
देशात मंडल आयोग लागू झाला आणि पहिल्यांदाच बहुजन, मागास वर्गातील नागरिकांमध्ये आपल्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण झाली. उत्तर प्रदेशातील राजकीय चित्रही बदललं. दलित समाजाला आरक्षण आधीपासूनच होतं, मात्र राजकीदृष्ट्या जागरूक होण्याची त्यांच्यासाठीही ही योग्य वेळ होती आणि झालंही तसंच. दलित राजकारणाचा उदय झाला तो कांशीराम यांच्यामुळं.
दलित समाजाच्या राजकीय उत्थानाचं, त्यांना राजकारणात महत्व मिळवून देण्याचं श्रेय कांशीराम यांनाच जातं. बहुजन समाज पार्टी अर्थात बसपाचे संस्थापक असलेले कांशीराम हे दलित राजकारणाचा चेहरा बनले.
कांशीराम हे मूळचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचेच समर्थक, पण या पक्षाच्या त्या काळातील म्हणजे 1960 च्या दशकातील नेत्यांकडून त्यांची निराशा झाली. समानतेसाठी संघर्ष करायचा सोडून या पक्षाचे नेते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काही सहकारी व्यक्तिगत स्वार्थासाठी सत्ताधाऱ्यांसोबत जात आहेत, असा त्यांचा आक्षेप होता. त्यावेळी सर्वात मोठा पक्ष काँग्रेस होता. हाच पक्ष सत्ताधारीही होता.
'दी चमचा युगः अॅन एरा ऑफ स्टूज' हे पुस्तक कांशीराम यांनी लिहिलं होत. त्यात या बाबींचा उल्लेख आहे. पुणे कराराच्या 50 व्या वर्धापनदिनी 24 सप्टेंबर 1982 रोजी या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. ब्रिटिश वसाहतकालिन भारतात समतेसाठी बंड करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांना हे पुस्तक अर्पण करण्यात आलं.
बहुजनांच्या राजकारणासह सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रातही भरीव योगदान देणाऱ्या कांशीराम यांचा जन्म 15 मार्च 1934 रोजी पंजाबमधील रोपाड जिल्ह्यातील पिर्तीपूर बुंगा या गावात शीख चर्मकार कुटुंबात झाला. अन्य दलित समाजांतील नागरिकांप्रमाणे त्यांना भेदभावाचा सामना करावा लागला नाही, कारण ते शीख कुटुंबात जन्मले होते. एका मुलाखतीत त्यांनी स्वतःच हे सांगितलं होतं. शीख गुरुंची शिकवण समानतेची होती.
यामुळेच शीख धर्माचा स्वीकार केलेल्या चर्मकार समाजातील कुटुंबांना वरचं स्थान होतं. शाळा, महिवाद्यालयात असताना त्यांना त्यांच्या जातीबद्दल फारशी माहिती नव्हती, असंही ते या मुलाखतीत म्हणाले होते. त्यांचं प्राथमिक, माध्यमिक शिक्षण गावात आणि परिसरातील शाळांमध्ये झालं. रोपाड येथील शासकीय महाविद्यालयातून 1956 मध्ये ते बी.एस्सी. झाले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कांशीराम हे 1957 मध्ये पुण्यातील संरक्षण विभागाच्या आयुध निर्मिती करणाऱ्या कारखान्यात रिसर्च असिस्टंट म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी पाच वर्षं नोकरी केली. त्या पाच वर्षांत त्यांना आलेल्या अनुभवामुळं त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यातून कांशीराम यांनी दलितांमधील राजकीय अस्मिता जागी केली. त्यांना जातीय भेदभावाचा पहिला अनुभव याच कारखान्यात आला. महाराष्ट्रला पुरोगामी राज्य म्हटलं जातं आणि अशा राज्यात कांशीराम यांना अंतर्बाह्य हादरवून टाकणाऱ्या वस्तुस्थितीचा सामना करावा लागला होता.
