गुवाहाटी : काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे (Prithviraj Sathe) हे अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्याच आमदाराने पोलिसांकडे धाव घेतली आहे राज्यसभा निवडणुकीवेळी पोलिंग एजंट असलेल्या साठेंवर आमदाराने गंभीर आरोप केले आहेत. साठेंनी आपले मत रद्द करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार या आमदाराने केली आहे.
काँग्रेसचे आमदार शशिकांत दास यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. दास हे राहा मतदारसंघाचे आमदार असून, नुकतेच त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. दास यांनी तक्रारीत म्हटले आहे की, माझे मत रद्द करावे, अशी मागणी साठेंनी निवडणूक आयोगाकडे केली होती. मी मतपत्रिका न दाखवल्याचा दावा करीत त्यांनी ही मागणी केली होती. यावर मी त्यांना दुसऱ्यांदा मतपत्रिका दाखवली होती. अखेर निवडणूक आयोगाने साठेंची मागणी फेटाळून लावत माझे मत वैध ठरवले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.
साठे यांची सुमारे दोन वर्षांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिवपदी निवड केली होती. साठे यांच्याकडे आसाम राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली. मागील वर्षी झालेल्या आसाम विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांच्या खांद्यावर ही धुरा देण्यात आली होती. साठे यांनी 1992 मध्ये एनएसयूआयच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी एनएसयूआयच्या माध्यमातून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यानंतर अखिल भारतीय युवक काँग्रसचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
आसाममध्ये (Assam) राज्यसभेच्या (Rajys Sabha) दोन जागांसाठी निवडणूक झाली. यातील एक जागा बिनविरोध झाली तर एका जागेसाठी मतदान झाले. या निवडणुकीत भाजपचे (BJP) पवित्र मार्गरिटा हे बिनविरोध निवडून आले. दुसऱ्या जागेसाठी भाजप आघाडीकडून युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल पक्षाचे राँग्वरा नार्झरे हे मैदानात उतरले होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसने (Congress) उमेदवार रिपुन बोरा यांना उतरवले होते. आसाम विधानसभेतील एकूण 126 मतांपैकी 83 मते भाजप आणि सहकारी पक्षांकडे होती. ही मते मार्गरिटा यांना निवडून आणण्यास पुरेशी होती. दुसऱ्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी 43 मते आवश्यक होती. काँग्रेससह विरोधी पक्षांकडे 44 मते होती. परंतु, काँग्रेसचे आमदार सिद्दीकी अहमद यांनी त्यांचे मत वाया घालवले. यामुळे अखेर बोरा यांचा पराभव झाला आणि भाजपने दुसरी जागाही जिंकली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.