

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली आज पुन्हा एकदा आंदोलनांच्या विळख्यात सापडली आहे. एकीकडे कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने जंतर-मंतरवर सरकारविरोधात आक्रमक आंदोलन छेडले असून आज दुसऱ्या दिवशी संसदेकडे मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे भारत-अमेरिका मुक्त व्यापार करार (India-US Free Trade Agreement - FTA) रद्द करण्याच्या मागणीसाठी पंजाबसह विविध राज्यांतील हजारो शेतकरी दिल्लीकडे कूच करीत आहेत.
या दुहेरी आंदोलनामुळे राजधानीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. दिल्ली पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. आजच्या या दुहेरी आंदोलनामुळे दिल्लीतील वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, परिस्थितीवर केंद्र सरकार आणि प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.
जंतर-मंतरवर CJP चा पुन्हा एल्गार
सोमवारी आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळ आणि पोलिस कारवाईनंतरही CJP समर्थकांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. आजही मोठ्या संख्येने कार्यकर्ते जंतर-मंतर येथे एकत्र जमले आहेत. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की आहे की "आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. आज संसद मार्चही काढण्यात येईल."* त्यामुळे जंतर-मंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
सोमवारी झालेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जंतर-मंतर, संसद मार्ग आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रॅपिड अॅक्शन फोर्स, अतिरिक्त पोलीस दल आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनाही सज्ज ठेवण्यात आले असून प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.
भारत-अमेरिका FTA विरोधात शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा
दुसरीकडे पंजाब, हरियाणा आणि इतर राज्यांतील हजारो शेतकरी 'देश बचाओ मोर्चा'च्या हाकेला प्रतिसाद देत दिल्लीकडे रवाना झाले आहेत. अमृतसर, गुरदासपूर आणि इतर भागांतून निघालेले शेतकऱ्यांचे ताफे शंभू सीमेमार्गे राजधानी गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.
शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की प्रस्तावित भारत-अमेरिका मुक्त व्यापार करारामुळे भारतीय शेती, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे हा करार तातडीने रद्द करण्यात यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
शंभू आणि खनौरी सीमेवर अभेद्य सुरक्षा
शेतकऱ्यांच्या दिल्ली कूचच्या पार्श्वभूमीवर पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभू बॉर्डर आणि खनौरी परिसरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे.प्रशासनाने भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 163 लागू केले आहे. कोणत्याही प्रकारची गर्दी किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.सीमेवर मोठमोठे लोखंडी बॅरिकेड्स, काँक्रीट अडथळे आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली असून काही मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
हरियाणा पोलिसांनी अडवला शेतकऱ्यांचा ताफा
दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना हरियाणा पोलिसांनी खनौरीजवळ रोखले आहे. भारतमाला-जम्मू-कटरा एक्सप्रेसवेवर ही मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स उभारण्यात आले असून दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर कडक तपासणी सुरू आहे.
दिल्ली हायअलर्टवर
एका बाजूला जंतर-मंतरवर CJP चे आंदोलन आणि दुसऱ्या बाजूला शंभू-खनौरी सीमेवर हजारो शेतकऱ्यांची गर्दी यामुळे दिल्ली पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. राजधानीतील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा वाढविण्यात आली असून केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही अलर्ट मोडवर आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.