Uttar Pradesh News : भाजपने पिलिभित लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार वरुण गांधी (Varun Gandhi News) यांचे तिकीट कापले आहे. त्यांच्याजागी जितीन प्रसाद यांना उमेदवारी दिली. त्यावर वरुण गांधी काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता वाढली होती. ते या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढतील, अशी जोरदार चर्चा होती. तसेच काँग्रेसकडूनही त्यांना ऑफर आली होती, पण कालच त्यांच्या कार्यालयाकडून वरुण गांधी निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. आज त्यांनी स्वत: एका पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
वरुण गांधी यांनी आज पिलिभितवासीयांना उद्देशून खास पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी बालपणीच्या आठवणी सांगत आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मला तीन वर्षांचे छोटे मूल आठवत आहे, जे आपल्या आईचे बोट धरून 1983 मध्ये पहिल्यांदाच पिलिभितमध्ये (Pilibhit Constituency) आले. ही मातीच आपली कर्मभूमी आणि येथील लोक आपले कुटुंब असतील, हे त्याला माहिती नव्हते.
मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. येथील जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली. केवळ एक खासदार म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून मला मिळालेले आदर्श, माझ्यावर झालेल्या संस्कारामध्ये पिलिभितचा वाटा मोठा आहे. तुमचा प्रतिनिधी होणे, हे माझ्यासाठी जीवनातील सर्वात मोठा सन्मान आहे. मी नेहमीच पूर्ण क्षमतेने तुमच्या हितासाठी आवाज उठवत राहीन, असे वरुण यांनी म्हटले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार (MP) म्हणून माझा कार्यकाळ संपला असला तरी पिलिभितसोबतचे माझे नाते अखेरच्या श्वासापर्यंत कायम राहील. एक मुलगा म्हणून मी तुमची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे. माझे दरवाजे तुमच्यासाठी नेहमी खुले असतील. मी राजकारणात सामान्य लोकांचा आवाज बनण्यासाठी आलो होतो. मी यापुढेही सदैव हेच काम करत राहावे, यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आहे. त्यासाठी मला कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, असेही वरुण यांनी पत्रात लिहिले आहे.
माझे आणि पिलिभितचे नाते प्रेम आणि विश्वासाचे आहे. ते कोणत्याही राजकारणापेक्षा मोठे आहे. मी तुमचा होतो, आहे आणि यापुढेही राहीन, असे म्हणत वरुण यांनी पत्रात शेवट केला आहे. दरम्यान, या पत्रामध्ये वरुण यांनी भाजप (BJP) किंवा पक्षातील इतर कोणत्याही नेत्यांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे त्यांची भाजपविषयीची नाराजी पुन्हा एकदा स्पष्टपणे समोर आली आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.