
Kerala News : काँग्रेसच्या नेत्या व केरळातील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियांका गांधी यांच्या विजयाला आव्हान देण्यात आले आहे. या मतदारसंघात त्यांच्याविरोधात निवडणूक लढवलेल्या भाजपच्या उमेदवार नव्या हरिदास यांनी केरळ हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून प्रियांका यांच्या विजयाला आव्हान देण्यात आले आहे.
प्रियांका गांधी यांचे बंधू व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाडसह रायबरेली मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी वायनाड मतदारसंघाचा राजीनामा दिल्यानंतर प्रियांका यांनी ही निवडणूक लढवली. या पोटनिवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय झाला. राहुल गांधींहून अधिक मताधिक्याने त्या विजयी झाल्या आहेत.
भाजप नेत्या नव्या हरिदास यांनी या विजयाला आव्हान दिले आहे. त्यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, प्रियांका यांनी उमेदवारी अर्जात त्यांच्या आणि कुटुंबाच्या संपत्तीची योग्य माहिती दिलेली नाही. त्यांनी चुकीची माहिती दिली असून हे आदर्श आचारसंहितेच्या विरुध्द आणि भ्रष्ट वागणुकीसमान आहे.
प्रियांका यांनी महत्वाची माहिती लपवल्याचा दावा हरिदास यांनी एएनआयशी बोलताना केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही काल केरळ हायकोर्टात प्रियांका गांधी यांच्या विजयाविरोधात निवडणूक याचिका दाखल केली आहे. त्यामुळे स्पष्टपणे म्हटले आहे की, उमेदवारी अर्जातील माहिती अपूर्ण आहे. प्रियांका गांधी आणि त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीविषयी महत्वपूर्ण बाबी लपवण्यात आल्या आहेत.
नव्या हरिदास यांनी सुरूवातीला निवडणूक आयोगाकडेही याबाबत तक्रार केली होती. मात्र, आयोगाने त्याला योग्यप्रकारे हाताळले नाही, असेही हरिदास यांनी म्हटले आहे. दरम्यान, या याचिकेवरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रमोद तिवारी यांनी ही याचिका म्हणजे स्वस्तातला प्रचार असल्याचे म्हटले आहे. ही याचिका फेटाळली जाईल आणि त्यांना दंड ठोठावला जाईल, असा विश्वास असल्याचेही तिवारी म्हणाले.
निवडणुकीत प्रियांका गांधी यांना तब्बल 6 लाख 22 हजार 338 मते मिळाली होती. तर नव्या हरिदास यांना केवळ 1 लाख 9 हजार 939 मते मिळाली. कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार सत्येन मोकेरी यांनी 4 लाख 10 हजार 931 मते मिळवत प्रियांका यांना जोरदार टक्कर दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.