
New Delhi : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी करणाऱ्या आम आदमी पक्षासाठी मोठी खूशखबर आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पुन्हा आपला करिष्मा दाखवून दिला आहे. पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेसनेही आपली ताकद दाखवून दिली आहे.
पंजाबमध्ये पाच महापालिका आणि 41 नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये आपला घवघवीत यश मिळाले आहे. पंजाबमधील मतदारांनी पुन्हा भगवंत मान यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. आपला पाचपैकी तीन महापालिकांमध्ये यश मिळाले आहे. तर 41 पैकी तब्बल 31 नगर परिषदा व नगर पंचायतांमध्ये पक्षाने आपला झेंडा फडकावला आहे.
एकूण 961 पैकी 522 वॉर्डमध्ये आपचे उमेदवार विजयी झाले आहेत. पटियाला महापालिकेत आपने बहुमत मिळवले असून लुधियाना व जालंधरमध्येही सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. मात्र, बहुमतापासून पक्ष दूर राहिला आहे. तर अमृतसह आणि फगवाडा महापालिकेत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. मात्र, बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे आप आणि काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे.
या विजयानंतर आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा विजय प्रत्येक पंजाबीच्या स्वप्नांचा विजय आहे. तुम्ही विकास, प्रामाणिकपणा आणि पुढे जाणाऱ्या पंजाबला मत दिले. नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत आपच्या या विजयाबद्दल पंजाबमधील जनता, सीएम मान आणि आपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला शुभेच्छा, असे केजरीवालांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंजाबमधील या विजयाने केजरीवालांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. दिल्लीतील निवडणूक पुढील काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे हा विजय आपसाठी महत्वाचा मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच हरियाणामध्ये भाजपची सत्ता आली आहे. तर आता पंजाबमध्ये आपने ताकद दाखवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.