गुवाहाटी : राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावेळी मतपत्रिकेवर 1 ऐवजी ‘one’ असे एका काँग्रेस आमदाराने लिहिले होते. त्याच्या या तांत्रिक चुकीमुळे काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला होता. या आमदाराने हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा ठपका आता पक्षाने ठेवला आहे. त्याची तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपच्या सांगण्यावरून या आमदाराने हा प्रकार केल्याचा आरोप होत आहे.
पक्षाने बजावलेल्या तीन ओळींच्या व्हीपचे पालन न केल्याने काँग्रेसचे आमदार सिद्दीकी अहमद यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकीवेळी अहमद यांनी त्यांचे मत जाणूनबूजून वाया घालवले. यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव तर भाजपचा उमेदवार विजयी झाला, असे काँग्रेसने म्हटले आहे. याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा म्हणाले की, अहमद यांनी पक्षाच्या व्हीपचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
आसाममध्ये (Assam) राज्यसभेच्या (Rajys Sabha) दोन जागांसाठी निवडणूक झाली. यातील एक जागा बिनविरोध झाली तर एका जागेसाठी मतदान झाले. या निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) आमदार सिद्दीकी अहमद यांच्याकडून ही चूक घडली. काँग्रेसचे उमेदवार रिपून बोरा यांच्या पराभवास अहमद कारणीभूत ठरले. मतपत्रिकेवर अहमद यांना 1 हा आकडा लिहायचा होता. त्याऐवजी अहमद यांनी ‘one’ असे लिहिले. त्यामुळे त्यांचे मत बाद झाले आणि काँग्रेसच्या बोरा यांचा पराभव झाला.
भाजपचे (BJP) पवित्र मार्गरिटा हे बिनविरोध निवडून आले. दुसऱ्या जागेसाठी भाजप आघाडीकडून युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल पक्षाचे राँग्वरा नार्झरे हे मैदानात उतरले होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसने बोरा यांना उतरवले होते. आसाम विधानसभेतील एकूण 126 मतांपैकी 83 मते भाजप आणि सहकारी पक्षांकडे होती. ही मते मार्गरिटा यांना निवडून आणण्यास पुरेशी होती. दुसऱ्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी 43 मते आवश्यक होती. काँग्रेससह विरोधी पक्षांकडे 44 मते होती. परंतु, अहमद यांनी त्यांचे मत वाया घालवले. यामुळे अखेर बोरा यांचा पराभव झाला आणि भाजपने दुसरी जागाही जिंकली.
भाजपचं संख्याबळ शंभरवर
राज्यसभा निवडणुकीतील दमदार कामगिरीमुळे भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ आता शंभरवर पोचले आहे. देशात 1988 पासून पहिल्यांदाच असे घडले आहे. काँग्रेसचे राज्यसभेतील संख्याबळ दिवसेंदिवस घटत आहे. यामुळे काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. आगामी गुजरात आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी न केल्यास पक्षाचे विरोधी पक्षनेतेपद जाऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.