
RCB Business Head Nikhil Sosale Among the Accused : बेंगलुरू चेंगराचेंगरी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी बेंगलुरू पोलिसांनी स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचा मित्र आणि पत्नी अनुष्काच्या मैत्रिणीच्या पतीला अटक केली आहे. तसेच इतर तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्याने खळबळ उडाली आहे. चेंगराचेंगरीमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
तब्बल 18 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद मिळाले आहे. त्याचे सेलिब्रेशन करण्यासाठी बुधवारी बेंगलुरूमध्ये रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर लाखो चाहते जमले होते. पण त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. तसेच आरसीबी व्यवस्थापन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीही गोत्यात आली आहे.
बेंगलुरू पोलिसांनी शुक्रवारी आरसीबीचे मार्केंटिंग हेड निखिल सोसाळे यांच्यासह तिघांना अटक केली आहे. ते मुंबईला जात असतानाच विमानतळावर बेड्या ठोकण्यात आल्या. निखिल हे आरसीबीचे बिझनेस पार्टनर, मार्केटिंग आणि रेव्हेन्यू प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे आरसीबीच्या सर्व पीआर आणि ब्रँड मार्केटिंग मॅनेजमेंटची जबाबदारीही त्यांच्यावर आहे.
विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माची पक्की मैत्रीण मालविका नायक हिचे निखील हे पती आहेत. आरसीबीच्या बहुतेक सामन्यादरम्यान या दोघी स्टेडियमध्ये शेजारी दिसायच्या. मालविका बिझनेस डेव्हलपमेंट आणि बिझनेस पार्टनर म्हणून काम करते. विराट-अनुष्का आणि निखील-मालविका यांचे अनेक एकत्रित फोटो सोशल मीडियात आहेत.
बेंगलुरू पोलिसांनी आरसीबीसह कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर कालच गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आज लगेच अटकेची कारवाई करण्यात आली आहे. निखीलसोबत पोलिसांनी डीएनए इंटरटेनमेंट नेटवर्क्स या कार्यक्रम आयोजक कंपनीच्या तिघांनाही अटक केली आहे. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेशही कर्नाटक सरकारने दिले आहेत.
आरसीबीने गुरूवारी एका निवेदनाद्वारे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे जखमींच्या मदतीसाठी आरसीबी केअर नावाने फंड सुरू करण्यात आला आहे. चेंगराचेंगरीच्या दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण आरसीबी कुटुंब दु:खात असल्याचे आरसीबीने निवेदनात म्हटले आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करताना अनेक गंभीर कलमे लावली आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम १०५ (हत्येस कारणीभूत), कलम ११५ (जाणीवपूर्वक इजा करणे), ११८ (खतरनाक साधनांचा वापर करून इजा पोहचविणे), १९० (हेतू साध्य करण्यासाठी बेकायदेशीर गर्दी जमविणे), १३२ (लोकसेवकाला कर्तव्यापासून रोखणे), १२५(१२) (दुसऱ्यांचा किंवा स्वत:चा जीव धोक्यात घालणारे कृत्य) आणि कलम १२१ (गुन्हा करण्यासाठी भडकावणे) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.