
Political shock for Lalu Prasad Yadav ahead of Bihar Assembly Elections : बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीएसह काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाने जोरदार तयारी सुरू केली आहे. आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापले आहे. विरोधकांनी मतदारयाद्यांच्या पुनर्पडताळणी मोहिमेविरोधात रान उठवले आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी बिहारच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्याने आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यांना मोठा धक्का बसला आहे.
राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यादव यांच्या मतदार अधिकार यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असून बिहारमधील वातावरण फिरल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी गया येथे विविध विकासकामांचे लोकार्पण केले. पण यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर लालूंचे दोन आमदार उपस्थित राहिल्याने बिहारच्या राजकाराणात खळबळ उडाली आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी नवादाच्या आमदार विभा देवी आणि रजौलीचे आमदार प्रकाश वीर हे स्टेजवर उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह एनडीएचे अनेक मोठे नेते स्टेजवर असताना आरजेडीच्या या दोन आमदारांची चर्चा सर्वाधिक रंगली होती. हे दोन्ही आमदार निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
विभा देवी या आरजेडीचे माजी आमदार राजवल्लब यादव यांच्या पत्नी आहेत. यादव हे नुकतेच एका पोक्सो प्रकरणात झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेतून मुक्त झाले आहेत. त्यांची निर्दोष मुक्त झाल्यापासून विभा देवी या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाल होती. आता पंतप्रधान मोदींच्या स्टेजवर त्या हजर झाल्याने त्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
प्रकाश वीर हेही पक्षात नाराज असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून होत आहे. तेजस्वी यादव हे काही दिवसांपूर्वी नवादा येथे आले असताना वीर यांचे तिकीट कापले जाणार असल्याचे आडाखे बांधले जात होते. आता त्यांनीही पंतप्रधानांच्या स्टेजवर हजेरी लावत बंडाचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, आरजेडी आणि काँग्रेसकडून बिहारमध्ये पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी जोर लावण्यात आला आहे. काँग्रेसला आरजेडीच्या ताकदीवरच अवलंबून राहावे लागत असले तरी मतदार अधिकार यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी पक्षाला ताकद देण्याचे काम केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत एनडीए विरुध्द इंडिया आघाडी अशी काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.