

Sonam Wangchuk: कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात आमरण उपोषणाला बसलेले सामाजिक/ पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना उपोषणाच्या २० व्या दिवशी पोलिसांनी जबरदस्तीनं उचलून नेत रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. दिल्ली हायकोर्टानं वांगचूक यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिल्यानंतर सरकारनं ही कृती केली आहे.
सरकारच्या या कृतीचा कडाडून विरोध केला जात आहे. काँग्रेसनं देखील या कृतीचा स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकारची ही कृती एका अर्थानं काँग्रेसचं बळ वाढवणारी ठरणार आहे.
शनिवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जबरदस्तीनं उचलून दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन रिपोर्ट दिला की, मोठ्या कालावधीपासून उपोषण करत असल्यानं सोनम वांगचुक यांना डिहायड्रेशनमुळं कमजोरी आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या शरिरातील पॅरामिटर्स सामान्य करण्यासाठी सातत्यानं वैद्यकीय निरिक्षणाखाली उपचारांची गरज आहे.
दुसरीकडं सोनम वांगचूक यांना पोलिसांनी उचलून नेल्यानंतर जंतर-मंतरवर अभिजीत दिपके यांनी बेमुदत उपोषण सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सरकारला आव्हान दिलं की, तुम्ही असा समज करुन घेऊ नका की, सीजेपी आता मागे हटेल. हे आंदोलन आता आणखी मोठं होईल, सरकारनं आंदोलनकर्त्यांना मारहाण करुन मोठी चूक केली आहे. दिल्ली पोलिसांनी हे सिद्ध केलं आहे की, हे हुकुमशाहाचे लोक आहेत. आता जास्तीत जास्त लोकांनी जंतर-मंतरवर उपस्थित राहावं असं आवाहनही यावेळी दिपके यांनी केलं आहे.
दरम्यान, सर्वात मोठा विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसनं सरकारच्या या कृतीवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विटरवर पोस्ट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यात त्यांनी म्हटलं की, "१११ दिवस गंगा नदीला वाचवण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या प्रा. जी. डी. अग्रवाल असोत किंवा ऑलिंपिक विजेती कुस्तीपटू असोत, आपले ७५० अन्नदाता शेतकरी असोत किंवा दलीत-आदिवासी असोत किंवा मग पेपललीकचे बळी ठरलेले २५ विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबिय असोत.
या हुकुमशाह सरकारनं कोणालाही सोडलेलं नाही. यांच्या नजरेत कोणी यांच्याविरोधात आवाज उठवला तर तो देशविरोधी असतो, परजीवी असतो. त्यामुळं जंतर-मंतरवर आज जे काही झालं ते संविधानावर लागलेला एक काळा डाग आहे. यानंतर आता कोटा आणि देहराडून इथून विद्यार्थ्यांच्या आवाज घुमायला लागला आहे, हा आवाज दिल्लीच्या उंबरठ्यावर नक्कीच पोहोचेल"
दरम्यान, मोदी सरकारमधील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केलेलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चिरडण्यासाठीच उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचूक यांनी पोलिसांनी जबरदस्तीनं रुग्णालयात दाखल केलं असल्याचा आरोप केला जात आहे.
पण आता मोदी सरकारच्या आदेशानं झालेली ही पोलीस कारवाईच आता पायावर धोंडा मारुन घेणारी कृती ठरु शकते. कारण यामुळं काँग्रेसकडूनही सातत्यानं पेपर लीकवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्नही काँग्रेसनं उचलेला आहे. काँग्रेसचं सध्या सीजेपीसोबतच समांतर पद्धतीनं आंदोलन सुरु आहे.
देशभरात विविध ठिकाणी युथ काँग्रेसकडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला जात आहे. त्यामुळं सीजेपीचं आंदोलन चिरडून टाकल्यास त्यामुळं साहाजिकच काँग्रेसलाच बळ मिळणार आहे. त्यामुळं तरुण वर्ग काँग्रेसच्या आंदोलनात सहभाग नोंदवू शकतो, यामुळं येत्या काळात जर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या भारत जोडो यात्रेप्रमाणं जर तरुणांच्या प्रश्नावर देशभराचा दौरा केला तर त्यामुळं मोदी सरकारला या सगळ्या गोष्टी अधिकच अडचणीच्या ठरु शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.