BSP Political News : 'हत्ती'चं वजन घटलं; 'बसप'चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाणार ?

Bahujan Samaj Party Politics : एकेकाळी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणारा हा पक्ष आता आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावण्याच्या स्थितीत येऊन पोचला आहे.
Mayawati
MayawatiSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh News : दलितांचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष म्हणून ओळख असलेल्या बहुजन समाज पक्षाला (BSP) उतरती कळा लागली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नसल्यानं 'बसप'वर गेली 26 वर्षे टिकवून ठेवलेला आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावण्याची वेळ आली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतरही 'बसप'चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाता जाता वाचला होता.

2024 च्या लोकसभेत 'बसप'चा सर्व जागांवर पराभव

2024 च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षानं जवळपास संपूर्ण देशभरात उमेदवार उभे केले होते. एकेकाळी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणारा हा पक्ष आता आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावण्याच्या स्थितीत येऊन पोचला आहे. या लोकसभा निवडणुकीत बसपाला एकही जागा जिंकता आली नाही. या पक्षाच्या एकूण मतांचा टक्का 2.4 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. निवडणूक आयोगानं घेतलेल्या आढाव्यानुसार 'बसप'चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जाण्याची शक्यता आहे.

2012 च्या विधानसभेनंतर पक्षाला उतरती कळा

एप्रिल 1984 मध्ये कांशीराम यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली होती. त्यांच्यानंतर मायावती यांनी हा पक्ष ताब्यात घेतला. 1997 मध्ये 'बसप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झाला. पक्षाच्या स्थापनेपासूनच बसपाचा जनाधार आणि मतांचा टक्का वाढत राहिला मात्र उत्तर प्रदेशमधील 2012 च्या विधानसभा निवडणुकीनंतर या पक्षाला उतरती कळा लागली. सध्या देशात काँग्रेस, भाजप, बसप, आप, राष्ट्रीय पीपल्स पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी या 06 पक्षांनाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे.

'बसप' उरला आता प्रादेशिक पक्षापुरता!

आतापर्यंत 'बसप' केवळ उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत देदिप्यमान कामगिरी करू शकला आहे. 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत या पक्षाला 12.88 टक्के मतं मिळाली होती मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये बसपाला अवघी 9.39 टक्के मतं मिळाली आहेत. या कामगिरीमुळं हा पक्ष फक्त उत्तर प्रदेशमध्येच प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यताप्राप्त ठरू शकतो.

... अन् तेव्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाता जाता वाचला!

मागील चार लोकसभा निवडणुकांमधली 'बसप'ची कामगिरी घटत असल्याचं दिसून येत आहे. 2009 मध्ये 'बसप'नं 21 जागा जिंकल्या होत्या आणि मतांचा टक्का होता 6.17 टक्के. 2014 मध्ये पक्षाचा पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही आणि मतांचा टक्का होता 4.19 टक्के. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 'बसप'नं 'सप'बरोबर युती केली आणि 10 जागा जिंकल्या. तेव्हा मतांचा टक्का होता 3.66 टक्के.

'बसप'चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यावेळीच 'बसप'चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला असता मात्र निवडणूक आयोगानं 2016 मध्ये केलेल्या सुधारणांमुळं 'बसप'चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाता जाता वाचला.

एकूणच काय तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता न आलेल्या 'बसप'ला भविष्यात आपली राजकीय ताकद वाढवण्यासाठी कष्ट घेणं अत्यावश्यक आहे. कारण 'हत्ती'चं वजन घटणं हे मायावती (Mayawati) आणि त्यांच्या पक्षाला अजिबात परवडणारं नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com