Narendra Modi Vs Rahul Gandhi : आता सामना आमने-सामने; काँग्रेसचं ठरलं, राहुल गांधीच मोदींना भिडणार...
New Delhi : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपची पंतप्रधान नरेंद्र मोदीवर तर काँग्रेसची मदार राहुल गांधींवर होती. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. पण आता हा सामना थेट आमने-सामने होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याचा ठराव मंजूर केला आहे.
काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दिल्लीत झाली. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेसमध्ये धोरणात्मक निर्णय या समितीमध्येच घेतले जातात.
लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाला यावेळी मोठे यश मिळाले. या निवडणुकीत पक्षाला 99 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची माळ पक्षातील नेत्याच्या गळ्यात पडणार आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत राहुल गांधींचा या पदावर निवड करण्याच्या ठरावाला मंजूरी देण्यात आली. राहुल गांधी यांनी मात्र त्यावर विचार करण्यासाठी पक्षाकडे वेळ मागितला आहे.
बैठकीत बोलताना खर्गे यांनी राहुल गांधींचे कौतुक केले. भारत जोडो यात्रा ज्या भागात गेली, तिथे पक्षाला मिळालेली मतं आणि जागांमध्ये वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. मणिपूरमध्ये पक्षाला दोन्ही जागांवर विजय मिळाला आहे. नागालँड, आसाम आणि मेघालयमध्येही विजय मिळाला. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्याची माहिती खर्गेंनी दिली.
काही राज्यांमध्ये मात्र काँगेसला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यावरही खर्गे यांनी जल्लोष न करता या राज्यांवर लक्ष केंद्रित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या राज्यांतील पदाधिकाऱ्यांशी लवकरच चर्चा करून आवश्यक पावले उचलली जातील. इंडिया आघाडीतील प्रत्येक पक्षाने वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपली भूमिका योग्यप्रकारे बजावली, असेही खर्गे म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद देण्याबाबत खर्गे यांच्यासह सर्वच वरिष्ठ नेते, विविध राज्यातील पदाधिकारी आग्रही आहेत. राहुल गांधी ही जबाबदारी स्वीकारणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली आहे. खर्गे यांनी राहुल हेच आपली पंतप्रधानपदाचे पहिली पसंती असल्याचे विधान काही दिवसांपुर्वीच केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.