हिंदुत्व हे इसिस अन् बोको हरामसारखं! खुर्शीद यांच्या पुस्तकामुळे पडली ठिणगी

अयोध्या प्रकरणाच्या निकालावर भाष्य करणाऱ्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या नव्या पुस्तकावरून वाद उफाळला आहे.
Digvijay Singh, P.Chidambaram and Salman Khurshid
Digvijay Singh, P.Chidambaram and Salman Khurshid Sarkarnama

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाच्या निकालावर भाष्य करणाऱ्या काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांच्या नव्या पुस्तकावरून वाद उफाळला आहे. त्यांनी हिंदुत्वाची (Hindutva) तुलना इसिस (ISIS) व बोको हराम (Boko Haram) यासारख्या दहशतवादी संघटनांशी केल्याने भाजपचा (BJP) तीळपापड झाला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडे खुर्शीद यांच्याविरूध्द फौजदारी तक्रार दाखल झाली आहे. महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही खुर्शीद यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

‘सनराइज ओव्हर अयोध्या’ या खुर्शीद यांच्या पुस्तकावरून हा वाद सुरू झाला आहे. पुस्तकाच्या प्रकाशनावेळी काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम व दिग्विजयसिंह यांनी केलेली वक्तव्येही वाद ओढवून घेणारी ठरली आहेत. अयोध्या प्रकरणाचा निकाल दोन्ही पक्षांनी स्वीकारला म्हणून चांगला ठरला पण तो चांगला निकाल होता म्हणून दोघांनीही स्वीकारला असे नव्हे, असे चिदंबरम सूचकपणे म्हणाले आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उफाळलेल्या या वादाची भविष्यातही पुनरावृत्ती होण्याचा अंदाज राजकीय जाणकार वर्तवत आहेत. भाजपने राममंदिराचा मुद्दा या निवडणुकीच्या आधी तापवण्यास सुरवात केली आहे. हा वाद भाजप-काँग्रेस यांच्यातल्या श्रेयवादाच्या लढाईची साखळी आहे, असेही जाणकार मानत आहेत. खुर्शीद यांनी पुस्तक प्रकाशनासाठी निवडलेल्या मुहूर्तावरही भाजप नेते प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.

खुर्शीद यांनी म्हटले आहे की, त्यांनी हिंदू धर्माबद्दल आदरच व्यक्त केला आहे. मात्र हिंदुत्वाची अलीकडे प्रचलित केलेली राजकीय व्याख्या आक्षेपार्ह व घातक असून, हे नवे हिंदुत्व इसिस व बोको हराम या दहशतवादी संघटनांच्या कार्यशैलीशी साधर्म्य दाखवते. तब्बल 100 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे तटस्थ विश्लेषण वाचायचे तर लोकांनी हे पुस्तक वाचावे.

Digvijay Singh, P.Chidambaram and Salman Khurshid
अमित शहांच्या डावावर काँग्रेसने टाकला प्रतिडाव!

विवेक गर्ग या वकीलाने खुर्शीद यांच्या विरोधात दिल्लीच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. याचबरोबर शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या मुद्द्यावर खुर्शीद यांना फटकारले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही लज्जास्पद तुलना आहे. वसुधैव कुटुंबकम हा मंत्र देणाऱ्या हिंदू धर्माबद्दल अशा अर्ध्या कच्च्या माहितीमुळे या पुस्तकाला प्रसिध्दी मिळू शकेल पण कोट्यवधी हिंदूंच्या भावना त्यामुळे दुखावल्या गेल्या आहेत.

Digvijay Singh, P.Chidambaram and Salman Khurshid
कंगना पुन्हा मुंबई पोलिसांच्या फेऱ्यात; देशद्रोहाची तक्रार

भाजपने खुर्शीद यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यासाठी केंद्रीय मंत्री मुख़्तार अब्बास नक्वी, महेंद्रनाथ पांडे, सोशल मीडिया विभागाचे अमित मालवीय, प्रवक्ते गौरव भाटिया, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा व मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा अशी नेतेमंडळी मैदानात उतरली आहेत. नक्वी यांनी म्हटले की, काँग्रेस नेत्यांच्या अज्ञानाचे हे प्रदर्शन आहे. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतात पण त्यांना हिंदुत्वाची माहिती नाही. कधी तालिबान तर कधी दहशतवादी गट हा यांचा महामूर्खपणा आहे.

वादास कारण ठरली एक ओळ

खुर्शीद यांच्या पुस्तकातील 1500 व्या पानावरील अक्षरशः एका ओळीवरून हा वाद उफाळला आहे. ती ओळ अशी - भारतातील साधू-संत शतकांपासून जो सनातन धर्म व मूळ हिंदुत्वाची चर्चा करत आहेत त्याला आज कट्टर हिंदुत्वाआडून बाजूला सारले जात आहे. आज हिंदुत्वाची अशी राजकीय आवृत्ती काढली जात आहे जी इसिस व बोको हराम या इस्लामी जिहादी संघटनांशी साधर्म्य सांगते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com