
New Delhi News : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपसह काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. अद्याप भाजपकडून एकाही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण सुरुवातीपासूनच भाजप आणि आप अशी थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण काँग्रेसनेही तगडे उमेदवार उतरवत आपचं टेन्शन वाढवलं आहे.
इंडिया आघाडीमध्ये आप आणि काँग्रेस एकत्र आहे. दिल्लीतील लोकसभा निवडणुका त्यांनी एकत्रित लढवल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा झडत होत्या. दोन्ही पक्षांची आघाडी झाली नाही तरी अंतर्गत चर्चेतून काही मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांची छुपी युती होऊ शकते, अशीही चर्चा होती. पण तसे काहीच झाले नाही. याउलट काँग्रेसनेही आपच्या नेत्यांना फोडत उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसकडून मंगळवारी रात्री उशिरा 26 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. आपचे नेते मनिष सिसोदिया यांच्याविरोधात फरहाद सुरी यांना तिकीट देण्यात आलले आहे. तर सोमवारीच आपमधून काँग्रेसमध्ये आलेले माजी आमदार असीम खान आणि देवेंद्र सेहरावत यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीतील एकूण 70 जागांपैकी काँग्रेसने आतापर्यंत 47 उमेदवारांची घोषणा केलली आहे.
काँग्रेसने राष्ट्रीय प्रवक्त्या रागिनी नायक यांनाही उमेदवारी दिली असून त्या वझीरपूर मतदारसंघातून निवडणूक लढतील. त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव आणि माजी प्रदेशाध्यक्ष चौधरी अनिल कुमार हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दुसरे राष्ट्रीय प्रवक्ते आदर्श शास्त्री द्वारका मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. काँग्रेसच्या पहिल्या यादीत अरविंद केजरीवालांविरोधात संदीप दीक्षित यांना उतरवण्यात आले आहे. ते माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आहेत.
दरम्यान, काँग्रेसकडून आज आप आणि भाजप सरकारच्या कामगिरीवर श्वेतपत्रिका जारी करण्यात आली. ‘मौका-मौका, हर बार धोखा’ असे त्यावर लिहिण्यात आले आहे. दिल्लीत मागील 11 वर्षांपासून आपची तर केंद्रात 2014 पासून भाजपची सत्ता आहे. पण दिल्लीतील जनतेची दोघांनीही फसवणूक केली, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.