बुद्ध जयंती आणि आंबेडकर जयंतीला कारखान्यात सुटी दिली जायची. मात्र त्यात प्रशासनाकडून बदल करण्यात आला आणि या सुट्या रद्द करण्यात आल्या. सुट्या मागणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत भेदभाव केला जाऊ लागला. कांशीराम यांना हे सगळं दिसत होतं. त्यामुळं त्यांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून लढा उभा केला. यशवंतराव चव्हाण हे त्यावेळी संरक्षणमंत्री होते. त्यांना या प्रकाराची माहिती मिळाली. त्यांनी चौकशीचे आगदेश दिले आणि दोन्ही सुट्या बहाल करण्यात आल्या.
पुण्यातील वास्तव्याच्या कालावधीतच कांशीराम यांचा महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याशी संबंध आला. कांशीराम यांनी सामाजिक क्षेत्रात उतरून भेदभाव मिटवण्याचा निर्णय घेतला आणि ते दलित चळवळीत सक्रिय झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं 'अॅनिहिलेशन ऑफ कास्ट' हे पुस्तक वाचून त्यांनी हा निर्णय घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.
रिपब्लिकन पक्षापासून दूर झाल्यानंतर कांशीराम यांनी 1978 मध्ये मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बामसेफची स्थापना केली. ब्राह्मण्यवादी सामाजिक रचनेतील मागास 6000 जातींच्या लोकांमध्ये एकजूट निर्माण करणे, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. या जातींची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 85 टक्के आहे. किमान 50 टक्के बहुजन जरी संघटित झाले, एक झाले तर केंद्रात मागासवर्गीयांचं सरकार येईल, असं कांशीराम म्हणत असत. मागासवर्गीय समाजातील लोक सत्ताधारी झाल्याशिवाय देश आणि समाजात खऱ्या अर्थाने समानता येणार नाही. राजकीय शक्ती, सत्ता असली तरच शोषितांच्या, मागासांच्या प्रगतीची कवाडं उघडतील, असं कांशीराम यांच मत होतं.
बामसेफ ही राजकीय, धार्मिक संघटना नाही. दलित समाजातील विखुरलेल्या प्रगत, शासकीय सेवेतील नागरिकांना एकत्र करण्याचं काम या संघटनेनं केलं. पुढे 1981 मध्ये त्यांनी डीएस4 या आणखी एका संघटनेची स्थापना केली. याद्वारे दलित मतदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी 14 एप्रिल 1984 रोजी त्यांनी बहुजन समाज पार्टीची म्हणजचे बसपाची स्थापना केली. अनुसूचित जाती, जमातींतील नागरिक, अन्य मागासवर्गांतील नागरिकांसह अल्पसंख्याक नागरिकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, त्यांच्या हक्कांसाठी या पक्षाची स्थापना करण्यात आली. आपल्या वारसदार म्हणून 2001 मध्ये कांशीराम यांनी मायावती यांच्या नावाची घोषणा केली.
दलित, बहुजनांची लोकसंख्या 85 टक्के असतानवा सत्ता मात्र केवळ 15 टक्के लोकसंख्या असलेल्या उच्चवर्णीयांच्या हातात असणे, हे कांशीराम यांना अस्वस्थ करून गेले. या 85 टक्के लोकसंख्येला एकजूट करण्यासाठीच त्यांनी बामसेफ, डीएस4 आणि मग बसपाची स्थापना केली होती. यासाठीचा त्यांचा सुरुवातीचा संघर्ष महाराष्ट्रातून सुरू झाला होता. महाराष्ट्रात त्यावेळी दलित चळवळ अस्तित्वात होती, ती कांशीराम यांच्यासाठी उपयुक्त ठरली. मात्र त्यांनी राजकारण महाराष्ट्रात केलं नाही. कांशीराम हे चर्मकार होते. महाराष्ट्रात आंबेडकरी विचारांचे राजकारण करणारा बहुसंख्य वर्ग बौद्ध समाजातला होता. त्यामुळं कांशीराम यांच्या नेतृत्वाला मान्यता मिळण्याची शक्यता कमीच होती.
