Nitish Kumar government reshuffle : राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्र्यानंतर गृहमंत्रिपद हे सर्वात महत्वाचे पद मानले जाते. मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे हे पद मिळविण्यासाठी राजकीय पक्षांकडून मित्रपक्षांसोबतच्या वाटाघाटींमध्ये जोरदार प्रयत्न केले जातात. मागील २० वर्षे नितीश कुमार यांनी बिहारमध्ये मुख्यमंत्री असताना हे खातं आपल्याकडेच ठेवले होते. पण यावेळी भाजपने डाव पलटवला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी गुरूवारी शपथ घेतली. त्यांच्यासोबत २६ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर खातेवाटप कधी होणार, कोणाला कोणते खाते मिळणार, याबाबत उत्सुकता होती. प्रामुख्याने मागील २० वर्षे मुख्यमंत्र्यांकडेच असलेले गृहखातं यावेळीही त्यांच्याकडेच राहणार की त्यावर भाजप आपला दावा सांगणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते.
अखेर आज खातेवाटप जाहीर झाल्यानंतर या चर्चांवर पडदा पडला आहे. बिहार भाजपमधील सर्वात मोठे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे गृह खात्याचा कारभार सोपविण्यात आले आहे. आता राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी पुढील पाच वर्षे नितीश कुमारांकडे असणार नाही. त्यांनी पहिल्यांदाच हे खाते अन्य मंत्र्यांकडे सोपविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
खातेवाटपामध्ये भाजपकडे कृषी खातेही आले आहे. दुसरे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांना भूमि व महसूल विभाग मिळाला आहे. तर दिलीप जयस्वाल उद्योगमंत्री असतील. भाजपकडे मुख्यमंत्रिपद नसले तरी अपेक्षेप्रमाणे महत्वाची खाती आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले आहे. जेडीयू नेत्यांसह नितीश कुमार हे गृहखाते आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही होते. पण भाजपने ते आपल्याकडे खेचून आणले आहे.
नितीश कुमार यांच्या सध्याच्या २६ जणांच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक १४ भाजपचे तर ८ जेडीयूचे मंत्री असतील. तर मित्रपक्षांना चार मंत्रिपदे देण्यात आली आहेत. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ८९ जागा मिळाल्या आहेत. भाजप राज्यात पहिल्यांदाच सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यामुळे भाजप महत्वाची खाती आपल्याकडे ठेवण्यासाठी ताकद पणाला लावणार, हे स्पष्टच होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.