Hyderabad : आंध्र प्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठीची लढाई संपून आता ‘फर्निचर वॉर’ सुरू झाले आहे. चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळातील वादग्रस्त प्रकरणांचे खोदकाम सुरू केले आहे.
मुख्यमंत्री असताना जगनमोहन यांनी 500 कोटी रुपये खर्च करून विशाखापट्टणम हिलटॉप पॅलेस बांधल्याचा आरोप टीडीपी केला होता. त्यानंतर आता टीडीपीकडून जगनमोहन यांचा उल्लेख ‘फर्निचर चोर’ असा केला जात आहे. त्यांनी आपल्या खासगी निवासस्थानी कोट्यवधी रुपयांचे फर्निचर आणि इतर सजावट केल्याचा आरोप टीडीपीने केला आहे.
जगनमोहन हे सत्तेत असताना त्यांच्या पक्षाकडून टीडीपीचे नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष कोडेला शिवा प्रसाद राव यांचाही ‘फर्निचर चोर’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर काही दिवसांत त्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये आत्महत्या केली. या आरोपांमुळे आपल्या वडिलांनी आत्महत्या केल्याचा दावा कोडेला शिवराम यांनी केला होता.
मुलाच्या शोरुममध्ये सरकारी पैशातून फर्निचरचे काम केल्याचा आरोप राव यांच्यावर करण्यात आला होता. 2014 मध्ये टीडीपीची सत्ता आल्यानंतर राव हे विधानसभा अध्यक्ष बनले होते. 2019 मध्ये सत्ता गेल्यानंतर वायएसआर काँग्रेसने फर्निचरवरून त्यांना घेरले होते.
चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र व मंत्री नारा लोकेश यांनीही जगनमोहन यांच्या हल्लाबोल केला आहे. माजी मुख्यमंत्री फर्निचर कधी परत करणार, अशी विचारणा त्यांनी केली आहे. हिलटॉप पॅलेसवरून आधीच जगनमोहन यांच्यावर टीका होत आहे. मुख्यमंत्र्यांचे घर आणि कार्यालय म्हणून या पॅलेसचा वापर केला जाणार होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.