कांशीराम यांनी मग पंजाब आणि उत्तरप्रदेशावर लक्ष केंद्रित केलं. बहुजनांच्या हाती सत्ता यावी यासाठीच बसपाची स्थापना करण्यात आली होती. 'जिसकी जितनी संख्या भारी, उतनी उसकी हिस्सेदारी', 'जो बहुजन की बात करेगी, वही दिल्ली पर राज करेगा,' अशा घोषणा कांशीराम यांनी दिल्या होत्या. देशात जातनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही अशाच आशयाची विधानं केली होती. अखेर आता केंद्र सकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. संख्येच्या प्रमाणात बहुजनांना सत्तेत वाटा मिळतो किंवा नाही, हा पुढचा भाग आहे.
बसपाची स्थापना झाली त्याच वर्षी म्हणजे 1984 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. बसपाने 9 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये उमेदवार उभे केले. या निवडणुकीत बसपाला 10 लाख मतं मिळाली होती. विशेष म्हणजे, या 10 लाखांपैकी 6 लाख मतं एकट्या उत्तरप्रदेशातून मिळाली होती. राममंदिर आणि मंडल आयोगाचं राजकारण सुरू होण्याच्या आधीचा हा काळ होता. कांशीराम यांच्यासाठी ही संधी होती. ती हेरून त्यांनी उत्तरप्रदेशात काम वाढवलं. त्याचं कारण होतं, उत्तर प्रदेशात दलितावंर होणाऱ्या अत्याचारांचं अधिक प्रमाण.
राम मंदिर आंदोलनाच्या आधीच्या आणि मंडल आयोगाच्या काळात हे सगळं घडत होतं. उत्तर प्रदेशात पक्षाला रुजवण्याची ही संधी होती, हे कांशीराम यांनी हेरलं आणि उत्तर प्रदेशात काम सुरू केलं. रामायण आणि महाभारतातील कथांचा प्रतिवाद त्यांनी तयार केला. या कथांमधील कथित अत्याचार झालेल्या व्यक्तींमध्ये त्यांनी दलितांची प्रतीकं आणि आदर्श शोधून काढले. उत्तरप्रदेशच्या राजकारणात पाय रोवायचे असतील तर असं करणं गरजेचं होतं. या भागाला आर्यावर्त म्हटलं जातं. मी या भागाला चांभारवर्त करणार, असं कांशीराम म्हणत असतं. त्यांनी ते करून दाखवंल. दलित समाजातील मायावती या उत्तरप्रदेशच्या चारवेळा मुख्यमंत्री बनल्या, त्या कांशीराम यांच्यामुळेच.
पंजाबमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 32 टक्के आहे. देशातील एखाद्या राज्यातील अनुसूचित जातीची ही सर्वाधिक लोकसंख्या आहे. तरीही कांशीराम यांचं राजाकरण पंजाबच्या मातीत फुललं नाही. पंजाबमध्ये चर्मकार समाज आर्थिकृष्ट्या समृद्ध आहे, त्यांचा सामाजिक स्तरही उंचावलेला आहे. ते स्वतःला वाल्मिकी समाजापेक्षा वर समजतात. वाल्मिकी समाज हा तुलनेनं तितकासा आर्थिकदृष्ट्या समृद्ध नाही. कांशीराम यांनी या दोन्ही समाजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, मात्र श्रीमंत चर्मकारांनी गरीब वाल्मिकींना बसपामध्ये थारा मिळू दिला नाही, असं सांगितलं जातं.
राज्यकर्ती जमात व्हा, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं. कांशीराम त्याच मार्गावर चालले. त्यांनी दलित, बहुजन समाजांना एकत्र आणलं, निवडणुकीच्या राजकारणात यश मिळवलं. फुले-शाहू-आंबेडकरांना देशभरात पोहोचवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावानं उत्तरप्रदेशात अनेक संस्था, विद्यापीठ आहेत. कांशीराम यांच्यामुळंच हे शक्य झालं आहे. बदलत्या राजकारणात बसपाची ताकद कमी झाली आहे. मात्र वंचितांना एकत्र करून त्यांच्या बळावर सत्ता प्राप्त करता येते, हे कांशीराम यांनी सिद्ध करून दाखवलं.
