
थोडक्यात महत्वाचे :
बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे नाव लखीसराय आणि बांकीपूर या दोन मतदारसंघात असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.
यादव यांनी मतदारयादीतील फोटो, स्वाक्षरीतील फरक आणि वयातील विसंगती दाखवत निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप लावला.
विजय सिन्हा यांनी आरोप फेटाळून सांगितले की, नाव काढण्याची प्रक्रिया सुरू असून ते फक्त एका ठिकाणीच मतदान करतात.
Dual voter entry Election Commission criticism : मतदारयाद्यांमधील घोळावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. निवडणूक आयोगाच्या बिहारमधील मतदारयाद्यांच्या पुनर्पडताळणी मोहिमेसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील घोळावरही त्यांनी बोट ठेवले आहे. त्यातच आयोगाच्या कारभाराचे पुन्हा पितळ उघडे पडले आहे.
बिहारमधील मतदारयाद्या पुनर्पडताळणी मोहिमेतील घोळाची अनेक उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव यांच्या नावावर दोन मतदान ओळखपत्र असल्याचे समोर आले होते. त्यांना आयोगाने नोटीसही पाठविली. पण आता पुनर्पडताळणीनंतरही विद्यमान उपमुख्यंत्र्यांचीच दोन मतदारसघात नावे असल्याचे समोर आले आहे.
तेजस्वी यादव यांनीही पुराव्यासह हा प्रकार उजेडात आणला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तेजस्वी यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, मोदींचे खासमखास बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा हे लखीसराय आणि बांकीपूर विधानसभा मतदारसंघात मतदार आहेत. त्यांच्याकडे दोन मतदान ओळखपत्र आहेत.
तेजस्वी यादव यांनी मतदारयाद्यांमधील फोटो सोशल मीडियात पोस्ट केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, सिन्हा हे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आयोजित निवडणुकीत दोन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात दोनवेळा मतदान करतात. दोन्ही ठिकाणी त्यांचे वय वेगळे आहे. हा फर्जीवाडा नाही का?, असा सवाल यादव यांनी केला आहे.
सिन्हा यांनी जाणीवपूर्व दोन ठिकाणी नोंदणी केल्याचा आरोप तेजस्वी यांनी केला आहे. त्यावरील त्यांची स्वाक्षरीही वेगवेगळी आहे. त्यांनी ही स्वाक्षरी केली नसेल तर निवडणूक आयोगाने बनावट स्वाक्षरीच्या आधारे त्यांची नोंदणी केली का, असा प्रश्न तेजस्वी यांनी केला आहे. तात्पुरत्या मतदारयाद्यांमध्ये त्यांचे नाव आहे, असे तेजस्वी यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक भाजप समर्थकांचे मतदार याच पॅटर्नमध्ये बनविले आहे का, आयोगाने दोन ठिकाणी त्यांचे नाव तात्पुरत्या मतदारयादीत कसे टाकले, आता दोन स्वतंत्र नोटीस जारी होणार की विरोधकांसाठीच हा नियम आहे, असे सवाल तेजस्वी यांनी केले आहे.
दरम्यान, सिन्हा यांनी तेजस्वी यांचे आरोप फेटाळले आहेत. बांकीपूर मतदारसंघात आपले आणि कुटुंबाचे नाव होते. एप्रिल 2024 मध्ये मी लखीसराई मतदारसंघात नोंदणीसाठी अर्ज केला होता. तसेच बांकीपूरमधून नाव हटविण्यासाठीही अर्ज केला होता. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. पण काही कारणांमुळे माझे नाव तिथून हटले नाही. मी एकाच मतदारसंघात मतदान करतो. मागीलवेळीही मी एकाच ठिकाणी मतदान केल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Q1: तेजस्वी यादव यांनी कोणावर आरोप केला आहे?
A: बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्यावर.
Q2: आरोप काय आहे?
A: दोन वेगवेगळ्या मतदारसंघात नाव नोंदवले असल्याचा.
Q3: सिन्हा यांचे स्पष्टीकरण काय आहे?
A: नाव हटवण्यासाठी अर्ज केला असून ते एका ठिकाणीच मतदान करतात.
Q4: तेजस्वी यांनी कोणते पुरावे दिले?
A: मतदारयादीतील फोटो, स्वाक्षरीतील फरक आणि वयातील विसंगती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.