
Bihar News : बिहार विधानसभा निवडणुका या वर्षाअखेरीस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याआधी निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. बिहारमधील भाजपचे (BJP) बडे नेते आणि उद्योगपतीची गोळ्या घालून हत्या करण्याच आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
बिहारची राजधानी असलेल्या पाटणा येथे भाजप नेते आणि नावाजलेल्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या गोपाळ खेमका यांची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.4 जुलै) गांधी मैदान पोलीस स्टेशनच्या परिसरातील ट्विन टॉवरजवळ घडली.
भाजप नेते गोपाळ खेमका हे शुक्रवारी रात्री ट्विन टॉवरमधील त्यांच्या घरी परतले होते, तेव्हा दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी खेमका यांच्या दिशेनं अंदाधुंद गोळीबार सुरू केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हॉटेल पानशजवळ अपार्टमेंट समोर गाडीतून उतरल्यानंतर काही समजण्याच्या आतच अज्ञात आरोपींनी गोपाळ खेमका यांच्यावर जोरदार गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या गोळीबारानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.
बिहारमधील (Bihar) भाजपच्या गोपाळ खेमका यांना घटनेनंतर जखमी अवस्थेत नातेवाईकांनी तात्काळ पाटणामधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण डॉक्टरांनी खेमका यांना मृत घोषित केले.या घटनेमुळे बिहारचं राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.
एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमधलं राजकारण तापू लागलं आहे. त्याअनुषंगाने राज्यात राजकीय घडामोडींनी वेग पकडला आहे. सत्ताधारी एनडीएसह इंडिया आघाडीकडून जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. याचदरम्यान,खेमका यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
बिहार विधानसभेची मुदत 22 नोव्हेंबर 2025 ला संपत आहे. त्याआधी निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडे जवळपास साडे-पाच महिन्यांचा कालावधी आहे. मात्र, पावसाळ्यात आयोगाकडून निवडणूक घेतली जात नाही. तर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस छठ पूजा आणि दिवाळी आहे. या उत्सवाच्या तारखा पाहून आयोगाला निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित करावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.