पहिली निवडणूक हारण्यासाठी, दुसरी निवडणूक लक्ष वेधून घेण्यासाठी आणि तिसरी निवडणूक जिंकण्यासाठी लढणार, असं बसपाची स्थापना केल्यानंतर कांशीराम म्हणाले होते. 1988 मध्ये त्यांनी व्ही. पी. सिंह यांच्या विरोधात आलाहाबाद, म्हणजे आताच्या प्रयागराज मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांनी चांगली लढत दिली, मात्र त्यांना पराभव झाला. 1989 मध्ये ते पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लढले. यावेळीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 1991 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षासोबत आघाडी केली. त्यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत ते इटावा मतदारसंघातून विजयी झाले. 1996 मध्ये तो होशियारपूर मतदारसंघातून विजयी झाले. उत्तर प्रदेशातच चारवेळा बसपाची सत्ता आली, मायावती चारवेळा मुख्यमंत्री बनल्या. राज्यकर्ती जमात होण्याचं डॉ. बाबासाहेबांचं स्वप्न कांशीराम यांनी अशा प्रकारे पूर्ण केलं होतं.
नागपूर येथे 2020 च्या ऑक्टोबरमध्ये बसपाच्या कार्यकर्त्यांना कांशीराम यांनी मार्गदर्शन केलं होतं. ते म्हणाले होते, "रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांशी चर्चेदरम्यान माझ्या हे लक्षात आलं होतं की ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर विश्वास ठेवतात, मात्र त्या माध्यमातून राजकारणात यश मिळेल, असे त्यांना वाटत नाही. आमदार किंवा खासादर बनणं हे त्यांच्या राजकारणातील यशाचे निकष आहेत.'' आंबेडकरांच्या विचारधारेच्या माध्यमातू राजकीय यशाचं सूत्र शोधण्याचा संकल्प कांशीराम यांचा दृढसंकल्प होता.
अत्यंत कमी कालावधीत बसपानं उत्तरप्रदेशाच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला होता. बिगरब्राह्मणवाद ही संकल्पना बसपानेच राजकारणात रूढ केली. दक्षिण भारतातीत राज्यांच्या राजकारणात हे आधीपासूनच सुरू होतं. हक्कांसाठी लढावं लागेल, भीक मागून काहीही होणार नाही, असं कांशीराम यांचं ठाम मत होतं. कांशीराम हे मायावतींचे मार्दर्शक होते. मायावती यांनी बसपाची ताकद वाढवत कांशीराम यांचं राजकारण पुढे नेलं. कांशीराम यांचं निधन 9 ऑक्टोबर 2006 रोजी झालं. निधनाच्या तीन वर्षे आधीपासूनच ते राजकारणात सक्रिय नव्हते. केवळ 30 टक्केच बहुजन आपल्यासोबत आले, त्यामुळं माझं 'मिशन' अधुरचं राहिलं, अशी खंत त्यांनी 1997 मध्ये व्यक्त केली होती. त्यांच्या निधनानंतर मागास समाजांतील बहुतांश नेत्यांनी वेगळा पक्ष तरी स्थापन केला किंवा ते भाजप, समाजवादी पक्षासोबत गेले. मायावती यांनीही बिगरबहुजन समाजांसोबत युती न करण्याचं पथ्य पाळलं नाही.
आजारपण आणि मृत्यूच्या अनेक वर्षं आधी कांशीराम यांनी मायावती यांना आपल्या उत्तराधिकारी म्हणून का जाहीर केलं होतं. त्यांनी असं का केलं, यावर बरीच चर्चा झाली. मात्र यामुळं उत्तरप्रदेशात दलितांची शक्ती वाढली, अन्य राज्यांतही बसपाचा विस्तार झाला, हेही मान्य करावं लागेल. कांशीराम यांची जीवनशैली अत्यंत साधी होती. मायावतींचा बडेजाव कांशीराम यांना आवडला असता का, असाही प्रश्न आहे. मायावती यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप झाले. दलितांचं राजकीय आत्मभान जागं करण्याची किमया कांशीराम यांनी साध्य केली. दलित आणि अन्य मागास एकत्र आले तर सत्ता ताब्यात घेता, हेही त्यांनी सिद्ध करून दाखवलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.