Crude Oil Price : तेलाचे दर 130 डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता; रुपयावर दबाव, RBIची डॉलर व्यवस्था काय?

SBI Research sees Brent crude at $110 and India oil import price at $130 per barrel, while RBI dollar supply measures aim to ease pressure on the rupee : पुढील 10 कार्यदिवसांत ब्रेंट क्रूड 110 डॉलर, तर भारताच्या आयात कच्च्या तेलाचा दर 130 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचण्याचा अंदाज; तेलाच्या किमती आणि डॉलर पुरवठ्याबाबत RBIच्या उपाययोजनांकडे लक्ष.
Crude Oil Price
Crude Oil PriceSarkarnama
Published on: 
Updated on: 

India Oil Import Price : भू-राजकीय तणाव आणि पुरवठ्याशी संबंधित जोखमींमुळे कच्च्या तेलाच्या किमतींवरील दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील 10 कार्यदिवसांत ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल 110 डॉलर, तर भारताच्या आयात कच्च्या तेलाचा दर 130 डॉलरपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज SBI Research ने व्यक्त केला आहे.

तेलाच्या दरांत तातडीने मोठी घसरण होण्याची शक्यता कमी असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

SBI Research ने प्रसिद्ध केलेल्या ‘Ecowrap’ अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील भू-राजकीय घडामोडी आणि तेलपुरवठ्याशी संबंधित अनिश्चितता यांचा कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम होत आहे. परिणामी, तेलाच्या दरांत मोठी घसरण होण्याऐवजी ते उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा भारतीय रुपयाच्या विनिमय (Economy) दरावरही दबाव येऊ शकतो.

अहवालातील अंदाजानुसार, पुढील 10 कार्यदिवसांत ब्रेंट क्रूडचा दर (Price) सध्याच्या सुमारे 103.4 डॉलरवरून 110 डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढू शकतो. त्याचवेळी भारताच्या आयात कच्च्या तेलाचा दर सुमारे 127 डॉलरवरून 130 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

RBIची डॉलर पुरवठ्याची व्यवस्था

कच्च्या तेलाच्या आयातीसाठी भारताला मोठ्या प्रमाणावर डॉलरची गरज असते. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढल्यास आयातीसाठी अधिक डॉलर खर्च करावे लागू शकतात. त्यामुळे रुपयाच्या विनिमय दरावर दबाव वाढण्याची शक्यता असते. हा दबाव कमी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) या सरकारी तेल कंपन्यांसाठी डॉलर पुरवठ्याची विशेष व्यवस्था सुरू केली आहे.

चलन अदलाबदलीचे व्यवहार

या व्यवस्थेद्वारे दरमहा सुमारे 10 ते 12 अब्ज डॉलरची मागणी खुल्या परकीय चलन बाजारातून वळवण्याचा उद्देश आहे. यापूर्वीच्या काही उपाययोजनांमध्ये परतफेड करावी लागणाऱ्या चलन अदलाबदलीच्या व्यवहारांचा समावेश होता. नव्या व्यवस्थेत मात्र परकीय चलनसाठ्यातून थेट डॉलरची विक्री केली जात आहे.

नोव्हेंबरनंतर तेलाचे दर कमी होणार का?

अहवालातील अंदाजानुसार, 3 नोव्हेंबर 2026 पूर्वी ब्रेंट क्रूडचे दर एका मर्यादेत राहू शकतात किंवा त्यात किंचित घसरण होऊ शकते. त्यानंतर एप्रिल 2027 पर्यंत नियोजित तेलपुरवठा प्रत्यक्षात सुरू झाल्यास किमती हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन पातळीवर आखाती देशांतून होणारी तेलाची निर्यात पूर्ववत झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा वाढून किमती कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, हा अंदाज प्रत्यक्ष पुरवठा सुरू होण्यावर आणि भू-राजकीय परिस्थितीतील बदलांवर अवलंबून असेल. कच्च्या तेलाच्या किमतींतील संभाव्य वाढ भारताच्या आयात खर्चासाठी आणि रुपयाच्या स्थैर्यासाठी आव्हान ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com