BRICS : जगातील दरी कमी करण्यासाठी लोकांमधील संवादाची गरज; ग्लोबल इम्पॅक्ट फोरममध्ये CM फडणवीसांकडून सहकार्याचा मंत्र

BRICS : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक दरी कमी करण्यासाठी आर्थिक संबंधांसोबत संवाद, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामायिक मूल्यांवर आधारित सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले.
Devendra Fadnavis at Global Impact Forum | BRICS Cooperation
Devendra Fadnavis at Global Impact Forum | BRICS CooperationSarkarnama
Published on
Updated on

BRICS : जगभरात विविध देश, समाज आणि संस्कृतींमध्ये वाढत असलेली दरी कमी करण्यासाठी केवळ आर्थिक संबंध पुरेसे नाहीत, तर लोकांमधील संवाद, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामायिक मूल्यांच्या आधारावर सहकार्य वाढवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईत एपी ग्लोबलच्या वतीने आयोजित ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2’चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यानंतर ते बोलत होते. या वेळी राजकीय, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

श्रीकृष्णाच्या संदेशातून समावेशकतेचा संदर्भ

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उल्लेख करत फडणवीस यांनी समावेशकता, नीतिमत्ता आणि सत्याच्या विजयाचा संदेश अधोरेखित केला. आज जगातील विविध देश आणि समाजांची विचारसरणी, संस्कृती तसेच भूमिका वेगवेगळ्या असल्या, तरी त्यांच्यात अनेक समान मूल्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.

या समान धाग्यांचा आधार घेत भविष्यातील उद्दिष्टांसाठी देशांनी एकमेकांशी संवाद वाढवणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहारांपलीकडे जाऊन लोक, संस्कृती आणि देश यांच्यातील संबंध मजबूत झाले, तर जागतिक सहकार्याची व्याप्ती आणखी वाढू शकते, असे फडणवीस म्हणाले.

‘वसुधैव कुटुंबकम’चा विचार जगाला जोडणारा

भारताच्या प्राचीन सांस्कृतिक परंपरेचा संदर्भ देताना फडणवीस यांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ या विचाराचा उल्लेख केला. संपूर्ण जगाला एका कुटुंबाप्रमाणे पाहण्याची भारतीय भूमिका आजच्या जागतिक परिस्थितीतही महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताने इतिहासात केवळ व्यापाराच्या माध्यमातूनच नव्हे, तर विचार, ज्ञान आणि संस्कृतीच्या देवाणघेवाणीतूनही जगावर प्रभाव टाकला आहे. एका काळात जागतिक व्यापारात भारताचा वाटा 35 टक्क्यांपर्यंत होता, असे फडणवीस यांनी नमूद केले.

बौद्ध धर्माचा भारतातून जगभर झालेला प्रसार हा त्याचा एक महत्त्वाचा दाखला असल्याचे सांगत त्यांनी युद्ध किंवा संघर्षाऐवजी विचारांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या प्रभावाकडे लक्ष वेधले.

Devendra Fadnavis at Global Impact Forum | BRICS Cooperation
Giorgia Meloni: मोदींसारखाच मेलोनींनी देखील केला विक्रम! पंतप्रधानांनी खास पोस्ट करत केलं अभिनंदन

ब्रिक्सकडे संघर्षाचा गट म्हणून पाहू नये

बहुध्रुवीयतेच्या चर्चेत फडणवीस यांनी ब्रिक्सचा संदर्भ दिला. ब्रिक्सची निर्मिती ही एखाद्या शक्तीच्या विरोधात उभा केलेला गट म्हणून पाहता येणार नाही. प्राचीन आणि समृद्ध संस्कृती असलेल्या विविध देशांकडे जगासमोर मांडण्यासाठी अनुभव, ज्ञान आणि मूल्यांची मोठी परंपरा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्राचीन संस्कृती, खाद्यपरंपरा, पारंपरिक औषधोपचार पद्धती यांसारख्या क्षेत्रांतील अनुभवांची देवाणघेवाण जागतिक शांतता आणि सहकार्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असेही त्यांनी सांगितले.

पुरवठा साखळीतील बदलांमध्ये सहकार्य महत्त्वाचे

जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये सध्या होत असलेल्या बदलांकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले. देशांमधील परस्परावलंबित्व वाढत असताना संवाद आणि सहकार्याला पर्याय नाही. राजकीय नेतृत्वाच्या पातळीवर होणाऱ्या करारांसोबतच नागरिक, संस्कृती आणि विविध देशांमधील थेट संवादही वाढला पाहिजे, असे ते म्हणाले.

अशा संवादातून विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होऊ शकतात आणि जागतिक पातळीवर अधिक व्यापक सहकार्याची व्यवस्था उभी राहू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Devendra Fadnavis at Global Impact Forum | BRICS Cooperation
India GDP Growth : GDP चे अच्छे दिन येताच पंतप्रधान मोदी भलतेच खूश; नवे रील करत परदेशी प्रवास अन् सोनं खरेदीबाबत केलं मोठं वक्तव्य

जागतिक फोरमसाठी मुंबईच योग्य का?

मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरमचे आयोजन होत असल्याबद्दल फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. भारताची आर्थिक आणि व्यावसायिक राजधानी असण्यासोबतच मुंबईने तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि फिनटेक क्षेत्रातही आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

विविध भाषा, संस्कृती आणि समुदायांना सामावून घेणारे मुंबईचे स्वरूप हेच शहराचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे जगातील विविध भागांतील लोकांना आणि विचारांना एका मंचावर आणणाऱ्या ग्लोबल फोरमसाठी मुंबई हे योग्य ठिकाण असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

जागतिक पातळीवर वाढणाऱ्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर अशा व्यासपीठांमधून संवादाची प्रक्रिया अधिक मजबूत होऊ शकते. देश, संस्कृती आणि लोकांमधील परस्पर समज वाढवून सहकार्याचा नवा मार्ग तयार करण्याची गरज असल्याचा संदेश फडणवीस यांनी या वेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com