District Panchayat and Sarpanch Results: Full Breakdown : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधुम सुरू असतानाचा भाजपला गुड न्यूज मिळाली आहे. महाराष्ट्रात विजयासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातून भाजपसाठी आनंदची बातमी आली आहे.
भाजपने या केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. याठिकाणी काँग्रेसला सपाटून मार खावा लागला आहे. स्थानिकमधील ९६ पैकी तब्बल ९१ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या विजयाची दखल घेत सेलिब्रेशन केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात सरपंच, जिल्हा पंचायत आणि नगरसेवकांच्या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार. पक्षाच्या विकासाच्या अजेंड्यासोबतच हा विजय या केंद्रशासित प्रदेशाचे भाजपसोबत असलेले घट्ट नाते दर्शविते. मेहनती कार्यकर्त्यांचे मी कौतुक करतो, असे मोदींनी म्हटले आहे.
दरम्यान, दमन, दीव आणि दादरा नगर हवेली जिल्ह्यांमधील बहुतेक जागांवर भाजपचा विजय झाला आहे. दमन जिल्हा पंचायतीतील एकूण १६ पैकी १५ जागा भाजपने जिंकल्या आहेत. केवळ एक जागा काँग्रेसला मिळाली आहे. नगरपंचायतीमध्येही १५ पैकी १४ जागा भाजपला मिळाल्या आहेत. तर १६ पैकी १५ सरपंच भाजपचे निवडून आले आहेत.
दीव जिल्हा पंचायतीली सर्व ८ पैकी ८ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. दादरा नगर हवेली जिल्हा पंचायतीमध्ये २६ पैकी २४ जागा तर नगर पंचायतीतील सर्व १५ जागा भाजपने जिंकल्या आहेत. या तिन्ही जिल्ह्यातील एकूण जागा ९६ असून त्यापैकी भाजपला ९१ जागांवर विजय मिळाला आहे.
काँग्रेसने भाजपचा दावा फेटाळला
काँग्रेसने भाजपचा हा दावा फेटाळून निवडणूक हायजॅक केल्याचा आरोप केला आहे. मतदानाआधीच काँग्रेसच्या ७० टक्के उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले होते. दादरा नगर हवेली जिल्ह्यात सरपंचपदाचे ७ अर्ज बाद करण्यात आले. काँग्रेसने सरपंचपदाच्या १५ जागा लढविल्या, त्यापैकी ८ वर विजय मिळाला. जिल्हा पंचायतीच्या एकूण २६ जागांपैकी २१ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार होते. त्यापैकी १६ जणांचे अर्ज बाद करण्यात आले. काँग्रेसने सहा जागा लढविल्या, त्यापैकी २ ठिकाणी विजय मिळविल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.