नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात विधानसभेची (UP Election 2022) रणधुमाळी सुरू असतानाच काँग्रेसला (Congress) मोठा झटका बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री आर. पी. एन. सिंह (R. P. N. Singh) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. काँग्रेसने सोमवारी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत सिंह यांचाही समावेश होता. सिंह हे भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याचे समजते. त्यांना आमदारकीचं तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेस सोमवारी तीस जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात सिंह यांचाही समावेश करण्यात आला होता. पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने मोठा धक्का बसला आहे. भाजपने स्टार प्रचारकालाच गळाला लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसला हा मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. सिंह हे युपीए सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री होते.
सिंह यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांना समाजवादी पक्षाचे पडरौना विधानसभा मतदारसंघातील उमेदवार स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात तिकीट दिले जाऊ शकते. मौर्य यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम केला आहे. सिंह हे उत्तर प्रदेशातील मागासवर्गातील नेते आहेत.
कुशीनगर गोरखपुर, देवरिया या भागांत त्यांची ताकद आहे. पूर्वांचलमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने काँग्रेसला या भागात मोठा फटका बसणार आहे. सिंह हे भाजपमध्ये दाखल झाल्यास मोठा फायदा होणार आहे. काँग्रेसप्रमाणेच समाजवादी पक्षालाही दणका बसू शकतो.
सिंह हे कुशीनगर जिल्ह्यातील आहे. त्यांनी चारवेळा लोकसभेची निवडणूक लढवली होती. पण ते केवळ 2009 च्या लोकसभा निवडणुकीत कुशीनगर मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर त्यानंतर त्यांना लगेच युपीए दोन मध्ये राज्यमंत्रीपद मिळाले होते. 2014 च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. पडरौना विधानसभा मतदारसंघाचे 1996, 2002 आणि 2007 मध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.