

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांनी आपल्या नव्या टीमची घोषणा केली आहे. नितिन नवीन यांनी भाजपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय संघटनेतील हा पहिला मोठा फेरबदल मानला जात आहे. नव्या टीममध्ये अनुभवी नेत्यांसोबतच युवा नेतृत्वाला स्थान देत संघटनेत संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या नव्या टीममध्ये अनेक अनुभवी आणि वजनदार नेत्यांना पुन्हा महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तीन माजी मुख्यमंत्री आणि मंत्रीपदाचा अनुभव असलेल्या तब्बल 10 दिग्गजांचा नव्या राष्ट्रीय संघटनेत समावेश झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने अनुभवी नेत्यांना पुन्हा मुख्य राजकीय वर्तुळात आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या नव्या टीममध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनाही राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तीन माजी मुख्यमंत्र्यांना भाजपच्या राष्ट्रीय संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे.
याशिवाय बैजयंत जय पांडा, डी. पुरंदेश्वरी, डॉ. भारती पवार, मनप्रीत सिंह बादल, लाल सिंह आर्य, विनोद तावडे आणि स्मृती इराणी यांसारख्या माजी मंत्र्यांनाही राष्ट्रीय संघटनेत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. यापैकी स्मृती इराणी यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती विशेष चर्चेची ठरली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीत पराभव झाल्यानंतर त्या पुन्हा पक्षाच्या राष्ट्रीय संघटनेत सक्रिय भूमिकेत आल्या आहेत.
विनोद तावडे यांच्याकडेही राष्ट्रीय सरचिटणीसपद कायम ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात गेलेल्या तावडेंची संघटनात्मक ताकद याआधीही भाजपने बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्यात वापरली आहे. आता नव्या राष्ट्रीय टीममध्येही त्यांना स्थान मिळाल्याने त्यांचे पक्षातील महत्त्व कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपच्या नव्या टीममध्ये केवळ जुन्या चेहऱ्यांवर भर देण्यात आलेला नाही, तर संघटनात्मक अनुभव आणि राज्यनिहाय राजकीय वजन यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे काही काळ सत्तेच्या किंवा निवडणुकीच्या मुख्य केंद्रापासून दूर राहिलेल्या नेत्यांना पुन्हा राष्ट्रीय राजकारणाच्या फ्रेममध्ये आणण्याचा भाजपचा हा प्रयत्न मानला जात आहे.
नितिन नवीन यांच्या अध्यक्षतेखालील या नव्या टीमकडे आगामी काळातील पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराची आणि निवडणूक रणनीतीची जबाबदारी असणार आहे. अनुभवी नेत्यांचा अनुभव आणि नव्या पिढीतील नेतृत्व यांचा मेळ घालून भाजपची संघटनात्मक ताकद आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न या फेरबदलातून दिसून येत आहे.
नितिन नवीन यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे भाजपच्या राष्ट्रीय टीममधील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
“भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय टीममधील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन. अनुभव आणि ऊर्जेने समृद्ध असलेली ही टीम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेला नवी गती देईल, असा मला पूर्ण विश्वास आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.
“टीममधील सर्व सदस्य कार्यकर्ता भावनेतून संघटनेला आणखी मजबूत करतील. तसेच ‘विकसित भारत’या संकल्पनेला आणि राष्ट्रसेवेच्या ध्येयाला नव्या उंचीवर घेऊन जातील,” असा विश्वासही नितिन नवीन यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.