशाने केंद्राने अध्यादेश जारी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पोलीस, सार्वजनिक सुव्यवस्था आणि जमिनीशी संबंधित प्रकरणांव्यतिरिक्त इतर सर्व बाबींचे नियंत्रण दिल्लीतील निवडून आलेल्या सरकारकडे सोपवल्यानंतर हा अध्यादेश आणला. अध्यादेश जारी केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत केंद्राला ते बदलण्यासाठी संसदेत विधेयक मांडावे लागणार आहे
'आप'ला विरोधकांचा पाठिंबा
केंद्राने आणलेल्या या अध्यादेशाविरोधात आम आदमी पार्टीच्या सरकारला अनेक पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही या प्रकरणी केजरीवाल यांना पाठिंबा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतः अनेक मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या मुद्द्यावर त्यांचा पाठिंबा मागितला.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.