
New Delhi News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टेरिफ बॉम्ब टाकला आहे. चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या उत्पादनांवर तब्बल 145 टक्के कर लादण्यात आला आहे. त्यानंतर चीननेही पलटवार करत अमेरिकेतून येणाऱ्या उत्पादनांवर 125 टक्के कर लावला. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार युध्द सुरू झाले आहे. त्यातच आता चीन आणि भारतामधील संबंध सुधारण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बनंतर चीनमधून सकारात्मक बातमी समोर आली आहे. चीनने यावर्षी केवळ तीन महिन्यांतच तब्बल 85 हजार भारतीयांना व्हिसा दिला आहे. भारतासोबत राजकीय, आर्थिक, पर्यटन आदी मुद्द्यांवर संबंध सुधारण्यासाठी चीनकडून हे पाऊल उचलण्यात आल्याची चर्चा आहे. एकीकडे चीन विरुध्द अमेरिका आमनेसामने उभे ठाकलेले असताना चीन आणि भारतामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होताना दिसत आहेत.
चीनी राजदूत शू फेइहोंग यांनी एक्सवर एक पोस्ट करत व्हिसाबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 9 एप्रिल 2025 पर्यंत भारतातील चीनी आणि वाणिज्य दुतावासाने यावर्षी 85 हजार व्हिसा जारी केले आहेत. एक सुरक्षित आणि मैत्रीपूर्ण अनुभव घेण्यासाठी आम्ही भारतीय मित्रांचे स्वागत करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
फेइहोंग यांचे हे मितभाषी विधान टेरिफ वॉरच्या अनुषंगाने महत्वाचे मानले जात आहे. भारतीयांना दिलेल्या व्हिसांमध्ये प्रामुखयाने विद्यार्थी, पर्यटक, व्यापारी आदींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सरकारी अधिकारी, डॉक्टर आदींचाही समावेश आहे. विविध शैक्षणिक कार्यक्रमांसाठीही मोठ्या प्रमाणात व्हिसा देण्यात आला आहे.
भारतीयांना आकर्षित करण्यासाठी चीनने व्हिसा प्रक्रिया सोपी आणि वेगवान केली आहे. त्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत. सध्या व्हिसासाठी केंद्रांवर ऑनलाईन बुकिंग करण्याची गरज नाही. थेट अर्ज जमा करता येतो. कमी कालावधीच्या प्रवासासाठी बायोमेट्रिकमधून सूट देण्यात आली आहे. व्हिसासाठीचे शुल्कही कमी करण्यात आले आहे. व्हिसाचे अर्ज लवकरात लवकर मंजूर केले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.